दिनविशेष

‘परम’ महासंगणकाचे जनक : डॉ. विजय भटकर 

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४६ रोजी अकोला जिल्ह्यातील मुरांबा या छोट्या गावात झाला. त्यांचं मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात होतं, त्यांचं  बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेलं, पण त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या तृष्णेमुळे त्यांनी कष्टाची आणि जिद्दीची वाट धरली. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक मोठी टप्पे गाठले. त्यांनी 1965 साली नागपूर विद्यापीठातून बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) ही पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून एम.ई. (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी मिळवली.

त्यांची शिक्षणाची ऊर्मी यावर थांबली नाही. त्यांनी आय.आय.टी. दिल्लीमधून पीएच.डी. मिळवली. डॉ. भटकर यांच्या शैक्षणिक प्रवासात ते केवळ शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्हते, तर नवीन विचारांची दृष्टी असलेले संशोधक होते. 

महासंगणक क्रांती

१९८० च्या दशकात भारताला अचूक हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी  महासंगणकाची (SUPERCOMPUTER) गरज होती. अमेरिकेने भारताला त्यांचा ‘क्रे’ महासंगणक विकण्यास नकार दिला. अशावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी महासंगणक निर्मितीचं स्वप्न पाहिलं. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. भटकर यांच्यावर या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. भारताला महासंगणकाच्या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनविणं हे या प्रकल्पाचं ध्येय होतं.

१९८८ साली पुणे विद्यापीठात ‘सी-डॅक’ (Center for Development of Advanced Computing) या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत महासंगणक निर्मितीचं  काम सुरू झालं.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पसाठी भारत सरकारने ३७.५ कोटी रुपयांची तरतूद केली, पण विशेष म्हणजे, खूप कमी  कालावधीत आणि कमी खर्चात डॉ. भटकर आणि त्यांच्या टीमने ‘परम-८000’ महासंगणकाची निर्मिती केली. १९९१ साली ‘परम-८000 महासंगणक कार्यान्वित झाला. हा महासंगणक दर सेकंदाला 1 अब्ज गणिती क्रिया करण्यास सक्षम होता. भारतासाठी ही एक मोठी तांत्रिक प्रगती होती.

डॉ. भटकर यांनी विकसित केलेला पहिला महासंगणक ‘परम-८०००’ केवळ सुरुवात होती. त्यानंतर ‘परम-१0000’ महासंगणकाची निर्मिती १९९८ मध्ये करण्यात आली. ‘परम-१0000’ ची क्षमता दर सेकंदाला १ लाख कोटी गणिती क्रिया करण्याची होती. या महासंगणकामुळे भारताने हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, संरक्षण, अणु तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिज संशोधन अशा अनेक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. भारत महासंगणकाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये स्थान मिळवू लागला.

संगणकीय भाषांमधील क्रांती; ‘जिस्ट’ प्रणाली

संगणकाचा वापर केवळ इंग्रजीत भाषेतच मर्यादित राहावा असे डॉ. भटकर यांना मान्य नव्हतं. त्यांनी विविध भारतीय भाषांचा संगणक क्षेत्रात उपयोग करून घेण्याचं ध्येय ठेवलं होतं. १९८९ साली त्यांनी ‘जिस्ट’ (Graphics and Intelligence based Script Technology) ही संगणकीय प्रणाली विकसित केली. ‘जिस्ट’मुळे भारतीय भाषांमध्ये संगणकावर कार्य करणं सहज शक्य झालं. भारतीय उपखंडात संगणक वापराच्या क्षेत्रात हे एक मोठं पाऊल होतं. यामुळे इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपुष्टात आली आणि संगणक क्षेत्रात भारतीय भाषांनाही स्थान मिळालं . 

विविध संस्थांच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान

डॉ. भटकर हे एक संस्थापक-विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्थांची स्थापना केली आणि त्या संस्थांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’, ‘टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम)’, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’, ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (MKCL)’, ‘डिशनेट’, ‘डिव्हिनेट अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजी’ अशा विविध संस्थांची स्थापना झाली. यापैकी प्रत्येक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. 

पुरस्कार आणि सन्मान

डॉ. विजय भटकर यांना त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना ‘पद्मश्री’, ‘महाराष्ट्रभूषण’, ‘एच.के. फिरोदिया पुरस्कार’, आणि ‘डेटाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार’ यांसारखे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, विविध विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. 

भारतातील आयटी उद्योगाच्या विकासात डॉ. भटकर यांचं  मोलाचं  योगदान आहे. भारत सरकारच्या अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ते ‘विज्ञानभारती’ संस्थेचे अध्यक्ष म्हणून सहा हजारांहून अधिक संशोधकांसोबत कार्यरत होते. २०१७ साली ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त झाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सुद्धा  सन्मानित करण्यात आले  आहे. त्यांना एकूण ४०हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.

डॉ. भटकर हे एक नामांकित लेखक आणि संशोधक आहेत. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ रचले आहेत, ज्यामध्ये ‘आजची ज्ञानेश्वरी’, ‘आजची मराठी भगवद्गीता’, ‘इतिहास घडविला त्यांनी’, ‘मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराजांची विज्ञानदृष्टी’, ‘नीळा झालासे पांडुरंग’, ‘तुका सर्वांगे विठ्ठल’, ‘वेध अंतिम सत्याचा’, आणि ‘विज्ञानदृष्टी’ या पुस्तकांचा समावेश आहे.

त्यांनी आठ पुस्तके संपादित केली असून, त्यांचे ८० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांमध्ये ‘सुपर कॉम्प्यूटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’, आणि ‘व्हेरिएशनल थिअरी’ यांसारख्या संगणक विज्ञानाच्या विषयांचा समावेश आहे. 

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button