वाचाल तर वाचाल
“सविताकाकू घरात खिन्नपणे बसल्या होत्या. सकाळी त्या घराबाहेर पडल्या आणि दुपारी उशिरा घरी परत आल्या. इमारतीच्या नोटीस फलकावर काहीतरी लिहिले होते. पण सविताकाकू ते वाचू शकत नव्हत्या आणि म्हणूनच दोन दिवस पाणी येणार नाही, हे फलकावर लिहूनही त्या वाचू शकल्या नाहीत. सर्वांनी पाणी भरून ठेवले होते. पण सविता काकू केवळ वाचता आले नाही म्हणून पाण्यावाचून राहिल्या.” तेव्हा पटले,
खरंच! वाचाल तर वाचाल
जगात मानवी वाटचालीचा विचार केला, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याचे मूल्यमापन करताना विविध ऐतिहासिक प्रसंगांचे स्मरण करून दिले जाते. त्यात औद्योगिक क्रांती आहे, विविध वैज्ञानिक शोधांचा समावेश असतो, तसेच वैचारिक उत्थानाचेही दाखले दिले जातात. पण मानवी विकासामध्ये किंवा प्रगतीमध्ये सर्वात मोठे योगदान कोणाचे असेल, तर ते छपाई तंत्रज्ञानाचे आहे, हे सत्य आजही नाकारता येणार नाही. जोपर्यंत कागद आणि छपाईचा शोध लागला नव्हता, तेव्हापर्यंतचे जग आणि त्यानंतरचे जग यात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसून येईल. त्या एका शोधाने मानवी जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणलेले आहे. कारण छापलेली अक्षरे, शब्द वा वाक्यांसह पुस्तके, ग्रंथ सामान्य लोकांना उपलब्ध होत गेले. त्यातून आधी वाचनाला चालना मिळाली व आपोआप लिखाणाला प्रेरणा मिळत गेली. वाचनाने अनेकांचं जीवन समृद्ध झालं असे कित्येकजण आजही मान्य करतात. कितीतरी थोर व्यक्तींचा दिवस काहीतरी वाचल्याशिवाय सुरू होत नाही आणि वाचन केल्याशिवाय संपतदेखील नाही. ज्ञान मिळविण्याची किंवा करमणुकीची इतर साधने जेव्हा नव्हती तेव्हा वाचन हाच एकमेव आधार होता. सुशिक्षित वाचनप्रिय समाज वर्तमानपत्रे, कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने, धार्मिक ग्रंथ इ. चा वाचक बनला. ह्या वाचनामुळेच लोकांची बुद्धी, विचार, मार्गदर्शन प्रसंन्न व प्रगल्भ होत गेले. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देते.
नियमित वाचनाचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे सांगता येतील :
1. शब्दसंग्रह वाढतो
2. स्मरणशक्ती सुधारते
3. लेखन कौशल्य प्राप्त होते.
4. एकाग्रता
5. मेंदूला चालना मिळते
6. सामान्य ज्ञान वाढते
7. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता तेथील परिस्थिती, संस्कृतीचा अभ्यास करता येतो.
‘मॅझिनी’चे चरित्र वाचून स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्तीच्या प्रेरणेने प्रेरित झाले. अनेक थोर व्यक्ती ग्रंथवाचनाच्या आवडीमुळे महान झाल्या. वाचनाचा नुसता छंद नव्हे तर वाचनाचे वेड असणारेही बरेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हैद्राबाद श्यामराव बहादूर यांचे ग्रंथप्रेम अतुलनीय आहे. नुसत्या अक्षरांनी, शब्दांनी व पुस्तकांनी जग किती आरपार बदलून टाकलेले आहे. असे असले तरी आजच्या काळात परिस्थिती बदलत चालली आहे.
“जिथे नाही पुस्तकांचे कपाट ते घर होईल भुई सपाट” असे म्हटले जाते, ही बाब सध्या खरी ठरू लागली आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला असून लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत पुस्तके वाचनाचे प्रमाण घटले असल्याचे चित्र दिसते, याला कारण म्हणजे सध्या इंटरनेट मोबाईलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे, त्यामुळे “वाचाल तर वाचाल” असे म्हणण्याची ही वेळ आहे असं म्हटलं, तर ते नक्कीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही. आज इंटरनेट वर पाहिजे असणारी
कोणतीही माहिती अगदी क्षणात प्राप्त होते, त्यामुळे अनेकदा तरुण पिढीला पुस्तक वाचणे कंटाळवाणे, रटाळवाणे वाटते. इंटरनेटवर सगळी माहिती मिळते, मग पुस्तक का वाचायचे असा प्रश्न त्यांना पडतो. परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे याची जाणीव या पिढीला फारशी होत नाही.
आणखी वाचा :