आपण गधा मजुरी तर करत नाही ना?
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपण गधा मजुरी तर करत नाही ना?’ करायची सुरवात?
बँकेचे २० लाखांचे कर्ज काढले, महिना ३० हजार हप्ता… दुकान भाड्याने घेतले… ४ कामगार ठेवले, त्यांचा पगार ३० हजार रुपये… सर्व प्रकारचे कर महिना जवळपास १० हजार… वीजबिल, प्रवास इत्यादी किरकोळ खर्च ५ ते १० हजार… ईएमआयवर फ्लॅट व गाडी घेतली आहे, त्याचा हप्ता महिना १५ हजार जातो… शेवटी व्यवसायातून स्वतःसाठी व घरखर्चासाठी राहतात फक्त काही हजार रुपये… अशीच आहे आज असंख्य व्यावसायिकांची स्थिती… यालाच म्हणतात गधा मजुरी! व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी करतो की इतरांना पैसे वाटण्यासाठी हेच कळत नाही. वैयक्तिक जेवढा फायदा कमावता, त्यापेक्षा जास्त बँकेचे व्याज देता, दुकानाचे भाडे त्यापेक्षा जास्त देता, कामगारांना पगार त्यापेक्षा जास्त देता, असे का होते?
याची काही मुख्य कारणे आहेत. एक म्हणजे मार्केट साईज व ट्रेंडचा विचार न करता भला मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो, नंतर म्हणावा तेवढा व्यवसाय होत नाही, त्यामुळे आता करायचं काय, बंदही करता येत नाही व जोरातही चालत नाही. स्वतःचं मन स्वत:ला सतत खात असतं. वरुन दिसणारे कित्येक मोठे व्यावसायिक ह्यामुळे आतून दु:खी असतात. दुसरे म्हणजे मार्केटिंग, ब्रॅंडिंग व व्यवस्थापनात कमी पडलेले असतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय टाकला म्हणजे ग्राहक लगेच उद्यापासून आपल्या दुकानात येऊ लागतील असं होत नसतं राजाहो…! ज्यांच्याकडे शंभर फुटसुध्दा दुकान नाही, ते लाखो करोडोचा व्यवसाय करत आहेत तर ज्यांची करोडोची दुकाने, लाखोंचे फर्निचर केले आहे ते सध्या माशा मारत बसले आहेत. त्यामुळे व्यवसायात उतरताना मागचा पुढचा विचार करूनच उतरा. सुरुवातीलाच लगेच अनावश्यक खर्च ओढवून घेऊ नका. नाहीतर सगळी कमाई त्यातच जाईल. एवढी मेहनत करूनसुद्धा हातात काहीच राहणार नाही.
तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाचं नियोजन कसं करताय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.