शिकण्यासाठी सारे काही
शिकणे ही आयुष्यभर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालू राहिली तरंच माणूस प्रगती, विकास, सुकर जीवन तसेच हवी ती गोष्ट तो प्राप्त करुन घेऊ शकतो. त्यामुळे शिकणे ही प्रत्येकाची गरज आहे. तुम्ही उद्योजक असा, विद्यार्थी असा, नोकरदार असा, शिक्षक असा, वकील असा, सीए असा, आयटी प्रोग्रॅमर, राजकीय व्यक्ती असा, खेळाडू असा अगदी कोणीही असा शिकणे ही प्रत्येकाची गरज आहे.
त्यासाठी प्रत्येक वेळी शाळेत किंवा महाविद्यालयात गेलेच पाहिजे असे काही नाही. माणूस अनुभवातून शिकत जातो. चांगल्या लोकांच्या सहवासात राहून माणूस चांगूल पणा शिकतो. तर यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहून माणूस यशस्वी बनायला शिकतो. पैसेवाल्या लोकांच्या संगतीत राहून त्याला आर्थिक मार्गांचे दर्शन होते. जिथे जाईल तिथे माणूस कळत नकळत बरेच काही शिकत असतो. अध्यात्मिक लोकांच्या उपस्थितीत त्याला शांततेचे दर्शन प्राप्त होते. निसर्गाच्या वास्तव्यात त्याला विश्वाची रहस्ये समजू शकतात.
शिकण्याची ही प्रक्रिया आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासून सुरु होत असल्याचे विज्ञानाने मान्य केलेले आहे. महाभारतात सुध्दा अभिमन्यू आई द्रौपदीच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसे जायचे? ही कला शिकला होता अशी कथा आहे. जन्माच्या आधीपासून सुरु झालेली ही शिकण्याची निरंतर प्रक्रिया माणसाचे अस्तित्व आहे तोपर्यंत चालूच राहते. आईच्या पोटात असताना किंवा लहान असताना तो जे काही शिकतो ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते. आपोआप काही गोष्टी तो शिकत जातो. उदा. चालणे, बोलणे, खाणे अशा काही गोष्टी तो स्वतःहून ग्रहण करतो.
मात्र अक्षरओळख होणे, गणिते, आर्थिक व्यवहार करणे यासारख्या मानवनिर्मित गोष्टी त्याला नैसर्गिक पध्दतीने शिकता येत नाहीत. त्यासाठी त्याला बाहेरुन प्रयत्न करावे लागतात. या गोष्टी आपोआप होत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या प्रयत्नाने साध्य होईल तेवढे यश संपादन करतो. नैसर्गिक गोष्टीत प्रत्येकजण १०० टक्के यश प्राप्त करतो कारण या गोष्टी आपोआप होत असतात. प्रत्येकजण चालायला शिकतो म्हणजे १०० टक्केच चालायला शिकतो. त्यात निसर्ग भेदभाव करत नाही. प्रत्येकाला तो संपूर्ण क्षमता बहाल करतो. मात्र माणसाला वैयक्तिक विकास साध्य करताना त्याच्या प्रयत्नाइतके यश मिळते.
शिकवणारे शिक्षक प्रतिभावान असले आणि त्यांची शिकवण्याची पध्दत सोपी व रंजक असली तर विद्यार्थ्याच्या प्रगतीचा वेग वाढीस लागतो. शाळा महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जीवनाच्या शाळेत माणसाला खूप काही शिकावे लागते. मुलाखतीला (Interview) जाताना करण्याची तयारी असो, की कंपनीत कामाला सूरवात केल्यानंतर शिकाव्या लागणाऱ्या गोष्टी असोत, की स्वतःचा उद्योग सुरु केल्यावर शिकाव्या लागणाऱ्या गोष्टी असोत एकंदरीतच प्रत्येकाला रोज नवीन काहीतरी शिकावे लागतेच. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करावे लागतात. कायदे बदलले की सामाजिक संकेत बदलतात त्यानुसार अनुशीलन करण्यास शिकावे लागते.
एकंदरीतच शिकण्याच्या व ज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टींवर आपल्या विकासाचा व प्रगतीचा दर अवलंबून असतो. म्हणून शिकण्यासाठी सोप्या प्रक्रिया कोणत्या? त्या अधिक प्रभावी कशा करता येतील? त्या सर्वसमावेशक कशा असतील? यावर सविस्तर अभ्यास आपण येणाऱ्या नव्या लेखमालिकेत करणार आहोत. प्रत्येकाला स्वतःच्या कलानुसार शिकण्यास मिळाले तर किती चांगले होईल. सचिनला क्रिकेट, लता संगीत, अमिताभला अभिनय, सायनाला बॅडमिंटन शिकताना जेवढे आवड होती तेवढी कदाचित दुसरे विषय शिकताना नसावी. त्यांना त्यांचे कल व कला समजल्या त्यानंतर त्यांची शिकण्याची व त्यातील सर्वोच्चता साध्य करण्याची वाट मिळाली. विद्यार्थ्यापासून नोकरदारांपर्यंत, गृहिणीपासून उद्योजकापर्यंत प्रत्येकाला शिकण्याचे काय फायदे होतात? याविषयीचे कानमंत्र या नव्या लेखमालिकेत दिले आहेत.
लेखमालिकेचे नाव जरी शिकण्यासाठी सारे काही असले तरी त्याचा खरा अर्थ सारे काही मिळवण्यासाठी शिकणे ही मानवाची खऱ्या अर्थाने असलेली गरज लक्षात घेऊन लेखमालिकेची रचना करण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यापासून सीबीएसई (तत्सम सर्व) च्या विद्यार्थ्यांसाठी व जीवनात प्रगती करु पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडणारे लेख या मालिकेत आपल्याला वाचायला मिळतील.