जो जमेल, जो मिळेल; तो धंदा, न लाजता करा
गेली अनेक वर्षे मुंबईत व्यवसाय करीत असताना अनेक व्यापारी समाजांशी संबंध आला. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपल्या माणसांना व समाजाला वरती आणण्यासाठी ५% चा सामाजिक नियम अनुभवला. या समाजात ज्याला व्यवसायात भरभरून यश मिळाले, पैसा मिळाला, नाव मिळाले ते आपल्या फायद्याच्या ५% इतकी रक्कम किंवा वेळ आपल्या समाज बांधवांच्या उद्धारासाठी देऊ करतात. हाच विचार पुढे घेऊन जाताना २०१४ पासून आपल्या माणसांसाठी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी माझ्या फायद्यातील ५% व उपलब्ध वेळेतील ५% वेळ देऊन मराठी उद्योजकता चळवळ सुरु केली. त्यामध्ये प्रत्येक मराठी माणसाला करता येतील, अशा हजारो बिझनेस आयडिया तसेच प्रेरणा देणारे शेकडो संशोधनपर लेख लिहिले. वेळ मिळेल तसा महाराष्ट्रभर अनेक व्यापारी संस्था, विद्यालये व संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व्याख्याने दिली. या लेखांचे आज २५ लाख वाचक असून त्यातून प्रेरणा घेऊन सुमारे १८ हजार तरुणांनी आपला व्यवसाय सुरु केला.
माकडासमोर केळी आणि दोन हजारांची नोट ठेवली, तर माकड केळी उचलतं. माकडाला हे माहित नसतं की, दोन हजारांत अनेक केळी विकत घेता येतात. केळी घेऊन तात्पुरती भूक भागवणे हा एकच मार्ग त्याला माहित असतो. मराठी माणसाचेही तसेच आहे. मराठी माणूस उद्योग करून लाखो रुपये कमावण्याऐवजी, काही हजारांची नोकरी मिळवण्यास प्राधान्य देतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून उद्योग करावा, लाखो करोडो रुपये कमवावेत व इतरांना आपल्याकडे नोकरीसाठी ठेवावे असे कोणालाच वाटत नाही. आज महाराष्ट्राचा भूमिपुत्र गरिबी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालाय. कमी शिकलेले लोक उद्योग करतात व उच्च शैक्षणिक पात्रता आणि प्रतिभा असणारे त्यांच्या हाताखाली नोकरी करतात. त्यामुळे आपण आपल्या विचारसरणीत क्रांतीमय बदल घडवून आणला पाहिजे.
सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे लग्नं जुळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मानसिक तणाव दिसून येतो. काहीजण या तणावावर मात करुन पुढे जातात, तर काहीजण व्यसनाचा आधार घेतात. उमेदीचा काळ अशा गोष्टींमुळे वाया गेल्याने नंतर त्यांच्या आयुष्यात संघर्ष सुरु होतो. त्यामुळे मुलांना बिनकामाचे शिक्षण देण्यापेक्षा व्यवसायाभिमुख व कौशल्य प्रदान करणारे शिक्षण दिले पाहिजे. हल्लीच्या मुलांमध्ये नवीन शिकण्याची वृत्ती, धाडस व उच्च क्षेत्रात झेपावण्याचे बळ आहे, त्याची जाणीव त्यांना होणे गरजेचे आहे.
आजकाल अनेक चांगली शिकलेली मुलं, गृहिणी, व्हीआरएस घेतलेले लोक भेटतात. प्रत्येकाकडे काहीतरी अनुभव, ज्ञान, वेळ व मेहनत करण्याची तयारीही असते पण; नेमकं काय करायचं, कोणता व्यवसाय निवडायचा, तो कसा एकत्र करायचा, ग्राहक कुठून मिळतील, नेमकी प्रक्रिया कशी असेल, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे हे सर्व प्रश्न त्यांच्या डोक्यात असतात. या जगात अगणित संधी आहेत, पण बऱ्याच जणांना याची माहिती नसते. या सर्वांसाठी ही लेखमाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या लेखमालेतील बिझनेसच्या १०१ भन्नाट आयडिया वाचून अनेकांचा निश्चितच फायदा होईल. या सर्व लेखांचे संकलन असलेले पुस्तक नवी अर्थक्रांती प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. https://shop.naviarthkranti.com इथून आपल्याला ते विकत घेता येईल.
कोणताही व्यवसाय एकदम करोडोंचा होत नसतो. गाड्या, फॅक्टरी, कार्यालये ही काही अल्पावधीत होणारी गोष्ट नसते. प्रत्येकाला आपली आपली एखादी ‘भन्नाट बिझनेस आयडिया’ शोधावी किंवा निवडावी लागेल व त्या दृष्टीने व्यवसायाचे मार्गक्रमण करावे लागेल. तुम्हीही तुमच्या परीने ५% चा नियम आपल्या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला लागू करा. “घेणाऱ्याने घेत जावे व घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे.” माझ्या असंख्य वाचक बांधवाना त्यांच्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा…! लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरो…! हीच माझी प्रार्थना…! शक्य असल्यास आपला अनुभव मला जरूर कळवावा. आपल्याला हे पुस्तक आवडलं, तर आपण हे पुस्तक आपल्या मित्रमंडळीना, नातेवाईकांना अवश्य वाचायला द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
शेवटी एवढंच सांगतो, वडापावची गाडी टाका, रेस्टॉरंट टाका, फर्निचर बनवा, गवंडीकाम करा, वायरमन व्हा, ड्रायव्हर व्हा, भाजी विका, इडली सांबार विका, दूध घाला, पेपर टाका; जो जमेल, जो मिळेल तो धंदा न लाजता करा. धन्यवाद.
टीप : या लेखांत दिलेले आकडे हे केवळ संदर्भासाठी आहेत. आपली कल्पना, नियोजन, व्यवस्थापन, जोखीम घेण्याची, गुंतवणूक करण्याची क्षमता यावर व्यवसायाची वाढ अवलंबून असते.