फिरण्याचा शौक कोणाला नसतो. सगळेचजण फिरण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. सुट्टी असेल तर कधी एकदा बाहेर फिरायला जातो. एखाद्या मस्त, निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतो असं वाटतं. काहींना एकदम Luxurious जीवनाचा आनंद लुटायचा असतो तर काहींना या धावपळीपासून दूर शांत निसर्गाच्या सानिध्यात चार क्षण आनंदाचे घालवायचे असतात. तुम्ही देखील जर निसर्गप्रेमी असाल तर दांडेली हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
उत्तर कर्नाटकात स्थित असलेलं दांडेली म्हणजे कर्नाटकातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं अभयारण्य. फारच कमी माणसांची वर्दळ, स्वच्छ प्रदूषणमुक्त हवा, हिरवागार निसर्ग, लहान लहान कौलारू घर, लहानश्या टपऱ्या आणि एखाद-दुसरं हॉटेल अशा वातावरणात असलेलं दांडेली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडीच्या झुलत्या कमानी पाहिल्या की, वाटतं दांडेली जणूकाही आपल्या स्वागतासाठीच नटलेली आहे. त्या गर्द झाडीची शहरी लोकांना भीती वाटू शकते पण तिथली स्वच्छ हवा, पक्षांचा मंत्रमुग्ध करून टाकणारा किलबिलाट, काळी नदीचा शांत प्रवाह एकूणच सगळं वातावरण पाहिलं की दोन – तीन दिवस तरी तिथून मुक्काम हलवावा नाही वाटत.
866.41 चौरस किलोमीटर परिसर असलेल्या या परिसरात वाघ, हत्ती, हरीण, बिबट्या, गुबगुबीत ससे असे अनेक प्राणी आहेत. अनेक वेगवेगळे पक्षी देखील आहेत. चित्तथरारक जंगल सफारी करून तुम्ही हे प्राणी जवळून अनुभवू शकता. तसेच River Rafting, White Water Rafting, Spice Plantation Tour, Swimming असे अनेक अविस्मरणीय अनुभव देखील तुम्ही घेऊ शकता. भर दुपारी देखील जंगलाच्या गर्द झाडीमुळे रस्त्यावर प्रकाशाला अजिबात थारा नसतो.
पुण्याहून दांडेलीचा रस्ता जवळपास 442 किलोमीटरचा आहे. पुणे- सातारा हायवेने कोल्हापूर मधून बेळगाव वरुन 2 तासात तुम्ही दांडेलीला पोहोचू शकता. पुण्याहून 8 – 8.30 तासांचा प्रवास करून जरी थकवा आला असेल तरी तिथल्या शांत वातावरणाने हा थकवा अगदी चुटकीसरशी निघून जातो.
निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दांडेली शिवाय दूसरा कोणताच पर्याय असू शकत नाही त्यामुळे विस्मयकारक, रोमांचित आणि निसर्ग समृद्धीने भरपूर असा दांडेली परिसर आणि दांडेली अभयारण्य प्रत्येकाने निदान एकदा तरी पहावेच.
आणखी वाचा
- तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?
- स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!
- महा सौंदर्य महाराष्ट्राचं !