उद्योजकताबिझनेस महारथी

सोलापूरच्या या माणसानं देशातील पहिली बोट, पहिली कार आणि पहिलं विमान बनवणारी कंपनी उभी केली – वालचंद हिराचंद

२३ नोव्हेंबर १८८२ रोजी हिराचंद दोशी व सौ. राजू दोशी यांच्या पोटी वालचंद यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला. त्यांचे वडील सुती कपड्याचे व्यापारी होते. वालचंद यांचे वालचंदजी १८९९ मध्ये सोलापूरातून मॅट्रिक झाले आणि त्यांनी पुढील शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज व पुणे येथील डेक्कन कॉलेज येथून इतिहास व अर्थशास्त्र या विषयातून पूर्ण केले. त्यानंतर ते वडिलांच्या व्यवसायात आले. वडिलांसोबत कपड्याचा व्यापार करणाऱ्या वालचंद यांच्या लक्षात आलं की, आपलं काय या व्यवसायात मन रमत नाही. त्यांनी स्वत: बांधकाम कंत्राटदार होण्याचा निर्णय घेतला

Walchand Hirachand Doshi

तो काळ होता जेव्हा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी नुकतीच रेल्वेची सुरुवात होती, तर दुसरीकडे उद्योगपटलावर जमशेदजी टाटांसारख्या दिग्गजांचा जन्म होत होता.

या परिस्थितीत कौटुंबिक व्यवसायात न अडकता वालचंद यांनी रेल्वेमध्ये कारकून असलेले आपले सहकारी लक्ष्मण बळवंत पाठक यांच्यासोबत, पाठक वालचंद प्रायव्हेट लिमिटेड ही कन्स्ट्रक्शन कंपनी चालू केली. संपूर्ण भारतीय असणारी ही कंपनी त्यावेळची गरज होती. त्यामुळं खूप कमी वेळात कंपनीनं जोम धरला.

कामाचे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन, कामे वेळेत पूर्ण करण्याची सचोटी आणि आर्थिक रक्कम उभी करण्याचे सामर्थ्य यामुळं वालचंद यांच्या कंपनीने अल्पावधीतच गोऱ्या सरकारचा विश्वास कमावला. यामुळं झालं असं की, बांधकामाचे मोठमोठे प्रकल्प वालचंद यांच्या कंपनीला मिळू लागले. ‘बार्शी लाईट’ हा सात किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग बांधण्याचं काम त्यांनी अतिशय कुशलतेने आणि वेळेत पूर्ण करून दिले. या त्यांच्या कामाकडे पाहून त्यांना बोरीबंदर ते चिंचपोकळी व पुढे करी रोड ते ठाणे आणि मग ठाणे ते कल्याण या रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाचेही काम मिळाले. ते सुद्धा त्यांनी चोख व वेळेत पूर्ण केले. या त्यांच्या उत्तम आणि वेळेत काम करण्याच्या लौकिकामुळे त्यांना रेल्वेची, सार्वजनिक बांधकाम खात्याची, धरणांची, पुलांची तसेच मुंबई महानगरपालिका इमारत बांधणीची व इतर कामेही मिळाली. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात त्यांचा पूर्ण जम बसला.

काही कालवधीनंतर पाठक यांनी कंपनीतून आपली भागीदारी काढून घेतली. मात्र व्यवसायाची वाढती मागणी आणि आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी १९२० मध्ये वालचंद यांनी आपली ही कंपनी टाटा समूहामध्ये विलीन केली.

वालचंद यांच्या कंपनीने टाटा समूहासोबत अनेक मोठे प्रकल्प पूर्ण केले. जसे की मुंबई पुण्याला जोडणारा बोर घाटातील रेल्वे बोगदा, तानसापासून मुंबईला पाणी मिळण्यासाठी टाकलेल्या गेलेल्या मोठ्या पाईपलाईन, याशिवाय सिंधू नदीवरील कलबाग पुल, सध्याच्या म्यानमारमधील इरावती नदीवरील पूल हे सुद्धा वालचंद त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण झाले. १९३५ मध्ये टाटांनी आपला समभाग विकला, यानंतर या कंपनीचं नाव हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं गेलं. वालचंद यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी चांगलीच नावारूपाला आली.

वालचंद यांनी 1908 मध्ये ‘वालचंदनगर इंडस्ट्रीजची’ स्थापना केली. जिथे साखर, साखर कारखाना मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू, सिमेंट प्लांट, पेपर, बॉयलर, टर्बाइन अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

SS Loyalty, 5 April 1919

१९३०-४०च्या दशकात वाहननिर्मिती उद्योग आपला जम बसवत होता. वाहन क्षेत्रातली संधी ओळखत वालचंद यांनी क्रायस्लर कंपनीशी करार केला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये देखील ते उतरले. १९४५ मध्ये त्यांनी मुंबईजवळ ‘प्रिमिअर ऑटोमोबाईल्स’ ही कंपनी स्थापन केली. मोटारीचे सुटे भाग बनवण्यापासून सुरू झालेल्या या कंपनीने पुढे फियाट या परदेशी कंपनीच्या सहकार्याने देशामध्ये पुढे बरीच वर्षे मोटारींचा पुरवठा केला. आज अजूनही त्यातील काही मोटारी भारताच्या रस्त्यांवर धावत आहेत.

Premier Padmini

आपल्या सर्वांचं लहानपण ज्या रावळगाव चॉकलेटने गोड केलं, ते चॉकलेटसुद्धा वालचंद यांचीच देण. १९३३ मध्ये त्यांनी रावळगाव येथे शुगर फॉर्म चालू केलं, तिथंच हे चॉकलेट बनवलं जात होत. सातारा इथलं कूपर इंजिनिअरिंग, कळंब साखर कारखाना यांसारखे अनेक उद्योग वालचंद हिराचंद दोषी यांच्या उद्योगसमूहाने यशस्वी केले.

ब्रिटिशांचा साम्राज्याखाली असणाऱ्या भारताची आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता होण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने मदत केली. उद्योगासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कामं देखील केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा वालचंद उद्योगसमूह हा देशातील पहिल्या दहा मोठ्या उद्योगांपैकी एक होता. १९४९ मध्ये, त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि १९५० मध्ये व्यवसायातून निवृत्त झाले. ८ एप्रिल १९५३ मध्ये उद्योग क्षेत्रातील या अवलियाने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू लालचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.

शेठजी अतिशय गुणग्राहक होते, कट्टर राष्ट्रनिष्ठ होते. सचोटी, दर्जा, प्रामाणिकपणा यांमध्ये तडजोड कधीही न केल्याने त्यांना नेहमीच लोकांचा पाठिंबा मिळाला. आपल्या गतिमान व सर्जनशील बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी भारतात एका नव्या औद्योगिक युगाचा प्रारंभ केला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.

वालचंद शेठजींचं कार्य आणि त्यांचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील सिंहाचा वाटा नेहमीच आपल्या स्मरणात राहील. खऱ्या अर्थाने वालचंद हिराचंद दोशी यांनी मेक इन इंडिया मॉडेल साकारले असे म्हणायला हरकत नाही.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button