यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिली – हेन्री फोर्ड
आज आपण सर्वजण कारमधून फिरतो, परंतु 100 वर्षांपूर्वी केवळ अति श्रीमंत लोकच कार वापरू शकत असत. पण एक व्यक्ती होती जिने ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणली आणि कार सामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचवली. स्वतःच्या हिंमतीवर गरिबांना चारचाकी गाडीचं स्वप्न दाखवून ते सत्यात उतरवणाऱ्या त्या अवलियाचं नाव आहे हेन्री फोर्ड…
३० जून १८६३ रोजी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका छोट्या शहरात हेन्री फोर्ड यांचा जन्म झाला. एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या हेन्रीला ४ भावंडं. घरची परिस्थिती बेताची. शेतातून मिळेल तेवढंच उत्पन्न. अमेरिकेतला तो काळ असा होता जेव्हा शेती ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने केली जात होती. दिवसभर शेतात काम करणं लहानग्या हेन्रीला पसंत नव्हतं. भावंडांसोबत शाळेत जाणारा हेन्री ८ व्या ग्रेड पर्यंत शिकला. शालेय शिक्षणात जास्त रस नसणाऱ्या हेन्रीने माध्यमिक शिक्षण काय केलं नाही. बुक किपींगचा एक कोर्स करायला त्यानं ऍडमिशन घेतलं.
१२ वर्षाच्या हेन्रीला त्याच्या वडिलांनी हातात घालायचं घड्याळ भेट दिलं… हेन्रीने ते घड्याळ खोललं आणि परत जोडलं. जगातली पहिली आधुनिक कार तयार करण्याची हीच होती पहिली पायरी… जिथं त्याच्या वयाची मुलं मैदानात खेळ खेळायची तिथं हेन्री आसपासच्या घरातली बिघडलेली घड्याळ दुरुस्त करायचा.
त्या काळात वाहतुकीसाठी घोडागाडीच वापरली जायची. मग ती सामानाची असो किंवा माणसांची. शेतात वडिलांना मदत करत असताना हेन्रीने पहिल्यांदा एक असं मशीन पाहिलं, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चक्क घोड्याशिवाय जात होतं. पाण्याच्या वाफेवर चालणारं, शेतात वापरलं जाणारं हे मशीन म्हणजे हेन्रीसाठी आश्चर्य होतं. समोर दिसणारं हे मशीन म्हणजे हेन्रीचा हेन्री फोर्ड होण्यासाठी एक निमित्त आहे हे बहुतेक काळ ओळखून होता. मशीनवर प्रेम कणाऱ्या हेन्रीने तेव्हाच ठरवलं कि आपण देखील अशी गाडी बनवायची जी घोड्यांशिवाय चालेल.
वयाच्या १६ व्या वर्षी हेन्री यांच्या आईच निधन झालं. आईवर अतिशय प्रेम करणारे हेन्री आतून तुटले होते. आईच्या निधनानंतर वडिलांनी त्यांना सांगितलं कि तू आता शेतात कामाला सुरवात कर, पण शेतीच्या कामात अजिबात रस नसणाऱ्या हेन्रीने सरळ घर सोडून पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला.
हेन्री यांनी सरळ अमेरिकेतील डेट्रॉईट शहर गाठलं. अनेक उद्योगधंदे जिथं जन्माला येत होते असं डेट्रॉईट शहर म्हणजे हेन्री सारख्या होतकरूंसाठी संधीच भांडारच होत.
घोड्याशिवाय चालणारी ती वाफेवरची गाडी काही हेन्रीच्या डोक्यातून जात नव्हती. डेट्रोईट मध्ये गेल्यावर त्यांनी स्टिम इंजिन बनवणाऱ्या एका कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि स्टीमवर चालणारी ही गाडी खूपच जड आहे. जर आपल्याला सर्वसामान्य वापरतील अशी गाडी बनवायची असेल, तर वाफेवर चालणारं इंजिन वापरून काहीच उपयोग नाही. कारण हे इतकं तापतं कि ते रोजच्या वापरात येऊच शकणार नाही.
सर्वसामान्यांना वापरता येणारी गाडी बनवण्याचे त्यांचे प्रयत्न चालूच होते. स्टीम इंजिनला पर्याय शोधताना त्यांच्या वाचनात जर्मन इंजिनर निकोलस ऑटो यांनी बनवलेलं गॅस इंजिन आलं. युरोपात थोड्या फार प्रमाणात वापरलं जाणार हे इंजिन अमेरिकेसाठी मात्र नवीन होतं.
१८८६ मध्ये आपल्या प्रयत्नातून त्यांनी गॅस इंजिन वापरून एक गाडी बनवली जिला त्यांनी Ford Quadricycle असं नाव दिल. गाडीचा पहिला डेमो जेव्हा त्यांना द्यायचा होता तेव्हा बाहेर खूप पाऊस पडत होता. पण आपल्या प्रयत्नांना सफल झालेलं त्यांना पाहायचं होतं. पावसाची पर्वा न करता रात्रीच्या वेळी त्यांनी आपली गाडी बाहेर काढली.
