या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

या चुकांमुळे खराब होतो तुमचा CIBIL स्कोअर! सुधारण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या कसे ते जाणून घ्या.
नुकतीच मूर्तिजापूरमध्ये एक अनोखी घटना घडली. लग्नाच्या सर्व तयारीनंतर शेवटच्या टप्प्यावर असताना, फक्त नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे वधूच्या नातेवाईकांनी हे लग्न मोडले. ही घटना ऐकायला हास्यस्पद वाटू शकते, पण यावरून सिबिल स्कोअरचे महत्त्व अधोरेखित होते.
सिबिल स्कोअर म्हणजे तुमचा आर्थिक शिस्तबद्धतेचा एकप्रकारे आरसाच असतो. हा स्कोअर तुमच्या क्रेडिट इतिहासावर आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेवर आधारित असतो. बँका किंवा इतर वित्तीय संस्था जेव्हा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करतात, तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासतात. कमी सिबिल स्कोअर म्हणजे खराब क्रेडिट व्यवस्थापन, थकीत हप्ते किंवा वित्तीय अस्थिरतेचे लक्षण असते .
अनेकदा काही नकळत झालेल्या चुका आपल्या सिबिल स्कोअरवर विपरीत परिणाम करतात. या लेखात अशा कुठल्या चुका सिबिल स्कोअर खराब करू शकतात आणि त्यांच्यावर काय उपाय करावे यावर एक नजर टाकूया.
क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करणे किंवा बंद करणे
वारंवार क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे आणि ती बंद करणे यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता, तेव्हा बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरची तपासणी करतात,ज्याला “हार्ड इन्क्वायरी” म्हणतात. या चौकश्या वारंवार झाल्यास तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज किंवा इतर क्रेडिट सुविधा मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, फक्त गरज असेल तेव्हाच नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा.
क्रेडिट कार्ड बंद करताना देखील काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही एखादे कार्ड बंद करता, तेव्हा तुमच्या एकूण उपलब्ध क्रेडिट मर्यादेत घट होते, ज्यामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशो (उपयोग केलेली क्रेडिट रक्कम आणि एकूण उपलब्ध क्रेडिट यामधील प्रमाण) वाढतो. हा रेशो जास्त असल्यास CIBIL स्कोअर कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला एखादे कार्ड बंद करायचे असेल, तर आधी दुसऱ्या कार्डाचा योग्य वापर सुरू करावा आणि उपलब्ध क्रेडिट मर्यादेचे संतुलन राखावे, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोअर प्रभावित होणार नाही.
क्रेडिट कार्डचा अयोग्य वापर
क्रेडिट कार्ड उपयोगी असले तरी त्याचा जास्त वापर आर्थिक अडचणीत टाकू शकतो. अनेक जण मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यामुळे त्यांचे CIBIL स्कोअर कमी होते, आणि भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. क्रेडिट युटिलायझेशन रेशो 30% च्या आत ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच, तुमच्या कार्डची मर्यादा ₹1,00,000 असेल, तर दरमहा ₹30,000 पेक्षा जास्त खर्च टाळा, नाहीतर उच्च व्याजदराचा फटका बसू शकतो.
तुमच्या क्रेडिट कार्डचा शिस्तबद्ध आणि मर्यादित वापर करा. शक्यतो मर्यादेपेक्षा कमी खर्च करा आणि बिल वेळेआधी भरण्याची सवय ठेवा, यामुळे अतिरिक्त व्याज आणि विलंब शुल्क टाळता येते. क्रेडिट कार्ड फक्त तात्पुरत्या गरजांसाठी वापरा आणि गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्याची सवय टाळा. योग्य नियोजन आणि जबाबदारीने वापर केल्यास क्रेडिट कार्ड तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाला मदत करू शकते.
बिल आणि कर्जाचा हप्ता वेळेवर न भरणे
कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होते. तसेच, उशीर झाल्यास दंड भरावा लागतो आणि क्रेडिट हिस्ट्री देखील खराब होते, ज्यामुळे आर्थिक ताण वाढतो आणि विश्वासार्हतेवर परिणाम होतो.
म्हणून सर्व EMI आणि क्रेडिट कार्ड बिलं वेळेवर भरण्याची सवय लावा. विसरण्याची शक्यता टाळण्यासाठी ऑटो-डेबिट सुविधा सुरू करा. शक्य असल्यास, बिल वेळेआधी भरा, यामुळे CIBIL स्कोअर सुधारतो आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात. योग्य नियोजन केल्यास कर्ज आणि क्रेडिट कार्ड हाताळणे सोपे होण्यास मदत होते.
फक्त क्रेडिट कार्ड किंवा एकाच प्रकारचे क्रेडिट वापरणे
जर तुमच्याकडे फक्त क्रेडिट कार्ड असेल आणि कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुमच्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये विविधता नसल्यामुळे CIBIL स्कोअर वाढण्यास वेळ लागतो. जर तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये फक्त क्रेडिट कार्डच असेल, तर भविष्यात गृहकर्ज, कार लोन किंवा कोणतेही मोठे कर्ज घेणे कठीण होऊ शकते, कारण बँकांना विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्याचा तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दिसत नाही.
त्यामुळे, केवळ क्रेडिट कार्डवर अवलंबून न राहता, गरजेनुसार लहान कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे फायदेशीर ठरते. मात्र, कोणतेही कर्ज घेतल्यानंतर ते वेळेवर फेडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित आणि शिस्तबद्ध परतफेड केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो आणि भविष्यात मोठे कर्ज सहज मिळू शकते. तसेच, विविध प्रकारच्या कर्जाची परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट मिक्समध्ये सुधारणा होते, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक विश्वासार्ह ठरता.

गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट म्हणून जबाबदारी न समजणे
जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी गॅरेंटर किंवा सह-अप्लिकंट असाल आणि त्या व्यक्तीने हप्ता वेळेवर भरला नाही, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. अनेकांना हे माहिती नसते, त्यामुळे नातलग किंवा मित्रांसाठी गॅरेंटर होण्याचा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
गॅरेंटर होण्यापूर्वी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि कर्ज फेडण्याची क्षमता नीट तपासा. गरज नसताना कोणासाठीही गॅरेंटर होऊ नका, कारण जर त्यांनी हप्ता न भरल्यास तुमचा CIBIL स्कोअरही खराब होऊ शकतो आणि भविष्यात कर्ज घेणे कठीण जाऊ शकते.
मित्रांनो आजच्या काळात चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत गरजेचे आहे. कर्ज घेणे, क्रेडिट कार्ड वापरणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी बँक आणि वित्तीय संस्था तुमचा CIBIL स्कोअर तपासतात. जर हा स्कोअर कमी असेल, तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
आणखी वाचा:
- शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी
- कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?
- भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा