दिनविशेष

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… द वॉल राहुल द्रविड

Rahul Dravid Birthday

साधेपणा चोरीला गेल्याचे किंवा हरवल्याचे आजकालचे दिवस आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीने साधेपणाने वागण्यात कुणालाच फारसं नवल वाटत नसतं. पण सर्व सुखं ज्यांच्या पायाशी लोळण घेत असतात आणि समाज ज्यांना आदर्श मानतो अशा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा समोर आला तर मात्र त्याची चांगलीच चर्चा होते.

बॉलीवूड आणि क्रिकेटवर तर भारतीयांचं विशेष प्रेम. अमाप प्रसिद्धी आणि पैसा यामुळे या दोन क्षेत्रांत वावरणारी मंडळी कायम ढगातच असतात. असं असलं तरी त्याला काही अपवाद जरूर आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राहुल द्रविड. भारत सरकारद्वारे दिले जाणारे ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्याला गौरवण्यात आलंय. आपल्या सोळा वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत तंत्रशुद्ध आणि संयमी खेळीने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या द्रविडच्या नावावर कसोटीत तेरा हजारांहून जास्त तर एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजारांहून जास्त धावा जमा आहेत.

Rahul Dravid

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, उपकर्णधारपद त्याने सांभाळलेलं आहे. पण भारतीय क्रिकेट संघात असतानाही सामन्याची स्थिती, निकाल काहीही असो त्याने आपला संयम केव्हाही सुटू दिला नाही. टीव्हीच्या पडद्यावर जसा साधासरळ तो सर्वाना दिसला तसाच तो आपल्या खासगी आयुष्यातही वागत आलाय. असा हा जंटलमन काही दिवसांपूर्वी आपल्या मुलांसमवेत विज्ञान प्रदर्शनात रांगेत उभा असलेला पाहायला मिळाला. चेहऱ्यावर कुठलाही आविर्भाव नाही किंवा आजूबाजूला सुरक्षारक्षकांचा गोतावळा नाही. एखाद्या सामान्य पालकांप्रमाणे तो रांगेत उभा असल्याचा फोटो एका खासगी ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आणि वाऱ्यासारखा पसरला. पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणाच्या किश्शांनी इंटरनेटच्या वॉल भरल्या. अनेकांनी केवळ हात जोडले तर काहींनी खासगी अनुभव, त्यांच्याकडे असलेले फोटो शेअर करत द्रविडच्या साधेपणाला सलाम ठोकला.

वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी दूरवरून आलेल्या आपल्या चाहत्यांना भेटणारा, विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारा, समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना आपलं नाव सांगणारा, बंगळूरु विश्वविद्यालयातर्फे दिली जाणारी मानद डॉक्टरेट प्रांजळपणे नाकारून माझ्या मेहनतीवर ती मिळवीन असं म्हणणारा, अंथरुणाला खिळलेल्या आपल्या चाहत्याला व्यग्र कार्यक्रमामुळे भेटू न शकलेला पण नंतर स्काइपद्वारे संवाद साधणारा, अंध क्रिकेटपटूंकडून मलाच अनेक गोष्टी शिकायला हव्यात अशी कबुली देणारा, पॅराऑलिम्पियन खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या द्रविडचे असे अनेक किस्से यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चिले गेले.

Rahul Dravid, the Wall of Indian Cricket

प्रतिमा तयार करणे आणि ती विकून पैसा कमवणे हादेखील आज एक व्यवसाय झाला आहे. आपण जे नाही ते नाटय़मय प्रसंगामधून सतत लोकांसमोर मांडून सहानुभूती मिळविणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. एखाद्या क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आणि तिथून पायउतार झाल्यावरही चर्चेत राहण्याचा अनेकांचा आटापिटा सुरू असतो. पण या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड हे नाव कायमच आदराने घेतलं जात होतं आणि यापुढेही घेतलं जाईल. संयम आणि साधेपणाचं हे मूर्तिमंत उदाहरण कायम असेच सुखद धक्के देत राहो हीच आशा.

viva@expressindia.com

(हा मूळ लेख १ डिसेंबर २०१७ रोजी लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमध्ये प्रकाशित झाला होता)

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button