आर्थिकटिप्स

कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?

कॅश क्रंचचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे बुध्दी चालायची बंद होते. सगळे लोक पैसे मागत असतात व तुम्हाला मालक असूनही तोंड चुकवून पळावे लागते. कर्मचाऱ्यांना पगार वेळेत न दिल्याने कंपनी बुडणार आहे, अशा अफवा पसरतात, कंपनीचे एकूण वातावरण खूप वाईट होते व बरेच चांगले कर्मचारी नोकरी सोडून जातात. चेक बाऊन्स झाल्याने बिझनेस मार्केटमधून उठला, असा समज होतो.

१. विक्रेत्यांशी चर्चा करा

तुमच्याकडे किती पैसे आणि कधी येणार आहेत यावर कदाचित तुमचे नियंत्रण नसेल, परंतु तुमच्याकडून जाणाऱ्या पैशांवर तुम्ही नक्कीच नियंत्रण करू शकता. विक्रेत्यांना/पुरवठादारांना काही कालावधीसाठी थांबवता येईल का ते बघा किंवा एकदम सर्व पैसे देण्याऐवजी टप्प्याटप्याने पैसे देणं हा सुद्धा चांगला मार्ग आहे. बरेच व्यावसायिक आपल्या विक्रेत्यांशी बोलायला कचरतात. त्यांना वाटते की, आपली ‘इज्जत’ कमी होईल किंवा समोरची व्यक्ती कमी पैसे घ्यायला तयारच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या. विक्रेते/पुरवठादार सुद्धा तुमच्यासारखेच व्यावसायिक असतात. त्यांनीसुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलेला असतो. त्यामुळे ते तुमची अडचण समजू शकतात.

तसेच त्यांनासुद्धा आपला ग्राहक (तुम्ही) टिकवायचा असतो. जर तुमच्यासोबतचा त्यांचा अनुभव चांगला असेल तर ते नक्कीच तुमची मदत करतील. जेणेकरून दोघांचा फायदा होईल. त्यामुळे किती पैसे येणार आहेत याचा अंदाज घ्या. एकूण किती पैसे द्यावे लागणार आहेत? त्यात कुणाला तातडीने द्यावे लागतील? कुणाला काही कालवधीसाठी थांबवू शकतो? त्यांना फोन करा, चर्चा करा. आणि त्यानुसार नियोजन करा.

२. अनावश्यक खर्च लांबणीवर टाका

‘कडकी’ चालू असताना आपला खर्च कुठे होतोय याचा बारीक विचार करा. त्यातील काही खर्च लांबणीवर टाकता येतात का किंवा पूर्णपणे काढून टाकता येतात का ते पाहा. तात्पुरत्या स्वरूपात, तुम्ही मालाचा आठवड्याला/महिन्याला जो स्टॉक भरून ठेवता तो कमी भरणं हा सुद्धा चांगला पर्याय आहे. जेवढा खर्च कमी कराल तेवढे जास्त पैसे तुमच्याजवळ खर्चासाठी उपलब्ध होतील.

३. निरुपयोगी गोष्टी विकून टाका

समजा एखादे नवीन उत्पादन करण्यासाठी एखादी मशीन दोन वर्षांपूर्वी तुम्ही विकत घेतली होती. पण तुमचे नियोजन फसले. ती मशीन तुमच्या कार्यालयात तशीच पडून आहे. ती विकू शकता का? कदाचित तुमच्याबाबतीत मशीन नसेल, एखादा कंप्यूटर, गाडी किंवा इतर काहीही असू शकते. जे तुम्ही विकू शकता. अशा गोष्टींचा अंदाज घ्या. त्यांची किंमत ठरवा. ऑनलाईन किंवा ऑफलाईन विक्रीस ठेवा. विकताना जास्त आढेवेढे न घेता व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच पैसा उपलब्ध होईल. 

४. पेमेंटवर सूट द्या.

आपल्याच पैशांसाठी वाट बघत बसणं जिकिरीचं असतं. अशावेळी तुमच्या सर्व ग्राहकांशी संपर्क साधा आणि पेमेंट बाबत विचारा. काहींची मुदत संपायला (नूतनीकरण) अजून वेळ असेल. अशा लोकांना थोडीफार सूट (विशेष लाभ) देऊ शकता. त्यांना परिस्थितीची कल्पना द्या. ‘जर तुम्ही मुदतपूर्तीच्या आधी पेमेंट केलं, तर तुम्हाला सूट मिळेल’ असं सांगून बघा. अर्थात, सूट देताना कमीत कमी द्या. मुख्य उद्दिष्ट आपल्याला लागणारे पैसे उभे करणं हे असावं. अशाच प्रकारे सर्व ग्राहकांशी बोलून घ्या. कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकणारे परिणाम मिळतील आणि तुमची पैशांची चिंता मिटेल.

५. फ्लॅश सेल सुरु करा

तुमच्याकडे तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस असेलच. त्यांचे फोन नंबर, ईमेल आयडी असतील. कदाचित त्या ग्राहकांनी कोणत्या वस्तू किंवा सेवा आधी वापरल्या आहेत याची सुद्धा माहिती असेल. याच ग्राहकांसाठी तुमच्या सर्वात लोकप्रिय वस्तू/सेवांवर एखादी ऑफर सुरु करा. किंमत आकर्षक ठेवा. फक्त डिस्काउंट देऊ नका. ऑफर अशी असली पाहिजे की, लोकांचं लक्ष आकर्षून घेईल आणि त्यांना खरेदी करायला भाग पाडेल.

तसेच ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच ठेवा, कदाचित ४८ तास किंवा पुढील ५ दिवस. त्यानंतर ही ऑफर कधीच असणार नाही असं सांगा. ही माहिती देणारा संदेश तुमच्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना बल्क ईमेल/मेसेज करा. फक्त एकच ईमेल पाठवून थांबू नका. अनेक लोक रोज ईमेल बघत नाहीत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे ईमेल/मेसेज पाठवून वेळ संपत चालल्याची आठवण करून दिली पाहिजे. तुमची सेल्स आणि मार्केटिंग टीम सुद्धा व्यक्तिशः फोन करून जास्तीत जास्त बिझनेस मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.  

६. वस्तू/सेवांच्या किंमतीवर पुनर्विचार करा

किंमत वाढवणे हा सुद्धा व्यवसायाचा एक भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तेव्हा या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. अर्थात वस्तूंचे/सेवांचे दर वाढवण्याआधी पूर्ण विचार करा. तुमचा एकूण खर्च किती आहे? त्याबदल्यात तुम्ही किती रक्कम आकारत आहात? तुम्ही दर वाढवून बराच कालावधी झाला आहे का? तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी तुलना करता तुमचे दर कसे आहेत? दर वाढवणे हा कॅश क्रंच मधून बाहेर निघण्याचा एक मार्ग आहे. परंतु, नियोजनबद्धपणे वाढवले पाहिजेत. नाहीतर हा पर्याय अंगलट आला तर, आहेत ते ग्राहक सुद्धा तुम्हाला सोडून जातील.    

७. कर्मचारी कमी करा, पगार लांबवा

हा सर्वात शेवटचा पर्याय असला पाहिजे. कनिष्ठ/नवीन कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेनं वरिष्ठ/जुने कर्मचारी कंपनीची परिस्थिती समजून घेऊ शकतात. पुढे अडचण येणार आहे, असे लक्षात येताच आपल्या मुख्य सहकाऱ्यांशी चर्चा करा. यातून बाहेर पडण्यासाठी वर दिलेले पर्याय वापरून काय करता येईल याची योजना बनवा. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे सहकार्य मागा.

शेवटी, एवढं सगळं करूनही समस्या सुटली नाही, तर सर्वांचे पगार करण्याइतपत पैसे कंपनीजवळ नसतील. त्यामुळे परिस्थिती सुधारेपर्यंत पगार मिळू शकणार नाही, असे सांगा. अर्थात कुठल्याही कर्मचाऱ्याला हे आवडणार नाही. परंतु अनेक कर्मचाऱ्यांनी सुद्धा कंपनीच्या वाढीसाठी भरपूर मेहनत घेतलेली असते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुमची साथ देऊ शकतात. अगदीच गरज पडली तर काही कर्मचारी कामावरून कमी करा.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button