Giorgio Armani : स्वप्नाला आकार देणारा कलाकार

इटली देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अब्जाधीश ब्रँड मालक जॉर्जिओ अरमानी यांचे दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांची अरमानी ही कंपनी गुच्ची आणि प्राडा नंतर इटलीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फॅशन समूह मानला जातो. या ब्रँडखाली शेकडो स्टोअर्स आणि 10 अब्जाहून अधिक डॉलर्सची वार्षिक उलाढाल आहे. मिलानच्या रेडी-टू-विअर फॅशनमध्ये अग्रणी ठरलेले अरमानी यांनी ‘अनस्ट्रक्चर्ड लुक्स’ द्वारे फॅशनमध्ये क्रांती घडवून आणली होती. ते इटालियन शैली आणि शालीनतेचे मूर्तिमंत स्वरूप होते.
मिलानच्या रस्त्यावरून चालणाऱ्या एका साध्या मुलाने कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस तो जगभरातल्या फॅशनविश्वाला नवं रूप देईल. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेला हा तरुण, थोडे दिवस सैन्यात आणि मग एका दुकानातल्या शोकेस सजवण्यात रमला. परंतु त्याच्या डोळ्यात मात्र कपड्यांच्या पलीकडचं स्वप्न होतं. अखेर सर्जियो गॅलोटी या मित्रासोबत १९७५ च्या दशकात त्याने स्वतःचा ब्रँड उभारला.
पुढे काळ बदलत गेला आणि त्यांचे कष्ट आणि कल्पकता सतत वाढत राहिले. त्यांनी एम्पोरियो अरमानी, अरमानी ज्युनियर आणि एएक्स अरमानी एक्सचेंज यांसारख्या नव्या श्रेणींमधून जागतिक स्तरावर आपला ब्रँड विस्तारला. त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम तसेच होम फर्निशिंग क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले. हॉलीवूडमधील १९८० साली प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर गिगोला चित्रपटासाठी रिचर्ड गियरची वॉर्डरोब डिझाईन तयार करताच जगाने त्यांच्या नावाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. चित्रपट उद्योगाशी असलेल्या या संबंधामुळे त्यांचे नाव आणि ब्रँड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर आले. अरामानींनी शंभराहून अधिक चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले.
त्यानंतर जॉर्जिओ अरमानी (Giorgio Armani) फॅशनच्याही पलीकडे गेली. फॅशनच्या पलीकडे जाऊन त्यांनी हॉटेल्स, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवले. दुबईतील अरमानी हॉटेल, ऑलिंपिक व विविध व्यावसायिक क्रीडा संघांसाठी गणवेश डिझाइन, तसेच एम्पोरियो अरमानी कॅफे संगीत संकलनांचे क्युरेशन हे त्याचे काही उल्लेखनीय उपक्रम ठरले. त्यांच्या नावावर उभं राहिलेलं साम्राज्य म्हणजे फक्त कपड्यांचं नव्हे, तर आज ते शालीनतेचं प्रतिक आहे.
आज त्यांच्या जाण्याने जग शोकाकुल आहे, पण त्यांनी विणलेली शैली अजूनही जिवंत आहे. “खरा डिझायनर तोच, जो स्वप्नांना कृतीतून प्रत्यक्षात घडवतो“ हे त्यांनी जगाला दाखवून दिले. शून्यातून विश्व उभे करण्याचा त्यांचा प्रवास आज सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे.
जॉर्जिओ अरमानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आणखी वाचा :
- अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
- शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…