कोण म्हणतं जॉब करणारे श्रीमंत नाही बनू शकत? ‘असे’ प्लॅनिंग करून तुम्हीही श्रीमंत बनू शकता
सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत पैसा कमवणे, हा सर्वांसाठी कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे अनेकदा असे पसरवले जात आहे की, श्रीमंत बनायचे असेल, तर तुमचं स्वतःचं काहीतरी करा. बिझनेस करा, रिस्क घ्या. मात्र, सर्वांसाठी रिस्क घेणे शक्य होत नाही. जॉब करणाऱ्यांची काहीतरी मजबुरी असते. मग जेव्हा तुम्ही जॉब करत असाल, तर तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही का? तर हे चुकीचं आहे. तुम्ही जॉब करूनही श्रीमंत बनू शकता. चला तर, आपण जाणून घेऊयात की, तुमचा एका ठराविक पगार असेल, तर तुम्ही चांगल्या आर्थिक नियोजनाद्वारे खरोखरच श्रीमंत बनू शकता. यासोबतच आपण तुमचा पगार जर कमी असेल, तर तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, याविषयीही जाणून घेऊयात…
आर्थिक नियोजन
आपण या लेखातून जॉब करणारा व्यक्ती कशाप्रकारे योग्य आर्थिक नियोजनाद्वारे श्रीमंत कसा बनू शकतो, हे पाहूयात. आज तुमचा पगार कमी जरी असला, तरीही तुम्ही स्वत:ला धन्यवाद द्या की, तुम्ही या काळात जन्माला आलात. कारण, आज तुम्ही कुठल्या कॉलेजमधून आलात, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. तुमची पदवी काय आहे, त्याचे महत्त्व कमी झाले आहे. एवढंच काय, तर तुमचे मार्क्स किती आहेत, याचेही महत्त्व कमी झाले आहे. आजपासून १०-१५ वर्षांपूर्वी या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरत होत्या. मात्र, आता त्यांचा एवढा फरक पडत नाही. आता फक्त एकच गोष्ट गरजेची आहे, ते म्हणजे तुम्ही कोणत्या एका गोष्टीमध्ये चांगले आहात. तसेच, जर तुम्ही एखाद्या गोष्टीत चांगले नसलात, पण तुम्हाला त्यात रस असेल; तर तुम्ही मोफत इंटरनेटच्या वापराने त्यात चांगले होऊ शकता. मग ते काहीही असू शकते. ग्राफिक्स डिझायनिंग असू शकते, वेब डेव्हलपमेंट असू शकते किंवा कंटेंट रायटिंगदेखील असू शकते.
तुम्ही कोणत्यातरी एका गोष्टीत स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवू शकला, तर कोणतीही कंपनी तुम्हाला जॉब देईल, जिथे तुमचा पगार २० हजार किंवा त्याहून अधिक असेल. तर अशा परिस्थितीत आम्ही जे आर्थिक नियोजन तुम्हाला सांगत आहोत, ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
जर तुमचा पगार २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर तुम्ही कोट्याधीश कसे बनू शकता? यासाठी काही नियम आहेत. एक असा की, ५०, ३० आणि २० नियम. या नियमानुसार, तुमचा जो काही पगार आहे, त्यातील ५० टक्के पगार तुम्ही गरजांवर खर्च करू शकता. जसे की, वीज बिल, पेट्रोल, फोन बिल, खान-पान आणि घराचे भाडे. त्यानंतर ३० टक्के पगार तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर खर्च करू शकता. जसे की, चांगले कपडे घ्यायचे आहेत, पार्टी करायची आहे, कुठे फिरायला जायचे आहे, मूव्हीला जायचं आहे. यानंतर पुढचा भाग येतो २० टक्के पगार, जी आहे बचत. तुम्हाला तुमच्या पगारातील कमीत कमी २० टक्के पैशांची बचत करायची आहे. त्यानंतर याच पैशांची गुंतवणूक करायची आहे. चला तर, आपण याची आकडेमोड करून पाहूयात.
तुमचा पगार फक्त २० हजार असला, तरीही हा हिशोब वैध आहे. आपण २० हजार रुपयांविषयी बोलत आहोत, तर तुम्हाला यापैकी किती रुपयांची बचत करायची आहे, तर २० टक्के. तुम्ही जर यापेक्षा जास्तीची बचत करू शकला, तर अति उत्तम. २० टक्के रक्कम तुम्ही बचत करत आहात, तर ती रक्कम होते ४ हजार रुपये. आता ४ हजार रुपयांची तुम्ही बचत करत आहात किंवा तुमचं ते ध्येय आहे. आता आपण पाहूयात की, तुम्ही जे ४ हजार रुपये बचत करत आहात, त्यातून तुम्ही काय कराल. पहिला नियम होता ५०-३०-२० आता आपण दुसरा नियम पाहूयात, जो गुंतवणुकीचा आहे. त्यानुसार तुम्हाला त्या ४ हजार रुपयांची गुंतवणूक करायची आहे.
यासाठी तुम्ही जीवन विमा घेऊ शकता. तुम्ही जर तरुण असाल, २७ ते ३० पेक्षा कमी वयाचे, तर तुम्हाला १ कोटी रुपयांचा विमा मिळेल. हा तुम्हाला साधारण ५०० रुपये प्रति महिना हिशोबाने मिळेल. आता ४ हजारातील ५०० रुपये गेले, तेव्हा तुम्ही साधारण विमा नाही, तर टर्म प्लॅन घ्याल आणि काही गोष्टींची काळजी घ्या. जसे की, कुटुंबातील सर्वांचा जीवन विमा घ्यायचा नाहीये. जे कमावते लोक आहेत किंवा तुम्ही कमावते आहात, तर तुमचा विमा घ्या. कोणत्याही स्कीममध्ये अडकून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका.
दुसरी पायरी म्हणजे, आरोग्य विमा. हा विमा सर्वांचा घ्यायचा आहे. कारण, आजारी कुणीही पडू शकतो. त्यामुळे यासाठी जवळपास ५०० रुपयात तुमचा आरोग्य विमाही मिळेल. आता ४ हजारांपैकी १ हजार रुपये तुमच्या जीवन आणि आरोग्य विम्यासाठी खर्च झाले. सर्वप्रथम ही दोन कामे केली पाहिजेत.
आपत्कालीन निधी
आता पुढची पायरी म्हणजे आपत्कालीन निधी. आजकाल फ्रीलान्सिंग सुरू आहे. मात्र, त्याचाही काही भरोसा नाहीये. कधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते. कधी व्यवसाय ठप्प पडतो, किंवा लॉकडाऊनची स्थिती उद्भवते. कोणतीही आपत्कालीन स्थिती उभी राहते. मात्र, खर्च हा सुरूच असतो. त्यामुळे त्याची आधी तयारी करायची. त्यानंतर गुंतवणुकीचा विचार करायचा.
जर तुमच्या घरात एकटे कमावते असाल, तर तुमच्याकडे सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी असावा. तसेच, जर तुमच्या घरात दोन कमावते लोक असतील, तर तुमच्याकडे तीन महिन्याचा आपत्कालीन निधी असावा. आता तीन महिन्यांचा आपत्कालीन निधी समजून घेऊयात. तुमचा पगार २० हजार आहे, तर आपण ५०-३०-२० नियमानुसार ५० टक्के रुपये तुमच्या गरजांसाठी आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुमची नोकरी जरी गेली, तरीही तुम्ही तो खर्च दुर्लक्षित करू शकणार नाहीत. म्हणजेच महिन्याचा १० हजार रुपये हा असा खर्च आहे, जो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्यामुळे तुम्ही जर घरातील दुसरे कमावते व्यक्ती असाल, तर तुमचा आपत्कालीन निधी कमीत कमी तुमच्या गरजांपेक्षा तीन पट असला पाहिजे. तसेच, घरातील प्रथम कमावते व्यक्ती असाल, तर आपत्कालीन निधी तुमच्या गरजांपेक्षा सहा पट असला पाहिजे. म्हणजेच तुमच्या महिन्याच्या गरजांवरील खर्च १० हजार रुपये आहे, तर तुमचा आपत्कालीन निधी हा कमीत कमी ३० हजार रुपयांचा असावा. जास्त असेल, तर उत्तमच.
आता हे ३० हजार रुपये कसे येणार हे पाहूयात. तुमच्या बचतीतील ४ हजार रुपये जे होते, त्यातील १ हजार महिना तर विम्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील. उरलेल्या ३ हजार रुपयांतून तुम्ही आताच गुंतवणुकीला सुरुवात करू नका. तुम्हाला १० महिन्यांसाठी ते ३-३ हजार रुपये जोडून बचत खात्यात आधी ३० हजार रुपये जमा केले पाहिजेत. तसेच, तुम्ही पे ऑटो स्विच ऑन करा. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही पैसे खर्च कराल, तर एफडी करा, जी रक्कम काढता येऊ शकेल. अशाप्रकारे तुम्ही १० महिन्यांपर्यंत ३-३ हजार रुपये जमा करून आपत्कालीन निधी तयार करू शकता. हे तुम्ही कामाला लागल्यानंतर पहिल्या १० महिन्यात करावे लागणार आहे.
जीवन विमा तुम्हाला सर्वप्रथम घ्यायचा आहे. कारण, जितक्या तरुण वयात तुम्ही हा विमा घ्याल, तेवढा तुम्हाला प्रीमियम (हप्ता) कमी भरावा लागेल. तर या झाल्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या. तुम्ही तुमचा जीवन आणि आरोग्य विमा घेतला. तुमचा आपत्कालीन निधी बनवला. आता ११ महिन्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
गुंतवणूक
अनेकजण काय करतात की, पहिल्या महिन्यापासूनच गुंतवणूक सुरू करतात. तसे करायचे नाही. जेव्हा ११ महिने होतील, तेव्हा गुंतवणूक सुरू करा. तुमच्याकडे आता ३ हजार रुपये आहेत, तुम्हाला स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहेत, तर आता तुम्ही गुंतवू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास १२-१५ टक्के परतावा सहज मिळवू शकता. यासाठी एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.
आपण अद्याप एक गोष्टीचा हिशोब केलाच नाही, तो म्हणजे तुमचा पगार कायम २० हजार असणार नाहीये. कधी ना कधी तुमचा पगार वाढणार आहे. तुम्ही नेहमी एवढीच गुंतवणूक करणार नाहीयेत. नक्कीच त्यात वाढ कराल. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक कराल, तेव्हा तुम्हाला जास्त पैसे लागतील आणि त्यावर जास्त परतावा मिळेल. जसे तुम्ही सध्या ३००० रुपयांची गुंतवणूक करत आहात, पण पुढच्या वर्षी त्यात १५ टक्के वाढवाल. म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्ही ३ हजार नाही, तर जवळपास ३५०० हजार रुपये गुंतवाल. त्यानंतर पुन्हा तुम्ही १५ टक्के वाढवाल. आता एक प्रश्न असाही आहे की, कुणाचा पगार दरवर्षी १५ टक्के वाढतो. जर महागाईचा दर ६.७ टक्के वाढला आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर तुमच्या पगाराच्या २० टक्के रक्कम गुंतवत आहात आणि त्यात तुम्ही १० टक्क्यांच्या वाढ केली, पण इतर ८० टक्के खर्च तुमचा गरजा आणि इतर गोष्टींसाठी ६ टक्क्यांनीच वाढला, तरी ४ टक्के तुम्ही गुंतवू शकाल.
आपण हे एका उदाहरणाद्वारे समजूया. समजा तुमचा पगार २० हजार आहे. आपण ५/६ टक्क्यांची महागाई पकडली, तर हिशोब सोपा होईल. आता ५ टक्के मानूया आणि तुमचा पगार १० टक्क्यांनी वाढला, तर पगार झाला २२ हजार. आधी तुमचा पगार २० हजार होता, तेव्हा तुमच्या गरजा आणि इतर गोष्टींसाठी ५०+३० म्हणजेच ८० टक्के म्हणजेच २० हजार पगाराच्या ८० टक्के रक्कम होते १६ हजार. आता तुमच्या मागील वर्षीच्या गरजा आणि इतर गोष्टींवरील खर्च १६ हजार होता. आता महागाई ५ टक्के वाढली आहे असे समजू. जे काम तुमचे आधी १६ हजारात व्हायचे, त्यावर आता ५ टक्के आणखी खर्च होत आहे, तेव्हा तुमचे ८०० रुपये आणखी खर्च होत आहेत, तेव्हा मागील वर्षी जे काम १६ हजारात व्हायचे, त्यासाठी आता १६८०० रुपये मोजावे लागत आहेत. तुमचा पगार २ हजारांनी वाढला आहे, ज्यातील ८०० रुपये महागाईमुळे खर्च झाले, तरीही तुमच्याकडे १२०० रुपये आहेत.
आता हे समजून घेऊयात की, २० टक्के नियम हा आहे की, २० टक्के तुम्हाला आणखी गुंतवायचे आहेत. जेव्हा तुम्ही २० हजार कमवत होता, तेव्हा त्यातून ४ हजार रुपये बचत करायचा. आता तुम्ही २२ हजार कमवत आहात, तर त्याचे २० टक्के होतात ४४००.
तुम्ही ४ हजार रुपये बचत करण्यापासून सुरुवात केली होती. त्यातील १ हजार रुपये विम्यासाठी गेले आणि ३ हजार रुपये उरले आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करू लागला. जर तुम्ही आता २०-२५ वर्षांचे असाल, तर ४०-४५ वर्षांचे होईपर्यंत २० वर्षांत तुम्ही दर वर्षी ३ हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढवत असाल, तर तुम्हाला १२ किंवा १३ टक्क्यांच्या हिशोबाने ४० वयापर्यंत १ कोटी रुपये जमा होतील. म्हणजेच तुम्ही चाळिशीपर्यंत कोट्याधीश बनाल. २० वर्षांनंतर तुमच्याकडे १ कोटी असतील आणि तुम्ही आणखी ५-६ वर्षे थांबलात, तर तुमच्याकडे ५० वयापर्यंत २ कोटी रुपये येतील. यात दोन प्रश्न उद्भवू शकतात, त्यातील एक असा की, दोन कोटी जरी असले, तरीही तेव्हा यांचे मूल्य किती असेल.
हेही आपण पाहूयात. आजपासून २५-३० वर्षांनंतरही २ कोटी रुपयांचे मूल्य जर ५-६ टक्के महागाई पकडली, तरीही तुमच्याकडे त्यावेळी आजच्या हिशोबाने ६५-७० लाख रुपये असतील. एवढ्या पैशात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आणखी एक गोष्ट अशी की, तुमचे लग्न झालेले असेल. त्यामुळे तुमचा पार्टनरही कमावता असेल. त्यामुळे दोघेही कमावते असल्यामुळे खर्च वाढणार नाही. अनेक खर्च सामान्य असतात. घरखर्च तेवढा वाढणार नाही. तुमची बचत जास्त होऊ शकते. कधी पगारात १० टक्क्यांची वाढ मिळेल, कधी २० टक्क्यांची, तर कधी ३० टक्क्यांची. या गोष्टींचा हिशोबही आपण अद्याप केला नाही. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असा की, ५० वर्षांच्या वयात श्रीमंतीचा काय फायदा.
तर हे आपण एकदम वर्स्ट केसमध्ये पाहिलं आहे. मात्र, जर तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही जास्त गुंतवणूक केली, तर होऊ शकतं की, तुम्ही ३५-४० वयात श्रीमंत होऊ शकाल. त्यामुळे तेव्हा तुम्ही या पैशांचा मनासारखा वापर करू शकाल.
तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच, तुमच्या जॉब करणाऱ्या मित्रमंडळींनाही हे आर्टिकल नक्की शेअर करा.
आणखी वाचा
- शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी
- कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?
- भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा