उद्योजकताबिझनेस महारथी

कापडाच्या मिलमधील मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला – अँड्र्यू कार्नेगी यांची कहाणी

आज आपण अशाच एका दानशूर उद्योगपतीची जीवनकहाणी बघणार आहोत. ही गोष्ट आहे जगातील एकेकाळचे श्रीमंत, दानशूर आणि परोपकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 100 वर्षे उलटूनसुद्धा आजही अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांची.

अँड्र्यू कार्नेगी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८३५ रोजी स्कॉटलंडमध्ये डनफर्मलाइन नावाच्या छोट्या शहरामध्ये एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विल्यम कार्नेगी हातमाग कामगार होते, तर आई मार्गारेट शिवणकाम करून फाटक्या संसाराला ठिगळ लावायची. तो काळ होता औद्योगिक क्रांतीचा. या औद्योगिक क्रांतीमुळे हातमाग उद्योगावर परिणाम होऊन विल्यम कार्नेगी यांची नोकरी गेली. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी घरदार विकून विल्यम कार्नेगी परिवारासहित अमेरिकेमधील पीटर्सबर्ग येथे येऊन स्थिरावले. तेव्हा अँड्र्यू बारा वर्षांचे होते.

त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, पण इच्छा असून देखील त्याला शिक्षण घेता आलं नाही. त्याकाळी १०-१२ वर्षांची लहान मुलं सुद्धा काम करून कुटुंबाला हातभार लावायची. लहानग्या अँड्र्यूलाही कापड गिरणीत नोकरी मिळाली. काम भरपूर असायचं अन् पगार कमी. त्याच सुमारास अमेरिकेत टेलिग्राफ आणि रेल्वेच्या शोधामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या होत्या. पुढे अँड्र्यू टेलिग्राफ ऑफिसमध्ये मेसेंजर बॉय म्हणून कामाला लागले. हे काम करत असताना सवयीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती सोबत ओळख करून ते बोलत असत. त्यामुळे पीटर्सबर्गसारख्या औद्योगिक शहरात अनेक व्यवसायिकांशी त्यांची चांगली ओळख झाली. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे अँड्रयू कार्नेगी टेलिग्राफ लिहिण्यात पारंगत झाले. त्यांच्या या कौशल्यावर थॉमस स्कॉट यांची नजर पडली.

थॉमस स्कॉट हे पेनसिल्व्हिनिया रेलरोड कंपनीचे रिजनल मॅनेजर, ती त्याकाळी जगातील सर्वात मोठी रेल्वेमार्ग बनवणारी कंपनी होती. अँड्र्यू कार्नेगी यांच्यासाठी ही सर्वात मोठी संधी होती. १२ वर्ष त्या कंपनीसाठी काम केल्यानंतर कार्नेगी यांनी नोकरीचा राजीनामा दिला. थॉमस स्कॉट यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना आर्थिक गुंतवणुकीत मार्गदर्शन केले. नोकरी करत असतानाच कार्नेगींनी रेल्वे डब्यात झोपून प्रवास करता येईल अशा सीट्स बनवणाऱ्या कंपनीत गुंवतणूक केली होती. त्या सीट्सना भविष्यात चांगली मागणी येईल आणि आपल्याला त्यातून भरपूर पैसे मिळतील असा त्यांचा अंदाज होता. तो खरा ठरला.

यातून मिळालेला नफा त्यांनी इतर धंद्यात गुंतवायला सुरुवात केली. रेल्वेत नोकरीला असल्याने, रेल्वेचे लाकडी पूल आग लागल्यास जळून जातात किंवा पुराच्या पाण्यात वाहून जातात हे त्यांनी पाहिलं होतं. बाजारातली स्टीलची मागणी लक्षात घेता त्यांनी की-स्टोन ब्रिज ही कंपनी सुरु केली. की-स्टोन कंपनीने मिसिसिपी नदीवर जगातील पहिला स्टीलचा पूल बांधला. याआधी बांधले जाणारे सगळे पूल हे लाकडी होते, ज्याचं आयुष्य कमी असल्यामुळं, ते काही वर्षातच कोसळायचे. पण की-स्टोन कंपनीच्या स्टीलच्या पुलाने मात्र जादू केली. दीर्घकाळ टिकणारा हा पूल सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आणि अँड्र्यू कार्नेगी यांचा स्टील उद्योग जोमाने वाढू लागला.

हळूहळू कच्च्या तेलाच्या विहिरीपासून ते स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपर्यंतचे सगळे उद्योग कार्नेगी यांनी खरेदी केले. त्यामुळे त्यांना “स्टील किंग” म्हणून ओळखले जावू लागले. १८८९ मध्ये अँड्र्यू कार्नेगी यांनी आपण खरेदी केलेल्या सर्व स्टील कंपन्यांना एकत्र करून कार्नेगी स्टील कंपनी सुरू केली. त्यावेळी ती जगातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी होती. या कंपनीमुळे अमेरिका, इंग्लंडपेक्षा जास्त स्टील उत्पादन करू लागली.

पण श्रीमंत लोकांनी आपली कमाई स्वतःवर खर्च न करता चांगल्या कामांसाठी पैसे दान केले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. त्यामुळे हा सगळा पैसा स्वतःजवळ किंवा परिवारासाठी न ठेवता, त्यांनी तो दान करायचं ठरवलं.

त्यांच्या मते अपुरं शिक्षण हे जगातील अनेक समस्यांचं मूळ होतं. आपल्याला कॉलेजला जात आलं नाही याचं त्यांना आयुष्यभर वाईट वाटायचं. त्यामुळे त्यांनी अमेरिकेतील अनेक शाळा कॉलेजेसना भरघोस देणग्या दिल्या. शांततेसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत केली. अनेक असाध्य आजारांवरील संशोधनाचा खर्च त्यांनी उचलला. मृत्यूनंतर आपला पैसा योग्य मार्गी लावण्यासाठी त्यांनी कार्नेगी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून आजही अनेक सामाजिक कार्यांसाठी मदत केली जाते.

एवढं सगळा दानधर्म करूनही कार्नेगी लोकांच्या जास्त लक्षात राहिले असतील, तर ते त्यांनी सुरु केलेल्या वाचनालयांमुळे. टेलिग्राफ कंपनीत नोकरीला असताना जेम्स अँडरसन नावाचे गृहस्थ लहान मुलांना त्यांच्याकडील पुस्तके मोफत वाचायला देत. त्यांच्यामुळे आपल्याला चांगले वाचायला आणि शिकायला मिळाले ही गोष्ट कार्नेगी कधीच विसरले नाहीत. त्यामुळे पैसे आल्यावर त्यांनी जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त लायब्ररी सुरु केल्या.

११ ऑगस्ट १९१९ रोजी अँड्र्यू कार्नेगी यांचं निधन झालं. पण “मरावे परी कीर्ती रुपी उरावे” या उक्तीप्रमाणे आजही कार्नेगी त्यांच्या अफाट कार्याच्या रूपाने अमर आहेत आणि सदैव राहतील. भरपूर पैसे मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, पण मिळवलेला पैसा दान करण्यासाठी तेवढंच विशाल मनही लागतं हेच कार्नेगी यांनी दाखवून दिलं.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button