जिद्द... उत्तुंग यशाचीस्टार्टअप

फ्लिपकार्ट: भारतातील ई-कॉमर्सची यशाची कहाणी

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्याची देशाची युवाशक्ती ही त्या देशाची सर्वांत मोठी शक्ती आणि संपत्ती मानली जाते. आज ट्विटरचे CEO पराग अग्रवाल असो किंवा मायक्रोसॉफ्टचे सत्य नाडेला किंवा गुगलचे सुंदर पिचाई असो… भारतीय तरुण जगात आपला डंका वाजवत आहेत. ही गोष्ट आहे, अशाच २ तरुणांची, ज्यांनी भारतीयांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीची दिशाच बदलून टाकली. ते दोन तरुण म्हणजे, फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल…

सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल, आडनावावरून हे दोघे तुम्हाला भाऊ वाटतील, पण हा निव्वळ योगायोग आहे. IIT दिल्लीमधून बी-टेक करणारे हे दोघे मित्र फार मजेशीररित्या एकमेकांना भेटले. डिग्री पूर्ण करून संपूर्ण कॉलेज उन्हाळी सुट्टीसाठी घरी गेलं असताना, आपला अपूर्ण प्रकल्प पूर्ण करत हे दोघे बसले होते. तिथंच या दोघांची भेट झाली. पदवीनंतर दोघेही नोकरीसाठी बेंगलोरला गेले, तिथं त्यांची  मैत्री अजून घट्ट झाली. पुढे सचिनने 2006 मध्ये ॲमेझॉनमध्ये काम करायला सुरुवात केली, तर बिन्नीसुद्धा 2007 मध्ये ॲमेझॉनमध्ये रुजू झाले.

व्यावसायिक दृष्टिकोन असणाऱ्या दोघांनाही लवकरच Amazon मधील नोकरीचा कंटाळा आला आणि नवनवीन आयडिया त्यांच्या डोक्यात येऊ लागल्या. ई-कॉमर्सची आवड असल्याने त्यांनी अनेक वेबसाईटची तुलना करणारी वेबसाईट बनवायची ठरवली. इतर वेबसाईट पाहत असताना त्याच्या लक्षात आले कि, या वेबसाईट्सची डिझाईन खूपच खराब आहे. त्यांना एक अशी ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची होती जी ग्राहकांना चांगला अनुभव देईल.

महिन्याला दोघही आपल्या पगारातून थोडे पैसे बाजूला काढत होते. अखेरीस जराही वेळ न दवडता दोघांनी Amazon सोडले. प्रत्येकी २ लाख गुंतवत त्यांनी २००७मध्ये स्वतःच्या फ्लॅटमधूनच फ्लिपकार्ट ही कंपनी चालू केली. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष फक्त पुस्तकं विकण्यात केंद्रित केले होते. ऑर्डर आल्यानंतर पोस्टाने घरपोच डिलिव्हरी केली जायची. २ महिन्यांनी त्यांना पहिली ऑर्डर मिळाली. या पहिल्या ऑर्डरचा किस्सासुद्धा फार रंजक आहे.

आजच्या तेलंगणामधील मेहबूबनगरमध्ये राहणारे व्ही. व्ही. के. चंद्रा हे फ्रीलान्स वेब कन्सल्टन्ट होते. त्यांना पुस्तकं वाचायचं भारी वेड होतं. त्यामुळं ते प्रत्येक वेळी ९० किलोमीटरचा प्रवास करून हैद्राबादला जात आणि पुस्तकं खरेदी करत. त्यांना Leaving Microsoft to Change the World हे पुस्तक वाचायचं होतं, पण ते त्यांना कुठंच मिळेना. चंद्रा टेकनॉलॉजिशी संबंधित ब्लॉग इंटरनेटवर लिहित होते. त्यांच्या एका ब्लॉगच्या खाली एक कंमेंट होती. सचिन बंसल यांची. त्या कमेंटमध्ये एक लिंक होती www.flipkart.com. हे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून त्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं, तर त्यांना ऑनलाइन पुस्तक विकणारी साईट दिसली जी संपूर्ण भारतात कुठेही पुस्तकांची डिलिव्हरी करत होती. वेबसाईट अगदी विश्वसार्ह वाटल्यामुळे चंद्रानी त्याच्यावर पुस्तक ऑर्डर केलं. ही ऑर्डर गेल्यावर बंगळुरूमधील २ खोल्यात राहणाऱ्या सचिन आणि बिन्नी बंसल याना खूप आनंद झाला. कारण त्यांच्या व्यवसायासाठी हे पाहिलंच पाऊल होत, पण थोड्याच वेळात त्यांच्या लक्ष्यात आलं की हे पुस्तक कोठेच उपलब्ध होईना. अनेक दुकानदारांशी संपर्क केल्यानंतर एका दुकानात त्यांना एक प्रत सापडली, पण ती खूप जुनी होती आणि तिची पानं पिवळी पडली होती. बिन्नी बन्सल यांनी चंद्राना फोन करून ही सगळी माहिती दिली. त्यावर चंद्रानी ते जसं आहे, तसं देण्यास सांगितल. नंतर २ दिवसांनी चंद्राना पुस्तक मिळालं, तर फ्लिपकार्टला पहिली ऑर्डर पूर्ण केल्याचं समाधान. त्यावर चंद्राना १०% डिस्काउंट मिळाला.

२००७ ची ती परिस्थिती अशी होती कि, भारतात फक्त ५ कोटी लोकंच इंटरनेट वापरत होती. त्यातही बार्गेनिंग म्हणजेच घासाघीस करणे हा जन्मसिद्ध हक्क समजणाऱ्या भारतीयांना ऑनलाईन शॉपिंग करणे कितपत रुचणार हे अनिश्चित होते. अशा परिस्थितीत फ्लिपकार्टचं हे पाऊल खरंच फक्त धाडसाचं नव्हतं तर क्रांतिकारी होतं.

सप्टेंबर २००९ मध्ये फ्लिपकार्टने गुंतवणूकदारांकडून १ अब्ज डॉलर्स उभे केले. याबरोबरच २ जणांनी सुरु केलेल्या फ्लिपकार्टमध्ये १५० कर्मचारी भरती झाले.  

आता फ्लिपकार्ट हे भारतातील पुस्तकप्रेमींसाठी पसंतीचे व्यासपीठ बनत होत, स्टार्टअप त्याचे पुढचे पाऊल टाकण्यासाठी सज्ज होत होतं . नवीन भागीदार आणि अधिक गुंतवणुकीसह, फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स श्रेणीमध्ये प्रवेश करण्यास तयार होत. त्यामुळे त्यांनी 2010 मध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकण्यास सुरुवात केली.

फ्लिपकार्टला अजून ग्राहकांच्या विश्वासाचा खूप मोठा पल्ला गाठायचा होता. भारतामध्ये सुरुवातीला ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी घाबरत होते कारण लोकांची अशी धारणा होती की पेमेंट केल्यानंतर जर प्रॉडक्ट्स मिळाले नाही तर? यावर उपाय काढत फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सुरू केला. हा पर्याय सादर करणारी पहिलीच ई-कॉमर्स कंपनी होती. घेतलेली वस्तू जर खराब लागली, तर रिटर्न पॉलिसी देऊन फ्लिपकार्टने ग्राहकांचा विश्वास कमावला.

सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीने स्वतःचं अँड्रॉइड ऍप लाँच केलं. डिसेंबर २०१४ पर्यंत कंपनीची मार्केट व्हॅल्यू ११ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. टाईम मासिकाच्या २०१६ च्या जगातील १०० प्रभावशाली लोकांच्या यादीत सचिन आणि बिन्नी दोघांचाही समावेश करण्यात आला. मार्च २०१७ मध्ये भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठेतील ३९.५ टक्के हिस्सा एकट्या फ्लिपकार्टच्या होता. 

मिंत्रा, जबॉंगसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकत घेत फ्लिपकार्टने आपला प्रवास वेगाने चालू ठेवला होता. पण 2018 मध्ये, अमेरिकेची बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने फ्लिपकार्ट 16 अब्ज डॉलर्सला म्हणजेच एक लाख 7 हजार कोटी रुपयांना विकत घेतले आणि Flipkart मधील सचिन आणि बिन्नी यांचा दशकभराचा प्रवास संपला. दहा वर्षांपूर्वी दोन तरुण ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. पुढच्या दहा वर्षात ॲमेझॉनला याच दोन कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीशी टक्कर द्यावी लागेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

सचिन बन्सल यांनी भारतातील वाढत्या फिनटेक स्पेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘नवी टेक्नॉलॉजीज’ ही कंपनी सुरू केली, तर बिन्नी बन्सल यांनी त्यांच्या xto10x टेक्नॉलॉजीज नावाच्या उपक्रमाद्वारे  स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढविण्यात मदत करणारी टेकनॉलॉजि विकसित केली.

खरेदीच्या बाबतीत चोखंदळ असणारा भारतीय ग्राहक जोपर्यंत वस्तू हाताळत नाही, पारखत नाही, तोपर्यंत खरेदी करत नाही; अशा आपल्या नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करायची सवय लावणारे सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी खऱ्या अर्थाने खरेदीचा नवा पायंडा पाडला.

असं म्हणतात कि, आपण ज्या लोकांच्या सहवासात असतो, त्याप्रमाणे आपलं करिअर, भविष्य घडत असतं. सचिन आणि बिन्नी या मित्रांची जोडी या असंच काहीसं आपल्याला शिकवून जाते. बिन्नी आणि सचिन यांनी सुरू केलेल्या एका ‘स्टार्टअप’ला मिळालेले हे यश केवळ पैशांच्या मोजमापातच नव्हे, तर सर्वार्थाने अभूतपूर्व आहे. फ्लिपकार्टमुळे भारतात स्टार्टअप संस्कृती वाढण्यास फायदा झाला.

तर ही होती फ्लिपकार्टच्या संस्थापकांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button