व्यवसायाच्या वाटेवर चालताना – कशी करावी सुरुवात?
काही तरुणांना भेटून व्यवसायाला कशी सुरुवात करणार? याविषयी विचारले असता मिळालेली काही उत्तरे. ‘घरातून पैसे घेणार नाही’ किंवा ‘घरातले लोक व्यवसायासाठी पैसे देत नाहीत तर अजून शिकायचे असल्यास किंवा नोकरी लागण्यासाठी पैसे द्यायला तयार आहेत’ किंवा ‘कशी सुरुवात करायची याविषयी काही विचार केला नाही’ अशी वेगवेगळी उत्तरे मिळाली.
आता ही सर्व उत्तरे सोडून व्यवसायाची सुरुवात कशी करता येईल याचे योग्य व सोपे असे उत्तर शोधून काढूया. नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरले. दुसऱ्या लेखाकांत व्यवसाय करण्याचे फायदे पाहिले. सुरुवात करण्याआधी काय करावे व मानसिकता कशी असावी याबाबत जाणून घेतले. कोणता व्यवसाय करावा व त्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र कसे निवडावे हेही आपण ठरवले. बिझनेस प्लॅनची गरज जाणून घेतली. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. घरातील व्यक्ती पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनुभवाबद्दल जाणून घेतले. हे सगळे केलेल्या व्यक्तीला व्यवसायाच्या सुरुवातीला करायच्या गोष्टींचा अंदाज आलेला असतो.
व्यवसाय करण्यासाठी लागणारे भांडवल किती व ते कसे मिळवावे? भांडवल उभारणी करत असताना तारण नसल्यास काय करावे? भांडवल उभारणीचे पैसे परत कसे करावे? सरकारी परवानग्या कोणत्या व त्या कशा मिळवाव्यात? या परवानग्यांचा होणारा फायदा कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे बाकी असते. त्याआधी आपली उत्पादने (वस्तू/सेवा) निर्मितीसाठी लागणारी यंत्रे, अवजारे, मनुष्यबळ व जागा या सारख्या गोष्टी कुठे मिळतील याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे भांडवल उभारणीनंतर आपला उद्योगाचा मार्ग सुकर होतो. व्यवसायाची वाढ अतिशय वेगाने होते
उत्तम प्रकारची भेटकार्डे (visiting cards), लोगो डिझाईन, माहितीपत्रक (brochure), बिझनेस प्लॅन, लेटरहेड व वेबसाईटची प्रतिकृती किंवा कच्चा आराखडा (blue print), शिक्के (stamps) यासाठी लागणारा मसुदा (data) तयार करणे, डिझाईन करणे ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात, कारण यासाठी फार पैसे मोजावे लागत नाहीत. मात्र याचमुळे आपल्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते. कोणालाही भेटताना तुम्ही visiting card देता; तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही केलेली तयारी दिसून येते.
तुम्ही भांडवल उभारणी करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी पाठवलेला प्रत्येक ईमेल हा लेटरहेड वरच असावा. लेटरहेडचे एक module तुमच्या लॅपटॉपमध्ये जतन करुन ठेवलेले असावे. त्यामुळे आपण पाठवलेला प्रत्येक व्यवसाय प्रस्ताव गांभीर्याने वाचला जाण्याची शक्यता वाढते. तुम्ही कार्यालय/ऑफिस घेऊ शकत नसाल, तर घरचा पत्ता हा कार्यालयाचा पत्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरा. व्यवसायाचे फेसबुक पेज तयार करावे, त्यासाठी एकही रुपयाचा खर्च नाही, मात्र हजारो लोकांपर्यत व्यवसाय पोहोचवण्यास त्याची मदत होते.
आपल्या व्यवसायात भागीदार घेणार की नाही? हा प्रश्न सोडवणे गरजेचे ठरते. भागीदार घेणार असल्यास त्याचे व तुमचे काम काय असेल? याची विभागणी करणे किफायतशीर ठरेल. एकाच व्यक्तीने सर्व काम करणे म्हणजे व्यवसायाला मिळालेली गती कमी करण्यासारखे ठरते. त्यामुळे व्यवसायाच्या प्रमुखाने स्वतःचा काही काळ रिकामा ठेवला पाहिजे, जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी इतर प्रयत्न करता येतील.
लागणारी यंत्रे घेतलीच पाहिजेत किंवा नाही याचा विचार तुमच्या मूळ भांडवलाचा अंदाज घेऊन केला पाहिजे. फार कमी भांडवल असल्यास काही कामे outsourcing करणे हितावह ठरते. त्यामुळे जागा व पैशाची बचत, तर होतेच शिवाय आपल्याला थोडासा वेळही मिळतो.
व्यवसाय करु इच्छिणारी काही हुशार माणसे आपल्या सोबत असल्यास त्यांच्याकडून आपण बनवलेली प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे व त्यात अपेक्षित असणारे बदल केले पाहिजेत. ही हुशार माणसे तुम्हाला कायमस्वरुपी मार्गदर्शकाच्या भूमिकेत भेटत असतात. त्यांचा आदर करणे व त्यांची मर्जी राखणे ही आपली प्राथमिकता असावी. मग काही कायदेविषयक, तर काही अर्थविषयक, काही लोकसंपर्क दांडगा असलेली अशी प्रत्येक प्रकारची माणसे तुमच्याकडे असली पाहिजेत. त्यांना पगार देऊन कामाला ठेवणे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यात परवडण्यासारखे नसले, तरी अशा माणसांचे संपर्क आपल्या मोबाईलमध्ये कायम जतन करुन ठेवलेले असल्यास आपल्याला हवे तेवढे काम तेवढाच मोबदला देऊन करुन घेणे उत्तम ठरते.
आता जवळजवळ सगळेच महत्त्वाचे कानमंत्र सांगून झालेत ते अंमलात आणण्यासाठी शुभेच्छा!!!
- अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती
आणखी वाचा
- व्यवसायाच्या वाटेवर चालताना – प्रस्तावना
- व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय