कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती:
सलग 17 वेळा अपयश 18 व्या वेळा यश! शेअरचॅट चे सीईओ अंकुश सचदेव यांची यशोगाथा…
लेहरो से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती.
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील या ओळी मनाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जीवनात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे या ओळींमधून स्पष्ट होतं. अंकुश सचदेवा यांच्या यशाची कहाणी या ओळींचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 17 वेळा अपयश पचवून त्यांच्या इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाने सोशल मीडिया क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
अंकुश सचदेवांचा जन्म आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्याची आई सरकारी रुग्णालयात काम करत होती आणि वडील व्यापारी होते. त्यांनी आपली प्रारंभिक शिक्षण आग्रा येथील स्थानिक शाळेत घेतले. लहानपणीच त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची आवड होती. त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. आयआयटी कानपूरमधील शिक्षणाने त्यांना तंत्रज्ञान आणि नवउद्यमशीलतेची गोडी लावली. आयआयटीमधील शिक्षणानंतर अंकुशने त्यांच्या करियरची सुरुवात करण्यासाठी आपली कल्पकता आणि मेहनत एकत्र केली.
करियरची सुरुवात आणि अडथळे
आयआयटी कानपूरमधून संगणक विज्ञानात (computer science) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतल्यानंतर, आणि तब्बल 17 वेळा वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये अपयशी झाल्यानंतर अंकुशने आपल्या दोन मित्रांसह, भानु प्रताप सिंह आणि फरिद अहसान यांच्या सहकार्याने 2015 साली ShareChat ची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केले. Sharechat स्थापन तर झाले. मात्र हा प्रवास सोपा अजिबात नव्हता. समोर अनेक आव्हानं होती. अडचणी होत्या. ज्यात आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि विविध इतर आव्हानं समाविष्ट होती. तसेच सुरवातीला वापरकर्त्यांचा प्रतिसाद मिळवणे हे सर्व खूप आव्हानात्मक होते. मात्र त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मेहनत, समर्पण आणि दृढ संकल्पामुळे त्यांनी शेअरचॅटच्या यशाचा मार्ग तयार केला.
ShareChat चा उद्देश भारतीय भाषांमध्ये वापरकर्त्यांना एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रदान करणे होता, जो त्यांच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करतो. या प्लॅटफॉर्ममुळे भारतीय भाषांना एक नवा आयाम मिळाला आणि विविध भाषिक समुदायांना एकत्र येण्याचे साधन मिळाले. त्यांनी हे व्यासपीठ एकूण १५ भारतीय स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. ज्यात मराठी, गुजराथी, हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू, तामिळ, ओरिया, कन्नड, आसामी, हरियानवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कमाईपेक्षा अधिक युजर्स वाढीकडे लक्ष केंद्रित केले. जो मुलगा कधीकाळी त्याच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठीही बसला नाही त्याने सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्या दृढ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर बघता बघता 40 हजार कोटींची कंपनी उभी केली, हे खरंच “धडपडणार्यांच्या हाती यश येतेच” या उक्तीला सिद्ध करणारे कार्य ठरले.
सफलता आणि विस्तार
ShareChat यशस्वी झाल्यानंतर, अंकुशने Moj नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म लाँच केला. TikTok बंद झाल्यानंतर, Moj ने भारतीय बाजारपेठेत जलद गतीने आपले स्थान निर्माण केले. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना छोट्या व्हिडिओज तयार करणे आणि शेअर करणे शक्य झाले. Moj ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली आणि ती आज एक अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनली आहे.
ShareChat आणि Moj ने भारतातील डिजिटल कंटेंट कंझम्पशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. ShareChat चे 160 दशलक्ष पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत.
अंकुश सचदेवा आणि त्यांची टीम नेहमीच नवीन फिचर्स आणि तंत्रज्ञान वापरण्यावर जोर देतात, ज्यामुळे ShareChat आणि Moj वापरकर्त्यांचा अनुभव सतत सुधारत असतो.
व्हिजन आणि नेतृत्व
अंकुश सचदेवांचे व्हिजन भारताच्या लहान शहरांतील आणि ग्रामीण भागांतील लोकांना डिजिटल दुनियेचे दरवाजे उघडणे आहे. त्यांचे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून ऑनलाईन सामग्रीचा उपभोग घेण्याची संधी मिळावी. त्यांनी त्यांच्या टीमसोबत मिळून सातत्याने नवविचार केले आहेत आणि भारतीय टेक्नोलॉजी उद्योगात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, ShareChat आणि Moj हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स सतत सुधारत आहेत आणि वापरकर्त्यांच्या गरजा पूर्ण करत आहेत.
गुंतवणूक आणि जागतिक विस्तार
अंकुशला SAIF Partners, DCM श्रीराम, ट्विटर (एक्स), Lightspeed India Partners, Venture Highway, India Quotient आणि Hero MotoCorp सारख्या प्रमुख गुंतवणूकदारांकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. शेअरचॅटने अखेरीस $40 दशलक्ष उभे केले. 2021 मध्ये, ShareChat ने गुंतवणूकदारांना आकर्षित करून $400 दशलक्ष जमा केले आणि 2022 मध्ये, टाइम्स ग्रुप, Google आणि Temasek Holdings कडून $300 दशलक्ष जमा केले.
ShareChatने अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार केला आहे, ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि इतर देशांचा समावेश आहे. कंपनीने महत्त्वपूर्ण गुंतवणूक मिळवली, या निधीचा उपयोग प्लॅटफॉर्मच्या वैशिष्ट्यांची सुधारणा आणि वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी केला जात आहे.
व्यक्तिगत जीवन
अंकुश एक साधारण आणि विनम्र व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांना नवीन तंत्रज्ञानात रस आहे आणि ते भारतीय भाषांच्या प्रचार-प्रसारासाठीही काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या टीमला आणि भारतीय वापरकर्त्यांना दिलं आहे. ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही तितकेच समर्पित आहेत.
अंकुश सचदेवा यांचा ‘फोर्ब्स’ कडून देखील सन्मान झाला आहे. ‘फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30’ च्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला होता. ही यादी अशा तरुण उद्योजकांची ओळख करून देते ज्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अंकुश सचदेवांची कथा भारतीय नवउद्योजकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांनी केवळ आपल्या कल्पनांना साकारच केले नाही, तर जन-जनापर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि नवविचारामुळे ते आज भारतीय टेक्नोलॉजी क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा निश्चितच प्रत्येक नवउद्यमीला मार्गदर्शन करेल आणि त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देईल.
आणखीन वाचा:
- तुझ्या स्वप्नांचा विसर पडू देऊ नकोस…’, बायकोच्या या शब्दांनी त्याला बनवले जगप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक
- ज्या शेतात आई शेतमजूर म्हणून काम करत होती, ती शेती मी विकत घेतली’ : उद्योजक अशोक खाडे
- बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma