दिनविशेष

डॉन ब्रॅडमन (Don Bradman): क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात महान फलंदाज

नमस्कार, आजच्या या भागात आपण बोलणार आहोत एका डॉन विषयी. नाही नाही हा कोणी गँगस्टर नाही… तर  क्रिकेट जगतातील अनभिषिक्त सम्राट, ज्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे त्याला डॉन म्हटलं जातं, ते सर डॉन ब्रॅडमन. 

या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी कूटामंड्रा, न्यू साऊथ वेल्स येथे झाला. डोनाल्ड जॉन ब्रॅडमन त्यांच्या भावंडांत सर्वात लहान होते. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटचे आणि गणिताचे प्रचंड वेड. त्यांनी गणितातच आपले करियर करायचे होते मात्र क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ब्रॅडमन यांनी विजयाची गणितं अगदी सहज सोडवली आणि क्रिकेट जगतातील सर्वोच्च विक्रमांच्या नोंदी आपल्या नावे केल्या. 

लहान असताना ते स्वतः घरातल्या पाण्याच्या टाकीचा भिंतीसारखा वापर करून त्यावर बॉल फेकून एकटेच खेळायचे. त्याचा फायदा म्हणजे विवध ऍंगलचे बॉल कसे खेळायचे याचा त्यांना लहानपणीच सराव झाला होता. 

वयाच्या बाराव्या वर्षीच फॉर्मल क्रिकेट खेळताना त्यांनी शतक पूर्ण केले. 1927-28 च्या हंगामापासून ते राष्ट्रीय स्पर्धेत न्यू साऊथ वेल्थ संघाकडून खेळू लागले. पहिल्याच सामन्यात वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी तब्बल 188 धावा काढल्या. दुसऱ्या वर्षी व्हिक्टोरिया विरुद्ध त्याने नाबाद ३४० आणि तिसऱ्या हंगामात क्वीन्सलँडविरुद्ध नाबाद ४५२ धावा कडून क्रिकेटप्रेमींना अचंबित करून टाकले. ऑस्ट्रेलियातर्फे इंग्लंडविरुद्ध खेळताना स्वतःच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात त्यांनी 112 धावा काढून शतक  झळकवले होते. २४ सामन्यांत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते. त्यांत त्यांनी  १५ विजय मिळविले व फक्त ३ वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. उर्वरित सहा सामने अनिर्णित राहिले. त्यांच्या नेतृत्वाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कप्तान म्हणून त्याने एकदाही मालिका गमावली नाही. १९४८ सालच्या इंग्लंड दौऱ्यात तर त्याचा संघ एकही सामना न हरता, विजयाधिक्य मिळवून परत आला.

त्यांच्या धडाकेबाज, वेगवान आणि सातत्यपूर्ण खेळामुळे ब्रॅडमन म्हणजे धावा जमविणारे यंत्र असे समीकरण तयार झाले. २९ शतकं, १३ अर्थशतकं, दोन त्रिशतकं अशी अवर्णनीय कामगिरी करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू ठरले. या शिवाय ब्रॅडमन यांनी तब्बल १२ वेळा द्विशतकं केली. 

इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने १९३१ साली एक स्फोटक खेळी केली होती. त्यात त्यांनी फक्त ३ षओव्हरमध्ये शतक पूर्ण केले. आता हे ऐकून तुम्ही विचारात पडला असाल. पण हे खरोखरच घडले होते. १९३१ साली ब्लॅकहीथ इलेव्हनकडून खेळताना त्यांनी लिथगो संघाविरुद्ध हा पराक्रम केला होता.

ब्रॅडमन यांनी त्या डावात १४ षटकार तर २९ चौकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात त्यांनी २५६ धावा केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ३ षटकात फक्त १८ चेंडू असतात आणि त्यात शतक कसे काय होईल. सध्या आयसीसीच्या नियमानुसार एक षटकात ६ चेंडू टाकले जातात पण एकेकाळी क्रिकेटमध्ये एका षटकात ८ चेंडू टाकले जात असत.

धावा जमविण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यांच्याकडे होती. म्हणूनच की, की शतक पूर्ण झाल्यावरही ते पुढची धाव काढत असत. आणि तीही जणू काय आपण पहिलीच धाव घेतो आहोत इतक्या दक्षतपूर्वक आणि जबाबदारीने. कारण कदाचित त्यांचे पुढचे लक्ष दोनशे धावांचे असे. 

त्यांना ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या निवड समितीवर अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली. एम्. सी. सी. अर्थात  मेलबर्न क्रिकेट क्लबने  त्यांना आजीव सभासदत्व दिले. तसेच ब्रॅडमन यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होण्याचा मान लाभला. याशिवाय पत्रकार व नभोवाणीवरील क्रिकेट तज्ञ म्हणूनही क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळाली.

क्रिकेट विश्वातील असामान्य अनुभवातून त्यांनी काही पुस्तके देखील लिहिली. फेअरवेल टू क्रिकेट हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. माय क्रिकेटिंग लाइफ, हाऊ टू प्ले क्रिकेट, द आर्ट ऑफ क्रिकेट अशी क्रीडाविश्वात भर घालणारी पुस्तके लिहून क्रिकेटविश्वात आपले भविष्य घडवू  पाहणाऱ्या अनेक खेळाडूंना प्रेरणा दिली.    

त्यांच्या क्रिकेट विश्वातील या अनोख्या कामगिरीमुळे त्यांना 1949 साली ब्रिटिश शासनाच्या ‘’सर’’ हा किताबाने सन्मानित करण्यात आले. 

हे झाले क्रिकेट विश्वाबद्दलचे  

99.94 सरासरीने फलंदाजी करणाऱ्या ब्रॅडमन यांना संगीताचा व्यासंग प्रचंड होता. त्यांनी  काही गाण्यांना संगीतही देखील दिले. ‘एव्हरी डे इज अ रेन्बो डे फॉर मी’ हे गाणं ब्रॅडमन यांनी 1930 साली संगीतबद्ध केले. शिवाय, पियानिस्ट म्हणूनही त्यांनी दोन गाणी केली. 

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button