एक नवीन स्वप्न पाहण्यास तुम्ही कधीही वृद्ध होत नाही
हा लेख लिहिताना आज मी ३९ वर्षांचा आहे.
तुमचं वय काय आहे?
पण थांबा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुमच्यासोबत एका वेगळ्या दृष्टीकोनावर चर्चा करायची आहे. आता आपण असं समजू की, तुमचं वय ३२ वर्षे आहे. तुमच्या नकळतपणे का होईना, पण तुम्हाला आपलं वय झालंय असं वाटू लागलं असेल.
पण खरंच तुमचं वय झालं आहे का? तुमच्या शरीराकडे बघा. या शरीराचं वय ३२ वर्ष नाही. तुमच्या डोक्यावरील केस, त्यांचं वय ३२ वर्ष नाही. तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमचे हात, तुमचे पाय यातील कशाचंच वय झालेलं नाही. ते सगळं ठीक आहे, पण मग ३२ वर्ष वय नक्की कशाचं आहे?सांगतो, पण यापुढे कधीही आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो असं समजायचं नाही.
आपल्या शरीरात रोज काहीतरी बदल घडून येत असतात. शरीरातील पेशींची संख्या रोज बदलत असते. आपल्या मेंदूतील विचार रोज बदलत असतात. या बदलांमुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. तुमच्या मनातील भावभावनासुद्धा कालच्यापेक्षा आज थोड्याफार वेगळ्या असतात.
तुम्ही रोज किमान एक नवी गोष्ट शिकत असता. भले मग ती बौद्धिक, तांत्रिक किंवा आध्यात्मिक असेल, पण तुम्ही काल जसे होता, तसेच आज नसता. काहीतरी बदल हा झालेलाच असतो.
याचा अर्थ असाही काढता येईल, की तुमचं वय एक दिवस इतकंही नाही. आयुष्याकडे बघण्याचा हा एक वेगळा दृष्टीकोन मला तुम्हाला द्यायचा आहे.
आता मी काही प्रश्न विचारतो बघू तुमच्यापैकी किती जणांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत. जर आपण आजचा दिवस आयुष्यातील आपला पहिला दिवस असल्याप्रमाणे जगू लागलात, तर काय होईल?
आज तुम्ही कोणते नवे निर्णय घ्याल?
- आज कोणती नवीन स्वप्नं पाहण्याचं धाडस तुम्ही कराल?
- आजपासून तुम्ही कोणत्या नवीन गोष्टी करायला सुरुवात कराल?
- आजपासून आपलं आयुष्य कसं वेगळ्या पद्धतीने जगायला सुरुवात कराल?
आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी खालील १० सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.
- आपलं वय हा फक्त एक आकडा आहे. त्याबद्दल फार चिंता करू नका.
- आपण सगळेच एक दिवस मरणार आहोत, नंतर आपल्याला पृथ्वीची आठवण येईल, त्यामुळे आजपासूनच जगणे प्रारंभ करा.
- आपले ध्येय ठरवा, आपल्या स्वप्नांची निवड करा आणि आजपासूनच त्यांचा पाठलाग सुरु करा.
- नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे, चांगले कपडे वापरायला सुरुवात करा.
- निराशावादी आणि आळशी लोकांपासून दूर राहा. जास्त कार्यक्षम आणि उत्साही व्हा.
- आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काय खायला पाहिजे आणि काय नाही याकडे व्यवस्थित लक्ष द्या.
- आजपासून चांगले आर्थिक निर्णय घेण्यास प्रारंभ करा.
- आपल्याला किती पैसा आणि कधीपर्यंत कमवायचा आहे, याचं नियोजन करा. एक उद्दिष्ट ठरवा आणि आजपासूनच त्यावर काम करायला सुरुवात करा.
- मनात स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवून ठेवा.
- आशावादी बना. आनंदी बना. उत्साही बना. आजपासूनच…
आता मला सांगा : तुमचं वय काय आहे?
- हेन्री फोर्ड यांनी प्रसिद्ध ‘मॉडेल टी कार’ बनवली, तेव्हा त्यांचं वय होतं ४५ वर्ष.
- चार्ल्स डार्विनने ‘मानवी उत्क्रांती’चा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याचं वय होतं ५० वर्ष.
- जॉन पेंबरटन यांनी कोका-कोलाचा शोध वयाच्या ५५व्या वर्षी लावला.
- रे क्रॉकनी मॅकडोनाल्ड विकत घेतली, तेव्हा त्यांचं वय होतं ५९ वर्ष.
- कर्नल सँडर्स यांनी केफसीची सुरुवात वयाच्या ६२व्या वर्षी केली होती.
यशस्वी होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो, त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका