लेखमालिकाशिकण्यासाठी सारे काही

४. शिक्षण – समज व गैरसमज

* इंग्रजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा 

तीन चार वर्षाच्या मुलांना असं काय शिक्षण देत असतील? ज्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखाच्या घरात जाते. हा एक न उघडलेला प्रश्न आहे. मला एक मराठी माध्यमात शिकवणारे शिक्षक सांगत होते. की त्यांच्या मुलाची पाचवीच्या वर्षाची फी ६० हजार रुपये आहे. पुढे त्यांनी सांगितलेली माहिती त्यांना आश्चर्याचा धक्का देणारी होतीच त्याचबरोबर मी विस्मयचकित झालो. ते म्हणाले की त्यांच्या शेजाऱ्याच्या मुलाचे इंजिनियरींग केवळ ४२ हजारात पूर्ण झाले आहे. (चार वर्षाची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची एकूण फी ४२००० रुपये होती.) हे एक उदाहरण आहे. 

भरमसाठ फी घेण्याला माझा विरोध नाहीच. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही विरोध नाही. जे काही घेतलं जातं त्याची किंमत ठरवण्याची एकके काय आहेत? त्याचा विचार कधी होणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय तन्मयतेने शिकवणारे शिक्षक असणाऱ्या अशा हजारो शाळा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आहेत. त्यात मिळणाऱ्या इंग्रजी भाषेचा शिक्षणाचा दर्जा म्हणावा तितका चांगला नाही हे मान्य केले पाहिजे.

मराठी शाळेत अथवा मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांमधून शिक्षण घेत असतानाच इंग्रजी शिकणे उत्तम ठरते. कारण ऑक्सफर्ड, केंम्ब्रिज व हारवर्ड विद्यापीठाने सुध्दा मान्य केले आहे की, मातृभाषेतून शिकणे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मोठमोठे उद्योजक, सिनेअभिनेत, क्रिकेटपटू, राजकारणी, नेते, कलाकारांमधील बरेचजण आपल्या शालेय जीवनात जिथे मिळेल तिथून शिक्षण घेऊन मोठे झाले आहेत. यशस्वी होणे हा वेगळा घटक आहे. सर्व ठिकाणाचे विद्यार्थी यशस्वी होतात. धीरुभाई अंबानी कोणत्याच मॅनेजमेंट च्या शाळेत गेले नव्हते. अण्णाभाऊ साठे तीन दिवसापेक्षा जास्त शाळेत गेले नव्हते. तरीही त्यांनी यश मिळवलेच. जीवनातील यश व प्रसिध्दी या गोष्टी प्रत्येकाला मिळवता येतात. त्यासाठी लागणारे परिश्रम, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास, यशस्वी होण्याची तळमळ या घटकांचा ध्यास घेतलेली माणसे कुठूनही यशस्वी होतात.

यशस्वी होणे ही कोणत्या एका ठराविक गटाची मक्तेदारी नाहीच. श्रीमंताची मुले यशस्वी होतात तशी गरिबीतून आलेली मुले सुध्दा यशस्वी होतात. शहरातील होतात त्याचप्रमाणे खेड्यातील मुलेसुध्दा यशस्वी होतात. इंग्रजी उत्तम येणारे यशस्वी होतात त्याच प्रमाणे इंग्रजीचा गंध नसणारे सुध्दा यशस्वी होतात. गरिबी-श्रीमंती, वातावरण, ठिकाण, भाषा याचा जेवढा वाटा आपल्या यशात असतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक वाटा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व अनुकुलन क्षमतेचा असतो. तुम्ही कुठेही शिकला असला तरी प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे.

तुमची मुले कुठेही शिकत असली तर त्यांना सुध्दा यश मिळवणे शक्य आहेच. हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रात एक करोडहून अधिक विद्यार्थी खेड्यात शिक्षण घेत आहेत. यातूनच उद्याचे नेते, खेळाडू, कलाकार, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योजक, वक्ते निर्माण होणार आहेत. शहरी भागात शिकणारे विद्यार्थी सुध्दा यशस्वी होतील.

जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या घटकांमध्ये शालेय शिक्षणाचा वाटा किती? या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.

तुम्ही दहावी, बारावी व पदवी (Graduation) ला असताना केलेल्या अभ्यासात तुम्हाला कितीही मार्क पडलेले असोत. (नापास होण्यापासून १०० टक्क्यांपर्यंत) आज तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न परत सोडवता येतील? आजच्या जगण्यात त्या प्रश्नांच्या उत्तरांचा सहभाग किती? या दोन प्रश्नांची उत्तरे म्हणजे आपल्या जीवनात यशस्वी होण्यात असणारा शिक्षणाचा वाटा होय.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button