लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

कुटुंबीयांचा पाठिंबा की विरोध ? व उपाय

उद्योगपती वालचंद हिराचंद, लोखंडी नांगरांना जन्म देणारे किर्लोस्कर बंधू, आबासाहेब गरवारे, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, विकोचे पेंढारकर घराणे, कॅमलिनचे दांडेकर, आयफ्लेक्सचे दीपक घैसास, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, घोडावत ग्रुपचे संजय घोडावत, व्हीआयपी कपड्यांचे सर्वेसर्वा पाठारे बंधू, सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर, मराठी नाटक व्यवसायाला वेगळा आयाम देणारे विष्णुदास भावे, दाते पंचांग विकणारे दाते, पितांबरीचे प्रभुदेसाई, बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड, माने ग्रुपचे रामदास माने, हावरे ग्रुप अशी न संपणारी मराठी व्यावसायिकांची यादी आहे.

मात्र या सर्व उद्योजकांचा विचार केला तर असे आढळून आले आहे, ते म्हणजे यातील बहुतांश उद्योजक हे पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांना आपला उद्योग वारसा पुढच्या पिढीकडे म्हणाव्या तशा प्रभावी पध्दतीने हस्तांतरीत करता आला नाही व या सर्व उद्योजकांच्या आधीच्या पिढीनेही कधी व्यवसाय केलेला नव्हता. त्यामुळे ओघानेच हे आले की, कोणालाही कुटुंबातून फारसा पाठिंबा मिळाला नव्हता. तरीही या उद्योजकांनी आपला उद्योग मोठा करण्याची स्वप्ने पाहिली. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसले, आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला व अपेक्षित असणारे यश त्यांना मिळाले. त्यामुळे आपण खचून न जाता या उद्योजकांनी निर्माण केलेल्या वाटांवरून पुढे चालायचे आहे.

घरातील व्यक्तींचा विरोध कमी करुन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे काही उपाय आपण पाहू या. घरातील व्यक्तींचा विरोध असणाची काही कारणे म्हणजे उत्पन्नाची अनिश्चितता, भांडवल लावण्यासाठी कमी पडणारी क्षमता, अनुभवाचा अभाव ही होत. एकतर तुम्ही भरपूर पैसा कमावून घरी द्यायला लागला की, घरच्यांचा व्यवसायाला असलेला विरोध सहज मावळून जातो. तुम्ही पैसे कमावावेत ही त्यांची माफक अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. आता घरातील सर्वात जिव्हाळ्याच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन व्यवसाय पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घरातील या व्यक्तीला तुम्ही व्यवसाय करु शकता ही खात्री पटवून देऊ शकलात, तर व्यवसायासाठी लागणारी मदतसुध्दा घरातल्या व्यक्तींकडून मिळते. जेव्हा तुम्ही घरातील या व्यक्तीचा विश्वास संपादन करता तेव्हा तुम्हाला कोणालाही व्यवसाय पटवून देण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. मग ती व्यक्ती हळूहळू घरातील इतर व्यक्तींना तुमच्या बाजूने करते.

गुजराती, मारवाडी, पंजाबी व सिंधी कुटुंबामध्ये घरातील वातावरणच व्यवसायासाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना जास्त संघर्ष करावा लागत नाही. म्हणून शक्यतो काहीजणांनी मिळून व्यवसाय चालू केला, तर प्रत्येकाने दुसऱ्याच्या घरात समजावून सांगावे म्हणजे ते पटकन समजून जातात व त्यांना विश्वास बसतो की हा शेजारचा/किंवा कॉलेजमधला मित्र व्यवसाय करतोय म्हणजे तुमच्याबरोबर कोणीतरी आहे व तुम्ही काहीतरी करु शकता.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट; कुटुंबातील व्यक्तीचा पाठिंबा असो किंवा विरोध असो आपले पूर्ण लक्ष व्यवसाय मोठा करणे, त्यासाठी लागेल त्या गोष्टी करणे यावरच असले पाहिजे. घरातील लोक तुम्हाला सुरवातीला पाठिंबा देत नसतील, तर कालांतराने का होईना ते तुमच्या बाजूने होतातच. हे सगळीकडे झाले आहे हा इतिहास आहे. परत या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा.

अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button