यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी
भारत फोर्ज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्री. कल्याणी यांनी भारत फोर्जची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवनव्या कल्पनांना मूर्त रूप देत कंपनीला यशोशिखरावर नेले. श्री. कल्याणी यांची ओळख प्रथितयश उद्योगपती एवढीच नाही तर अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे अध्वर्यू व आधारस्तंभ अशी आहे. यंत्रांनाच देव मानून सतत कार्यशील राहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाविषयी…
नवनिर्मितीचा ध्यास आणि नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची चिकाटी याच्या जोरावर “भारत फोर्ज‘ या वाहनांच्या सुट्या भागाचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले. त्याचे प्रणेते आहेत अर्थातच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष बाबा कल्याणी. कारखाना म्हणजे देवालय, मशिन म्हणजे देव आणि उत्पादन म्हणजे देवाची भक्ती अशी त्यांची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या जोरावरच त्यांनी भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचविले. त्यांच्या नेतृत्वाखालील कल्याणी उद्योगसमूहाने आज ऑटोमोबाइलबरोबरच तेल व नैसर्गिक वायू,ऊर्जा, बांधकाम, खाण, रेल्वे इंजिन, जहाज व विमान, युद्धसामग्री अशा विविध क्षेत्रांत डौलाने आपला झेंडा फडकाविला आहे. 1972 मध्ये सेल्स इंजिनिअर या पदापासून त्यांची भारत फोर्जमधील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. सरव्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि कंपनीही. आज त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच कंपनीची आर्थिक उलाढाल 2.5 अब्जच्या घरात जाऊन पोचली आहे.
>> संस्कारांचे बाळकडू
वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच बाबांना बेळगावच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले. वास्तविक हे वय खेळण्या-बागडण्याचे; पण याच वयात त्यांना सर्व बालसुलभ गोष्टी बाजूला ठेवून लष्कराच्या कडक शिस्तीत वावरावे लागले. बेळगावचे हे सैनिक स्कूल देशातील नामांकित शाळांपैकी एक. आर. एस. मणी हे त्यावेळी या शाळेचे प्राचार्य होते. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण झालेले प्राचार्य मणी कडक शिस्तीचे. त्यांचा हात पाठीवरून फिरला आणि बाबांचे आयुष्यच बदलून गेले. बाबांनी शिस्त, वेळेचे महत्त्व आणि व्यक्तिमत्त्व विकास ही त्रिसूत्री आयुष्यभर जपली.
गुजरातमधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. येथे त्यांनी चमक दाखवताना सातत्याने पहिला-दुसरा क्रमांक राखला. येथील शिक्षण संपवून त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टन येथील एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अगदी त्या काळातही तेथील प्रवेशासाठी अत्यंत कठीण असणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागायची. बाबांनी ही कठीण परीक्षा अगदी सहज दिली. एमआयटीमधील पदवी पाच सेमिस्टरची होती; पण बाबांनी कठोर मेहनत, नावीन्याचा ध्यास आणि शिस्तीचे संस्कार याच्या जोरावर तीन सेमिस्टरमध्येच पदवी पूर्ण केली. त्याच काळात तेथील “सिप्को‘ या कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स स्मिथ यांनी “इलेक्ट्रो केमिकल‘ मशिनचे नवे तंत्र विकसित केले होते. बाबांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा शोधनिबंधही याच विषयावर होता. त्यामुळे चार्ल्स स्मिथ हे त्यांचे प्रेरणास्थान बनले. अमेरिकेत त्यांनी त्यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांचा अनुभव घेतला. याच अनुभवाच्या शिदोरीवर त्यांनी “भारत फोर्ज‘ कंपनीला यशोशिखरावर पोचविले.
बाबांचे अमेरिकेत शिक्षण सुरू असतानाच इकडे पुण्यात “भारत फोर्ज‘च्या उभारणीचे काम वेगाने सुरू झाले होते. 1964-65चा तो काळ होता. बाबा सुटीला पुण्यात आले, की त्यांचा पूर्ण वेळ या प्लॅंटवरच जात असे. तेथे सुरू असलेल्या यंत्रजोडणीच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या जिद्दी वृत्तीमुळेच भारत फोर्जमधील यंत्रांना आकार मिळाला आणि त्यांच्या आयुष्यालाही!
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते थेट भारत फोर्जमध्येच दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे. अवजड उद्योगात आधुनिक तंत्राचा वापर कसा करता येईल, याचे बाळकडू त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाले होते. त्यामुळेच ‘भारत फोर्ज‘ला अत्याधुनिक बनविण्याचा ध्यासच त्यांनी घेतला. 1971 मध्ये सेल्स इंजिनिअर पदापासून त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ झाला. गतिमान आयुष्य आणि झपाटून काम करण्याची जीवनशैली त्यांना अमेरिकेतील शिक्षणात मिळाली होती. याच गुणांच्या आधारावर त्यांनी भारत फोर्जमधील कामाला प्रारंभ केला. वेळेचे महत्त्व, कमालीची शिस्त आणि गुणवत्तेत तडजोड न करण्याची भूमिका या त्रिसूत्रीचा त्यांनी स्वतः तर अवलंब केलाच; पण कंपनीतील प्रत्येकाला त्याचा अवलंब करण्यास भाग पाडले.
बाबांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते कंपनीचे सरव्यवस्थापक बनले. नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविले. बाबांच्या नेतृत्वाखाली कंपनीने जेवढ्या ऑर्डरी होत्या त्या तर वेळेत पूर्ण केल्याच; पण त्यापेक्षाही अधिक उत्पादन घेतले. त्यामुळे त्यांनी हे जादाचे उत्पादन निर्यात करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या सरव्यवस्थापक पदाच्या काळातच भारत फोर्जने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली.
भारत फोर्जला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवतानाच त्यांनी दोन विदेशी कंपन्या खरेदी केल्या व त्या यशस्वीपणे चालवूनही दाखविल्या. त्यापैकी एक कंपनी होती जर्मनीतील सीडीपी फोर्जिंग नावाची. त्यानंतर तेथेच आणखी एक कंपनीही त्यांनी खरेदी केली. या कंपनीत वाहनांसाठी लागणारे सुटे भाग ऍल्युमिनिअमपासून तयार करण्यात येत होते. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यांनी या कंपनीतही व्यावसायिक यश मिळवून दाखविले. भारत फोर्जचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी दबदबा निर्माण केला.
कल्याणी उद्योगसमूहाच्या माध्यमातून इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांत धवल यश संपादन केले. हे सर्व करतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यामुळेच त्यांनी पुण्यात “प्रथम ट्रस्ट‘ नावाची बिगरशासकीय संस्था (एनजीओ) स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी शाळा सुरू केल्या. नांदेडला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. कामालाच देव मानून त्यांनी झपाटून केलेल्या कामामुळेच कल्याणी उद्योगसमूह देशातीलच नव्हे तर जगातील एक नामांकित उद्योगसमूह बनला. याचे सर्व श्रेय जाते ते बाबा कल्याणी यांच्या कल्पकतेला, धडाडीला, कामालाच ईश्वर मानण्याच्या त्यांच्या श्रद्धेला.
– अनिल सराफ, दै. सकाळ
तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे कमेंटबॉक्समध्ये नक्की सांगा. लेख आवडला असेल तर लाइक आणि subscribe जरूर करा आणि हो अजून कोणत्या विषयाची माहिती ऐकायला तुम्हाला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.