यशवंत एक प्रेरणास्रोतलेखमालिका

अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ

sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

अठराव्या वर्षापर्यंत चिंधीची तीन बाळंतपणं झाली. ती चौथ्या वेळी गर्भवती असताना तिने तिच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

मग जमीनदाराने चिंधीच्या पोटातील मूल आपलेच असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात चिंधीच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या चिंधीला त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गावकऱ्यांनीही गावाबाहेर हाकलले. माराने अर्धमेल्या झालेली चिंधी माहेरी आली, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.

चिंधीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण “लहान मुलीचा जीव घेतला, तर पाप लागेल.” म्हणून चिंधी मागे फिरली. मग भीक मागत पोट भरणे सुरू झाले. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर चिंधी भीक मागत हिंडू लागली. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरू लागली. भीक मागणे, स्टेशनवर झोपणे, उपाशी राहणे या सारख्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण, २१ वर्षाची चिंधी डगमगली नाही.

sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

चिंधी पुण्यात आली. रस्त्यावर तिला एक मुलगा रडत बसलेला दिसला. मुलाला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली. तिथे तक्रार नोंदवून घेतली नाही.

चिंधीने मुलाला सांभाळण्याचे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले तिला भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रितांचे जगणे किती भयंकर असते ते तिने अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, अशी तिची इच्छा होती. आणि म्हणून ही चिंधी बनली ‘अनाथांची यशोदा’ ही अनाथांची यशोदा म्हणजेच सिंधुताई सपकाळ.

सिंधुताईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या या छत्रछायेखाली त्यांचा नवरा सुद्धा आला. पण, नवरा म्हणून नाही मुलगा म्हणून…

sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

sindhutai-sapkal-the-story-of-a-remarkable-woman

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे. सिंधुताई सपकाळ या एक खऱ्याखुऱ्या यशवंत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button