रंजक-रोचक माहिती

अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं? मराठीला त्याचा काय फायदा? जाणून घ्या सर्वकाही…

या लेखात आपण अभिजात भाषा म्हणजे काय, ती कशी निवडली जाते आणि मराठी भाषेला याचा कसा फायदा होईल याची  माहिती जाणून घेऊया…

अभिजात भाषा म्हणजे काय?

एखादी भाषा अभिजात म्हणून घोषित केली जाते तेव्हा ती भाषा केवळ प्राचीन आणि समृद्धच नाही, तर त्या भाषेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव देखील खूप मोठा असतो. भारतीय संविधानानुसार  अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेला विशेष मान्यता दिली जाते, ज्यामुळे त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य दिलं जातं. 

अभिजात भाषा हा दर्जा मिळण्यासाठी निकष काय?

  • संबंधित भाषेचं अस्तित्व कमीत कमी दीड ते अडीच हजार वर्षांपूर्वीचं असावं.
  • भाषेत प्राचीन काळापासून समृद्ध साहित्य असावं, ज्यामुळे भाषेची सांस्कृतिक आणि साहित्यिक महानता दिसून येते.
  • भाषेचं स्वत:चं स्वायत्त अस्तित्व असावं, म्हणजेच ती भाषा इतर भाषांच्या प्रभावाखाली येऊन संपुष्टात आलेली नसावी.
  • भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये एक गाभ्याचं एकसारखं स्वरूप टिकून असावं.

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेच्या प्रवासाचा इतिहास

मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी गेल्या काही दशकांपासून जोरदार चळवळ सुरू होती. मराठी साहित्यिक आणि अभ्यासकांनी सतत या मागणीसाठी आवाज उठवला. महाराष्ट्र शासनाने २०१३ साली ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि त्याच काळात अभिजात दर्जासाठी प्रयत्न अधिक जोर धरू लागले.

राज्य सरकारने या मागणीच्या पुढील टप्प्यात रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. या समितीने मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा आणि तिच्या ऐतिहासिक महत्त्वाचा सखोल अभ्यास करून सादर केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला होता. या अहवालात मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या निकषांची पूर्तता होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अखेर, केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करून महाराष्ट्रातील भाषाप्रेमींना आनंदाची मोठी बातमी दिली.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे:

१) भाषेच्या संशोधनाला चालना

मराठी भाषेच्या अभिजात दर्जामुळे भाषातज्ज्ञ आणि साहित्यिकांना अधिक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. विशेषतः मराठी भाषेतील विविध बोली आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. प्राचीन मराठी ग्रंथ, साहित्य आणि काव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधन संस्थांना मदत मिळेल.

२) साहित्य आणि विद्वानांसाठी पुरस्कार

अभिजात भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेतील साहित्यिक, कवी, आणि भाषातज्ज्ञांना या पुरस्कारासाठी पात्रता मिळेल. यामुळे मराठी साहित्यिकांना अधिक प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल.

३) विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यास केंद्रे

अभिजात भाषांना दिलेल्या दर्जामुळे विविध विद्यापीठांमध्ये त्या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष केंद्र उभारली जातात. आता मराठी भाषेसाठीही देशभरातील विद्यापीठांमध्ये अभ्यास केंद्रे स्थापन केली जातील. या केंद्रांमध्ये मराठी भाषेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची माहिती देण्यासाठी  विशेष अभ्यासक्रम तयार केले जातील.

४)  ग्रंथालयांचा विकास

राज्यातील १२ हजारांहून अधिक ग्रंथालयांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वा ठरला आहे. अभिजात भाषेच्या ग्रंथालयांसाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असतं, त्यामुळे मराठीतील प्राचीन ग्रंथांचे जतन, अनुवाद आणि पुनरुत्थान होणार आहे. मराठी भाषेतील साहित्यावर विशेष ग्रंथालये स्थापन केली जाऊ शकतात.

५) अनुवाद आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी

मराठी भाषेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण साहित्य आता अन्य भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. यामुळे मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धी मिळेल आणि त्याचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचेल.

६)  केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान

अभिजात भाषेला मिळणारे अनुदान हे भाषेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, जो भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य प्रकाशनासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरला जातो. या निधीतून विविध मराठी साहित्यिक उपक्रम राबवले जाऊ शकतात, ज्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळेल.

७)  प्राचीन आणि आधुनिक मराठीचा अभ्यास

मराठी भाषेच्या प्राचीन आणि आधुनिक रूपांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भाषातज्ज्ञांना भाषा विकासाचा आणि बदलाचा अभ्यास करता येईल, ज्यामुळे मराठी भाषेतील विविध पैलूंवर अधिक प्रकाश पडेल.

मराठीसह भारतात इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा विकास आणि संरक्षण अधिक गतीने झाला आहे. केंद्र सरकारकडून या भाषांच्या संवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, ज्यामुळे त्या भाषांचे प्राचीन साहित्य जतन होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे, मराठी भाषेलाही आता या मार्गावर चालण्याची संधी मिळाली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने तिच्या भविष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. मराठी भाषेच्या साहित्य, कला, आणि संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी आता अधिक साधनसंपत्ती उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या इतर भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली ओळख निर्माण करू शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button