पुढं १८९६ मध्ये हेन्री फोर्ड यांची भेट थॉमस एडिसन यांच्या सोबत झाली. हेन्री यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडलं. त्यांच्या या संशोधनावर एडिसन खुश झाले. यातुन प्रेरणा घेऊन हेन्री फोर्ड यांनी आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आणि त्यांनी १८९९ मध्ये स्वतःची Detroit Automobile Company स्थापन केली. पण यातून तयार होणाऱ्या गाड्या कमी दर्जाच्या आणि जास्त महाग होत्या. त्यामुळं १९०१ मध्ये हेन्रीनी ती कंपनी बंद केली.
पुढे डेट्रॉईट ऑटोमोबाईल कंपनीतील त्याचे सहकारी मर्फी आणि इतर भागीदारांसोबत 30 नोव्हेंबर 1901 रोजी हेन्री फोर्ड कंपनीची स्थापना केली. पण तिथं देखील इतर सहकाऱ्यांसोबत मतभेद झाल्याने आपलं नाव असणारी ती कंपनी त्यांनी सोडून दिली.
सलग २ वेळा आलेलं अपयश, जवळची संपत चालली बचत अशा परिस्थितीत हार न मानता फोर्ड यांनी गुंतवणूकदार असणारे माल्कन यांच्या सोबत १६ जून १९०३ रोजी फोर्ड मोटार कंपनी चालू केली.
कंपनी तर चालू झाली पण ती लोकांपर्यंत पोहचणार कशी? यासाठी फोर्ड यांनी अमेरिकेत भरल्या जाणाऱ्या कार रेसिंग स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मॉडेल ९९९ हे कार रेसिंग मॉडेल तयार केलं. ही रेस जिंकून त्याचं हे मॉडेल तर हिट ठरलंच सोबत कंपनीचं नावसुद्धा झालं.
त्या काळच्या चारचाकी गाड्या इतक्या महाग होत्या की श्रीमंत सुद्धा त्या घेताना विचार करत होते. अश्या या काळात हेन्री फोर्ड यांनी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी गाडी बनवण्याचे प्रयत्न काही त्रुटी असल्यामुळे फेल गेले. पण १९०८ मध्ये त्यांनी बनवलेल्या मॉडेल-T ने मात्र जगाला वेड लावलं. फक्त काळ्या आणि डार्क ब्लु रंगात येणारी गाडी हळू हळू फक्त काळ्या रंगात मिळू लागली. या गाडय़ांचे स्टिरिंग व्हील डावीकडे होते. गाडी चालवायला सोपी होती आणि दुरुस्त सुद्धा लवकर होत असे.
पहिल्या वर्षी कंपनीने १७०८ गाड्या विकल्या. गाडीची किंमत होती ९०० डॉलर. १९१४ मध्ये या गाडीच्या सेलने २,५०,००० चा टप्पा ओलांडला. पुढे गाडीची किंमत ३६० डॉलर्स वर आल्यावर तर गाडीचा सेल ४,७०,००० पर्यंत गेला. खऱ्या अर्थानं हेन्री फोर्ड यांची ही मॉडेल T गाडी म्हणजे विसाव्या शतकातली सगळ्यात सेन्सेशनल गाडी ठरली. एक वेळ तर अशी आली कि जिथं नजर जाईल तिथं फक्त हीच काळी गाडी दिसायची.
सर्वोत्तम ज्ञान असणारे कर्मचारी आपल्या कंपनीत असले पाहिजेत म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला ५ डॉलर पगार घोषित केला. जिथं दिवसाला २ डॉलर पगार मिळायचा तिथं इतका पगार म्हणजे कर्मचारांसाठी सोनंच होत. कामाचे दिवस आठवड्याचे ५ च करून त्यांनी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी वाढेल याकड लक्ष दिलं.
सतत येणाऱ्या अपयशाला नमवत प्रत्येक समस्येतून नवीन संधी निर्माण करणारे हेन्री फोर्ड खऱ्या अर्थाने आधुनिक गाड्यांचे जनक आहेत. १०८ वर्षाची फोर्ड मोटार कंपनी ही अनेक चढ उतारानंतर आज ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे.
आपल्या आईवर अतिशय प्रेम करणाऱ्या हेन्री फोर्ड याना तितकीच प्रेमळ आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी पत्नी त्यांना लाभली… तीच नाव होत क्लारा. आधुनिक युगातील चारचाकी गाड्यांमध्ये क्रांती करणाऱ्या या अवलियाने ७ एप्रिल १९४७ रोजी आपल्या पत्नीच्या खांद्यावर जीव सोडला.
चारचाकी गाडी हा श्रीमंती थाट न राहता सामान्य माणसाच्या आवाक्यातील व्हावे यासाठी फोर्ड यांनी अथक प्रयत्न केले. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्माला आलात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता आणि परिस्थिती कशी बदलता हे महत्वाचं असतं. शेतकऱ्याच्या या मुलानं ऑटोमोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून याच ज्वलंत उदाहरण आपल्यापुढं ठेवलं आहे.
तर ही होती हेन्री फोर्ड यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा.यासारख्याच अनेक उद्योजकांच्या जीवनकथा ऐकून प्रेरणा घेण्यासाठी चॅनेलला आताच सबस्क्राईब करा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?