अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या उद्योगातून जगप्रसिद्ध ल्युपिन फार्मा कंपनी साकारणारे देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन
राजस्थानातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या या मुलाने लहान असताना शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगले होते, पण प्रत्यक्षात नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुढे जाऊन त्याने औषध उद्योग क्षेत्रात नाव कमावणारी‘ल्युपिन’ ही नामांकित कंपनी स्थापन केली. ल्युपिन समूहाचे ते संस्थापक व अध्यक्ष. त्यांचे नाव डॉ. देशबंधू गुप्ता. ते‘डीबी’ या नावाने सर्वाना परिचयाचे होते.
२६ जून २०१७ रोजी त्यांचे निधन झाले. प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाच वर्षांपूर्वीच ल्युपिनची सूत्रे कन्या विनिता गुप्ता व पुत्र नीलेश गुप्ता यांच्याकडे सोपवली होती. ल्युपिनने गेल्या दशकात किमान १२ कंपन्या अधिग्रहित केल्या, त्यातील सहा कंपन्यांचे अधिग्रहण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले.‘गॅव्हिस’ या ८८ कोटी डॉलर्सच्या अमेरिकी जेनरिक औषध कंपनीचे अधिग्रहण ल्युपिनने केले; ते कुठल्याही भारतीय औषध कंपनीने केलेले सर्वात मोठे अधिग्रहण.
‘डीबी’यांचा जन्म राजस्थानातील राजगडचा. रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते पिलानीच्या बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक होते. कालांतराने त्यांनी औषध उद्योगात उतरून मानवाला सतावणाऱ्या रोगांशी लढण्याचे ठरवले, त्यातूनच मुंबईत येऊन ‘ल्युपिन लिमिटेड’या कंपनीची स्थापना १९६८ मध्ये केली. पत्नीने वाचवलेल्या पैशातून त्यांनी पहिल्यांदा जीवनसत्त्व निर्मितीचा उद्योग सुरू केला. अवघ्या पाच हजार रुपये भांडवलातून सुरू केलेल्या या छोट्या उद्योगातून पुढे ४.८ अब्ज डॉलर्सची कंपनी साकारली. २००३ पर्यंत ते कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणे हे तसे धाडसाचे; पण‘डीबीं’नी ल्युपिनमुळे औषधनिर्मितीत एक गतिशील वातावरण तयार केले.
त्याचबरोबर काही मूल्यांचा वारसा तयार केला. ही देशी औषध कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. बीएसई सेन्सेक्स ३० कंपनी म्हणून ओळखली जाणारी ल्युपिन ही जेनरिक (प्रजातीय) औषध निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठ भांडवलीकरणात जगातील दहाव्या क्रमांकाची कंपनी आहे. जागतिक महसुलाचा विचार करता ती भारतातील चौथ्या क्रमांकाची औषध कंपनी आहे. जपान व दक्षिण आफ्रिका या देशात ल्युपिन अनुक्रमे सहाव्या व चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या कंपनीची उलाढाल ४.८ अब्ज डॉलर्सहून अधिक असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्या मध्य प्रदेशातील पिथमपूर येथील उत्पादन प्रकल्पाबाबत काही निरीक्षणे मांडली होती.
डॉ. गुप्ता यांनी १९८८ मध्ये ग्रामीण भागातील दारिद्रय़ दूर करण्यासाठी ल्युपिन ह्य़ूमन वेल्फेअर अॅण्ड रीसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्यामुळे ३४६३ खेडय़ांतील २८ लाख लोकांना लाभ झाला. विपश्यनेचे ते साधक होते व त्यांनी ग्लोबल विपश्यना फाउंडेशनचे विश्वस्त, तसेच जुहूच्या इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. २०१५ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा २५४ वा क्रमांक होता. क्षयरोगावरील औषधांसाठी ल्युपिन कंपनी प्रसिद्ध आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीने या औषधांची निर्मिती सुरू केली, कालांतराने त्यातील नफा कमी झाला, तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पत्नी मंजू यांचा सल्ला घेतला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘हमारी रोटी तो हमें मिल रही हैं ना’ त्यानंतर क्षयाच्या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.
‘क्षयरोगाविरोधात लढाई सोडता कामा नये, कंपनीला खोट आली तरी बेहत्तर’ हा त्यांच्या पत्नीने दिलेला सल्ला मोलाचा ठरला, असे ते सांगत. आज क्षयाच्या जगातील औषध विक्रीत ल्युपिनचा वाटा तीन टक्के आहे. गरजूंना किफायतशीर किमतीत औषधे उपलब्ध करून देत मानवसेवेचे व्रत घेतलेले गुप्ता हे उद्योजकाइतकेच संवेदनशील माणूस म्हणूनही अनेकांच्या लक्षात राहतील.
सौ. लोकसत्ता, व्यक्तिवेध
आणखी वाचा
- जगप्रसिद्ध अंतराळ संशोधक स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिन.
- यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी
- ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक, अग्रगण्य कादंबरीकार वि. स. खांडेकर