नोकरीतून उद्योजकतेकडेलेखमालिका

नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितका सोपा नाही.

जर

  • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल किंवा
  • तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा
  • करिअरमध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा
  • नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल किंवा
  • तुम्ही अशी नोकरी करत असाल, जी आयुष्यभर करत राहण्याची
  • तुमची अजिबात ईच्छा नाही किंवा
  • बॉसचा वैताग आला असेल किंवा
  • तुम्हाला जाणवत असेल; आपण इतर सहकाऱ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतो, पण संधी मिळत नाही किंवा
  • बऱ्याच दिवसांपासून एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल किंवा
  • स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल किंवा
  • आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ईच्छा आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य हवं असेल किंवा

बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल, तर योग्य वेळी हे पुस्तक तुमच्या हाती पडलं आहे याची खात्री बाळगा मी जेव्हा असे नोकरदार बघतो, जे त्यांच्या नोकरीत, त्यांच्या आयुष्यात अजिबात सुखी नाहीत, तेव्हा मला प्रचंड दुःख होतं, वाईट वाटतं. शिक्षण संपलं की कुठेतरी नोकरी बघायची, नोकरी मिळाली की लग्न व्हावं म्हणून कर्ज काढून घर घ्यायचं. घर घेतलं की लग्न करून संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतून राहायचं हेच त्यांचं आयुष्य बनून जातं. अनेकांच्या बाबतीत घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, कुटुंबाची जबाबदारी उचलता यावी म्हणून त्यांना नोकरी करावी लागते. काहीजण असेही असतात की, त्यांना वेगळं काहीतरी करायची इच्छा असते, परंतु ‘काही तरी कामधाम कर’ हा घरातल्यांचा पिच्छा सुटावा म्हणून नाईलाजास्तव नोकरी करतात. नंतर ही सगळी मंडळी आयुष्यातील अनेक वर्ष बँकेचे हप्तेच फेडत असतात. ५० हजार पगार असला, तरी त्यातील २५-३० हजार हप्त्यांवरच खर्च होत असतात.

कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता,
कहीं जमी तो कहीं आसमान नही मिलता…

या काव्यपंक्तीप्रमाणे आयुष्यात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असं नाही. अनेकदा तडजोड स्वीकारावी लागते. नाईलाज म्हणून स्वीकारलेले काम नीरस वाटू लागते. कधीकधी काम वेळेवर पूर्ण होत नाही, त्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. बॉससोबत नेहमीच ‘पंगा’ होत राहतो. त्यामुळे कामाची लय बिघडते. कधी सहकाऱ्यांसोबत वाद होतात. रोजचे काम करताना ना आनंद वाटत असतो, ना काही वेगळे शिकायला मिळाल्याचे समाधान. प्रत्येक महिन्याच्या शेवटी हातात येणारा पगाराचा चेक आणि आठवड्याच्या शेवटी एक किंवा दोन दिवसांची सुट्टी यासाठी ही मंडळी आठवड्याचे ५ दिवस खाली मान घालून निमूटपणे काम करत असतात. जिथं काम करायला आवडत नाही, तिथं जावं लागतं; ज्यांच्यासोबत पटत नाही, अशा लोकांसोबत काम करावं लागतं.

खरंतर ही सगळी मंडळी खूप मेहनत करत असतात. आपल्या आस्थापनेसाठी आयुष्यातील बहुतांश वेळ देत असतात. घाण्याला लावलेल्या बैलासारखे राब राब राबत असतात, पोटाला चिमटा काढत असतात, ऑफिसमध्ये १० ते १२ तास धडपडत असतात, पण दिवसाच्या शेवटी पुरते थकलेले असतात. आयुष्यातील इच्छा, आकांक्षा आणि उद्देशच ते हरवून बसलेले असतात. पैशांच्या मागे लागतात आणि जगणं विसरतात. चाकोरीबद्ध आयुष्य त्यांना जग वाटायला लागतं आणि ते तिथेच थांबतात.

गेली बरीच वर्षं मी या सर्वांसाठी काहीतरी ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली की; ही सर्व लोकं जी या दुष्टचक्रात अडकली आहेत आणि ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे, त्यांनी ‘नोकरीतून उद्योजकतेकडे’ जायची गरज आहे. उद्योजक होणं हा एक चांगला आणि शाश्वत मार्ग असू शकतो. यामुळे स्वातंत्र्य, अर्थपूर्ण आयुष्य आणि बऱ्यापैकी चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

हे जरी खरं असलं तरीसुद्धा, नोकरदार ते उद्योजक बनणं हा प्रवास तितकासा सोपादेखील नाही. सुरुवातीच्या काळात या नवउद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील बऱ्याच अडचणींतून मी सुद्धा गेलेलो आहे.

त्यामुळेच या उद्योजकांची मदत व्हावी म्हणून मी नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायऱ्या विकसित केल्या आहेत. या पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की कोणीही यांचा सहजपणे वापर करू शकतं.

त्यासाठी तुमच्याकडे उद्योजकतेचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या नोकरीला आणि बॉसला ‘टाटा-गुडबाय’ म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातीत आयुष्य जगू शकता. ते कसं करायचं हे या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत.

करूया सुरुवात…!

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button