लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

लेख ७.२ – बिझनेस प्लॅन कसा तयार करावा?

५. स्पर्धक – आपण करत असलेल्या उत्पादनांची निर्मिती करणारे कितीतरी उद्योजक आपल्या कार्यक्षेत्रात असतात. त्यापैकी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत व आपल्या ग्राहक वर्गाला आकर्षित करणारे कोण आहेत. त्या तीन–पाच स्पर्धकांची नावे यात समाविष्ट करायची आहेत. कारण आपल्याला आपल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी हे माहिती असणे गरजेचे असते. याशिवाय गुंतवणूकदाराला हे समजते की आपला बाजाराविषयी (मार्केटचा) अभ्यास खूप चांगला आहे.

६. स्पर्धकाच्या तुलनेत असणारी तुमची वैशिष्टे – आपण ज्या प्रकारचा व्यवसाय करतो आहे, त्या प्रकारची उत्पादने निर्माण करणारे उद्योजक जर आधीच असतील तर आपण नवीन उद्योग सुरु का करतोय? किंवा आपल्या व्यवसायाची ग्राहकांना गरज काय? आपला व्यवसाय चालण्याची शक्यता काय? या प्रश्नांची उत्तरे देणारा हा टप्पा आहे. तर या प्रश्नांची उत्तरे अशी असतात; आधीचे उद्योजक ज्या सेवा देण्यात कमी पडतात, त्या सेवांची उपलब्धता करुन देण्याची क्षमता असणारी उत्पादने आपण तयार करत आहोत, त्याच किंमतीत चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवत आहोत.

७. लागणारे भांडवल व त्याचा उपयोग – आपण सुरु करत असणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे अंदाजे भांडवल आणि त्याचा उपयोग आपण कोणत्या गोष्टींसाठी आणि कशा प्रकारे करणार आहोत याची माहिती गुंतवणूकदारांना द्यावी लागते.

८. विक्री व जाहिरात माध्यमे – या टप्प्यात आपण आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहोत याची माहिती थोडक्यात द्यावी लागते. विक्री वाढवण्यासाठी कोणती पावले उचलणार आहोत तसेच आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं मार्केटिंग कसे करणार आहोत यासंदर्भात माहिती द्यावी.

९. उलाढाल, खर्च व नफा यांचा आलेख – उद्योगाला सुरुवात केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज गुंतवणूकदारांना द्यावा लागतो. यात आपल्याला साधारणपणे पुढील तीन सहामाही (दीड वर्ष) किंवा तीन वर्षात उद्योगाचा होणारा विस्तार दाखवून द्यायचा असतो. यात आपल्या उद्योगाची होणारी एकूण उलाढाल, विक्री व जाहिरात माध्यमांवर होणारा तसेच इतर खर्च वजा करून निव्वळ नफा दाखवून द्यावा लागतो. ही सर्व माहिती एखाद्या तक्त्याच्या किंवा आलेखाच्या स्वरूपात दाखविल्यास त्याचे आकलन करणे सोपे जाते.

१०. व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे व त्याची कालमर्यादा – यामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे कोणते असतील आणि ते कधीपर्यंत पूर्ण होतील याची निश्चित कालमर्यादा सांगावी लागते. उदाहरणार्थ, सहा महिन्यात दोन नवीन शाखा काढणार (ठिकाणांसहित), स्वतःची वेबसाईट सुरु करणार, उद्योगातील एखादा विशिष्ट दर्जा/मानांकन प्राप्त करणार इत्यादी.

११. सोबत काम करणारे छोटेमोठे ब्रँड – आपल्या बरोबरीने काही छोटे मोठे ब्रँड काम करीत असतील किंवा काही सेवांसाठी आपण एखाद्या उद्योगाशी, संस्थेशी, व्यक्तीशी टायअप केलेले असेल, तर त्यांचासुद्धा उल्लेख आवर्जून करावा. याचा गुंतवणूकदारांवर सकारात्मक प्रभाव निर्माण होतो.

१२. काम करणारी टीम फोटो व पदासहित – आपल्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींविषयी आणि त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे याची माहिती करून द्यावी. तसेच त्या व्यक्तींची शैक्षणिक अर्हता, कामाचा अनुभव किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवले असेल तर त्याचासुद्धा उल्लेख करावा.

१३. व्यवसायाचा पत्ता, संपर्क, ईमेल व असल्यास वेबसाईट – यामध्ये आपल्या व्यवसायाचा पत्ता, संपर्क क्रमांक, व्यावसायिक ईमेल आयडी आणि वेबसाईट असल्यास तिचा उल्लेख करावा. तसेच सोशल मिडियावर तुमचे व्यावसायिक पेज किंवा अकाऊंट असल्यास त्याची माहिती द्यावी. तुम्हाला संपर्क करण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित एकाच ठिकाणी देणे फायद्याचे ठरते.

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button