शेतीशेतीजगत

जाणून घ्या चंदन शेतीविषयी संपूर्ण माहिती

चंदन’ या वृक्षाचा वापर होम, हवन, तसेच आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. एवढंच काय तर सौंदर्य प्रसाधानांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे; कारण चंदन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चंदन शेतीतून चांगले उत्पन्न मिळवण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. चंदन शेतीविषयी आपल्या मनात अनेक समज, गैरसमज असतात ते कळण्यास या लेखाच्या माध्यमातून मदत होईल. 

चंदन लागवड करत असताना सर्वप्रथम हे समजून घ्या की, यासाठी कोणतीही सरकारी परवानगी लागत नाही. पण काही  कायदेशीर बाबी आहेत त्या मात्र वेळोवेळी पूर्ण करून घ्याव्या लागतील. चंदनाची लागवड केल्यावर पहिल्यांदा तलाठ्याकडून सात-बारा वर नोंद करून घ्यावी. जर तुम्ही चंदन लागवड करत असाल तर सरकारकडून तीन टप्प्यात हेक्टरी 45,000 इतके अनुदान मिळेल. शेवटी झाडे तोडताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी. अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याला भेटावे.   

चंदनाच्या झाडाची उंची 12 -15 मीटर असते आणि घेर 2-2.5 असतो. याची पाने सदाहरित असतात. त्यांचा आकार अंडाकार असतो आणि ते टोकाला निमुळते होत जातात. खोड सुरवातीला लहान असते, तेव्हा ते मऊ असते. जसजसे झाड मोठे होते तसे ते मजबूत आणि उभ्या चीरांचे बनते. चंदनाचे लाकूड कठीण असते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण 1-6% असते. लाकडाचा बाहेरचा भाग कडक आणि सुगंध रहित असतो, तर आतला भाग पिवळस ते तपकिरी आणि सुगंधी असतो. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून ते पिवळसर असते. फळाचा वरचा भाग लुसलुशीत आणि गरयुक्त असून त्यामध्ये बी मिळते. हे बी काढून त्यापासून रोपे तयार केली जातात. 

रोपे कशी तयार करावीत- 

लहान रोपे अति सूर्यप्रकाशात किंवा कमी पाण्यामुळे सुकून जातात. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. पहिला एक महिना हे बी सुप्तअवस्थेत असल्याने त्यावर पाणी आणि सूर्यप्रकाशाचा परिणाम होत नाही. यासाठी 50 ml जर्मिनेटर, 50 ml प्रिझम, आणि एक लिटर पाण्यात बी भिजवून ठेवावे. असे केल्यास एक महिन्यातच अंकुर दिसायला लागतील. 

गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत

गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे, तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मीटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेमी उंची ठेवावी. यामध्ये लाल माती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे आच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.

पिशवीत रोपे लावणे

बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकावी व रोपांच्या पिशव्या अधूनमधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडी योग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियांपासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.

कधी करावी लागवड

मान्सून सुरु होताच जुलै-ऑगस्ट महिन्यात या रोपांची लागवड करावी. त्यासाठी मार्च महिन्यात 16×12 अंतरावर 1.5×1.5×1.5 फुटाचे खड्डे खोडून घ्यावेत. या खड्ड्यांमध्ये निंबोळी खत किंवा सेंद्रिय खत टाकावे आणि पहिला पाऊस झाल्यावर रोपे लावावीत. चंदन हा एक अर्धपरजीवी वृक्ष आहे. त्यासाठी आधार म्हणून एक मजबूत झाड असावे. 

आवश्यक हवामान आणि जमीन

चंदनाचे झाड 600 ते 1600 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या क्षेत्रात येते. यासाठी 12-45 डिग्री सेल्शियस तापमान योग्य मानले जाते.  थंड हवामान, मध्यम पर्जन्यमान आणि भरपूर सूर्यप्रकाश या वनस्पतीसाठी पोषक ठरतो. चंदनाच्या झाडासाठी लाल, काळी माती, चिकणमाती, लोहयुक्त वाळूमिश्रीत जमीन पोषक ठरते. जमिनीचा सामू  6.5- 8 च्या दरम्यान असावा.

जोपासणी

चंदनाच्या झाडाला पाहिल्या वर्षी आठवड्यातून 2 -3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. पावसाची कमतरता असल्यास झाडाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या चंदनाचा भाव 12000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो असा आहे.


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button