हुशारात हुशार माणसाचं सुद्धा डोकं बधिर करणारा ‘ट्रॉली डिलेमा’
दररोजच्या बोलण्यात आपण एका शब्दाचा अगदी प्रकर्षाने उपयोग करत असतो, तो म्हणजे महत्व. “तुला माझी किंमत नाहीये!” असं वाक्य आपल्याकडून अगदी सहजपणे बोललं जातं; मात्र या वाक्यामागे अनेक भावना देखील गुंतलेल्या असतात आणि म्हणूनच मनाच्या हळव्या कोपऱ्यातून निघालेलं हे वाक्य खरोखर वजनदार ठरतं.
मात्र कधी विचार केलात का ‘किंमत किंवा व्हॅल्यू’ म्हणजे काय? दुकानात गेल्यानंतर विकत घेतलेल्या हरेक वस्तूसाठी किंमत मोजली जाते आणि म्हणूनच त्या वस्तूच्या किमतीनुसार आपण ती हाताळतो. अगदीच महागडी वस्तू असेल तर तिला जिवापेक्षा जास्त जपलं जातं. नाही का? पण किंमत फक्त विकत घेतलेल्या वस्तूंचीच केली जाते का? नाही!! आपल्या आजूबाजूला वावरणारी मंडळी, आपलं कुटुंब, मित्र परिवार सर्व आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि म्हणून आपण त्यांची किंमत करतो म्हणजे काय तर त्यांचं आपल्या आयुष्यातील महत्व जाणतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, ते आपल्यापासून दुरावणार नाहीत याची काळजी घेतो. दैनंदिन जीवनातील याच घडामोडींच्या आधारे कैक वर्षांपूर्वी ट्रॉली डेलिमाचा सिद्धांत सादर करण्यात आला होता. पण हा संदर्भ नेमका आहे तरी काय हे आज जाणून घेऊया.
ट्रॉली डेलिमा म्हणजे काय?
वर्ष १९६७ मध्ये फिलिप फूट (Philipa Foot) नावाच्या एका फिलॉसॉफरने (Philosopher) हा सिद्धांत मांडला होता. सदर सिद्धांत सामान्य माणसाला समजण्यासाठी फिलिप फूट यांनी एका रेल्वेचं उदाहरण देत एकूण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात,
एका वेगाने धावणाऱ्या रेल्वेसमोर जर का पाच माणसं उभी होती म्हणून चालकाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी रूळ बदलला तर दुसऱ्या रुळावर देखील एक माणूस उभा ठाकला होता. मग अशा कठीण परिस्थितीमध्ये रेल्वे चालकाने काय करावं? साहजिकपणे आपण म्हणू की पाच माणसांचा जीव वाचवण्यासाठी रेल्वेचालकाने एका माणसाचा जीव घ्यावा. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असंही वाटतं की, जीव हा जीव असतो मग तो एका माणसाचा असो किंवा पाच.
या उदाहरणातून आपण काय शिकतो तर आयुष्याच्या प्रवासात काही प्रसंग असेही येतात, जिथे एक योग्य पर्याय निवडला जाऊ शकत नाही. हिंदी भाषेत या प्रसंगाच्या आधारे एक म्हण तयार करण्यात आली आहे ती म्हणजे “आगे कुआं, पीछे खाई” म्हणजे काय तर समोर गेलो तरीही विहिरीत पडू आणि मागे आलो तरीही दरीत कोसळू, एकूण काय तर अशा परिस्थितीत एक सोपा मार्ग निवडला जाऊ शकत नाही.
दररोजच्या जीवनात याचा संदर्भ काय?
जीवन जगात असताना आपण देखील अनेकवेळा अशा ट्रॉली डेलिमाचा सामना करत असतो. विचार करा त्या रेल्वेच्या रुळावर जर का तुमच्या जवळचा कुणीतरी खास व्यक्ती असता, तर तुम्ही कोणाची निवड केली असती, पाच माणसांची की तुमच्या जवळच्या व्यक्तीची? नक्कीच आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची निवड केली असती आणि तेव्हा आपण एका व्यक्तीचे प्राण वाचवत आहोत की पाच व्यक्तींना जीवनदान देत आहोत असा विचार देखील मनात आला नसता. का? कारण आपल्यासाठी ती जवळची व्यक्ती महत्वाची असते, आपण त्या व्यक्तीची किंमत जाणून असतो. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर रामायण आणि महाभारतामध्ये देखील या ट्रॉली डेलिमाची उदाहरणं सापडतात. पट्टराणी कैकयीला दिलेल्या वाचनापायी लाडक्या पुत्राला वनवासात जाण्याची आज्ञा न देऊ शकणारा राजा दशरथ असो किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर स्वतःच्याच परिवारासमोर शत्रू म्हणून धनुष्य घेऊन उभा ठाकलेला अर्जुन असो. ट्रॉली डेलिमाचा एका अर्थाने विचार केल्यास अशा कठीण प्रसंगांमध्ये अनेकवेळा नीती-अनीतीला बाजूला सारत आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याच्या आधारे निर्णय घेतला जातो.
याच सिद्धांताचा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास एक खास पैलू उघड होतो. आपल्या मनात अनेक इच्छा असतात, कित्येक गोष्टी साध्य करायच्या असतात, मात्र तरीही आपण त्या करू शकत नाही, कारण आपण त्या इच्छांना महत्व दिलेलं नसतं. ‘मला डॉक्टर व्हायचं आहे’ अशी इच्छा मनात बाळगून वावरणारा कधीही डॉक्टर बनू शकत नाही, मात्र मला डॉक्टर व्हायचं आहे, माझ्यासाठी ही इच्छा पूर्ण होणं महत्वाचं आहे आणि म्हणून मी प्रयत्न करेन असा विश्वास बाळगणाराच यशस्वी होतो आणि म्हणूनच आपलं करिअर घडवताना जे लक्ष साध्य करायचं आहे त्याला महत्व देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधाला देखील हाच संदर्भ लागू होतो. नवीन लग्न करून सासरी गेलेली मुलगी जेव्हा सासरच्या घराला महत्व देते, त्यांचा आनंद देखील तिच्यासाठी महत्वाचा ठरतो तेव्हाच ती नवीन घरात रुळते किंवा नवीन संबंध जपू शकते.
ट्रॉली डेलिमाचे अनेकविध प्रसंग आपल्या आयुष्यात येतात आणि येत राहतील मात्र अशा कठीण काळात माणूस कसे निर्णय घेतो, कुणाला महत्व देतो यावर पुढील शृंखला अवलंबून असते आणि म्हणूनचअशावेळी सद्सद्विवेकबुद्धीचा नीट वापर करावा. आपल्या निर्णयामुळे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करावा. आयुष्याला अवघड डोंगर घाट असं म्हटलं गेलंय त्यामुळे या कठीण प्रसंगांमध्ये आपल्यासाठी महत्वाचं काय हे ठरवता आलं पाहिजे, कारण ज्याला महत्व दिलं जातं किंवा किंमत केली जाते त्याचप्रतीचं आपण प्रामाणिकपणे कार्य करू शकतो.
आणखीन वाचा:
- स्वतःच स्वतःचे नायक बना
- स्वयंनिर्मित कोट्याधीशांची 5 यशाची रहस्ये
- सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो!