लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसाय विषयक सल्ला उठसुठ कोणालाही विचारू नका अशाच लोकांचा सल्ला घ्या, जे त्याची योग्य उत्तरे देतील

व्यवसाय हा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळला, जपला व वाढवला पाहिजे. म्हणजे त्याला लागेल ते सर्व काही पुरवायची तयारी ठेवली पाहिजे. वेळप्रसंगी काही कठोर निर्णय घेता आले पाहिजेत. मात्र व्यवसाय हा त्याच्या System प्रमाणे आपोआप चालत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तो वेगाने वाढत जातो.

आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काही करतो आहे त्यामध्ये आवड निर्माण करावी, अन्यथा आपले आयुष्य हे केवळ इतरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाचे बनून जाते. हेच तत्त्व व्यवसाय करताना लागू होते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करावा किंवा आपण जो व्यवसाय करतो त्यात आवड निर्माण करावी म्हणजे व्यवसाय हा आनंद देईल. त्यात तोचतोचपणा किंवा रटाळपणा जाणवणार नाही, त्यामुळे कायम झोकून देऊन काम करण्याची आपली तयारी होते. इतरांना अवघड वाटणारी अनेक काम आपण सहजपणे कधी करुन जातो, ते आपल्या लक्षातसुध्दा येत नाही.

मानसिकता निर्माण करण्याचा व टिकवण्याचा अजून एक उपाय म्हणजे व्यवसायविषयक सल्ला ऊठसूट कोणालाही विचारु नका. फक्त तज्ज्ञ व जाणकार मंडळीकडून हा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे. नकारात्मक लोकांपासून दूर रहावे. याचे कारण कित्येक लोकांना काहीही माहित नसताना तू व्यवसाय करु नको तुला जमणार नाही असे फुकटचे सल्ले देण्याची सवय असते किंवा काही लोक तुम्हाला नोकरीचे महत्त्व पटवून देण्यासाठीच केवळ बोलत असतात.

एका इंजिनियर मुलाने नुकताच फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या आईने तिच्या मैत्रिणीला त्या मुलाची ओळख करुन देताना त्याने फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला असल्याचे सांगितले. तेव्हा त्या मैत्रिणीने त्या मुलाला तू हा व्यवसाय करु नको ह्यात काही भविष्य नाही असा फुकटचा सल्ला दिला. त्या मुलाने विचारले की “याचे कारण काय? तुम्ही हे कशावरुन सांगत आहात?” त्या मुलाला मिळालेले उत्तर असे होते की, “माझ्या भाच्याने हा व्यवसाय सुरु केला व काही फायदा नाही म्हणून बंदही करुन टाकला व तू तर इंजिनियर असून हा व्यवसाय का करतोस? तुला एखादी चांगली नोकरी मिळू शकेल.” या प्रसंगामध्ये सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा व व्यवसायाचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. शिवाय अमुक एक व्यक्ती अपयशी झाला म्हणजे जगात कोणीच यशस्वी होणार नाही हा समज चुकीचा आहे. जगात जेवढ्या यशोगाथा आहेत त्याहून अधिक अपयशाच्या कथासुध्दा आहेत. आपण यशस्वी माणसांकडून योग्य दिशा घेऊन तसेच अपयशी लोकांकडून संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रगती करणे गरजेचे असते. आपण स्वतःच्या व्यवसायाबद्दल जेवढे जाणतो तेवढे जगातला कोणताही तज्ज्ञ जाणत नाही. म्हणून व्यवसायविषयक सल्ला घेताना अशा लोकांचा सल्ला घ्यावा की जे तुम्हाला त्याची योग्य उत्तरे देतील. पुढे जाण्याचे चांगले मार्ग सांगतील किंवा त्यांच्याकडे उत्तर नसले तर तुम्हाला हतोत्साहित करणार नाहीत. तुमच्या मार्गातील अडथळे व धोके समाजावून सांगतील व त्यावरचे उपायही सांगतील अशाच लोकांचा सल्ला घ्यावा.

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button