नोकरीतून उद्योजकतेकडेलेखमालिका

नोकरीतून उद्योजकतेकडे : मनोगत

आज जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत, तर ग्रामीण भारतातील कोट्यावधी लोकांचे मासिक उत्त्पन्न ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत, मानवी संस्कृतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी उद्योजक महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात.

३२.२४ लाख कोटी रुपये (४५० अब्ज डॉलर्स) सकल राज्य उत्पादन (जीएसडीपी) असेलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या एकूण जीडीपीतील १५ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. देशातील उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी (एफडीआय) ३० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. देशातील सर्वाधिक कोट्याधीश आणि अब्जाधीशसुद्धा महाराष्ट्रातच राहतात. एवढं सगळं असूनही या उद्योग क्षेत्रात सदैव आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात मराठी उद्योजक मात्र जितका दिसायला हवा तितका दिसत नाही. आपल्याकडे अशी म्हण आहे की, अंथरूण पाहून पाय पसरावे; पण अंथरुणच मोठं घ्या असं कुणीही सांगत नाही. अगदी प्राचीन काळापासून देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यापार केला जातो आहे, पण ‘मोठा झाल्यावर तू व्यवसाय कर’ किंवा ‘मोठा बिझनेसमन हो’ असं आपल्यापैकी किती जणांना त्यांच्या पालकांनी सांगितले? बोटावर मोजण्याइतके असतील. परंतु आजकालच्या नोकरदारांमध्ये, तरुण पिढीमध्ये उद्योजकता हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडण्याचे प्रमाण वाढते आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या हाताखाली ‘नोकरी’ करत राहण्याची मध्यमवर्गीय मानसिकता आता बदलत आहे.

जगातील लाखो लोक नोकरीला लाथ मारून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची, प्रचंड पैसा कमवायची स्वप्नं रोज बघत असतात. आपल्याला कोणीही बॉस नसेल, स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील, काम करण्याचं कोणतंही बंधन नसेल यामुळे नोकरी सोडायचा विचार जरी आकर्षक वाटत असला, तरी वास्तव स्वप्नापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकतं. पूर्ण विचार न करता नोकरी सोडण्यामुळे वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो, मानसिक त्रास होईल तो वेगळाच.

डोक्यात आयडिया आली किंवा एखाद्या मित्राने सांगितलं किंवा कुठेतरी अमुक अमुक धंदा जोमात आहे, अशी बातमी वाचली/बघितली आणि बिझनेस करायचा म्हणून कसलाही विचार न करता सरळ नोकरी सोडली, याला निव्वळ मूर्खपणा म्हणतात. व्यवसाय सुरु करणं एकवेळ सोपं आहे, पण तो यशस्वीपणे चालवणं तितकंच अवघड. त्यामुळे पूर्वतयारी केल्याशिवाय व्यवसायात उतरणे धोक्याचे ठरू शकते. ही पूर्वतयारी कशी करायची हे चार सोप्या पायऱ्यांमध्ये या पुस्तकात सांगितले आहे. त्याचसोबत गुंतवणूकदार कसे शोधायचे, कमी खर्चातील मार्केटिंगच्या पद्धती, व्यवसाय नोंदणीचे प्रकार आणि कंपनीचं नाव, लोगो, टॅगलाईन बनवताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती दिली आहे.

प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, श्रीमंत व यशस्वी व्हायचं असतं, त्यासाठी नोकरी करून काही होणार नाही, हेही कळतं, पण व्यवसायात उतरताना भीती व संकोच असतो. जवळ बुद्धी व कौशल्य असते, पण योग्य मार्गदर्शनाअभावी धाडस होत नाही. हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे सध्या नोकरी करत आहेत, पण त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. हे पुस्तक अशा उद्योजकांनासुद्धा उपयुक्त ठरेल, जे सध्या त्यांच्या व्यवसायात अनेक आव्हानांचा आणि अडचणींचा सामना करत आहेत. यातील संकल्पना समजून घेऊन, त्यावर आवश्यक कृती करून, सर्व प्रकारच्या भीतीवर मात करून, सावधपणे एकेक पाऊल पुढे जात राहिले पाहिजे. अनेक वर्ष नोकरीत अडकून पडलेल्या नोकरदारांमध्ये दडलेला उद्योजक जागरूक व्हावा यासाठी त्यांना नोकरीतून उद्योजकतेकडे नेणाऱ्या एका सेतूची गरज आहे असा सेतू बनवण्याचा हा प्रयत्न आहे. रामायणात वानरांनी समुद्रात एक एक दगड टाकून रामसेतू बनवला आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला. त्याप्रमाणे ह्या सेतूवरुन असंख्य श्रीराम प्रवास करोत आणि आपल्या आयुष्यात यशस्वी होवोत याच सदिच्छा…

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button