तुम्ही भंगार म्हणून जे फेकून देता, त्यातून ‘तो’ महिन्याला लाखो रुपये कमावतो – प्रमोद सुसरे
आज माणूस शिक्षणाने खूप मोठा झाला. वाढणार्या ज्ञानाने माणसाला वस्तू वापरून झाली की, टाकून द्यायची हेही शिकवलं. पण या टाकून दिलेल्या वस्तूपासून पुन्हा आपण काहीतरी चांगलं उपयोगी बनवू शकतो हे पाहायला त्याला वेळ कुठे आहे? त्याने झालं काय? भंगार वाढलं आणि समस्या निर्माण झाली या भंगाराचं काय करायचं? पण म्हणतात ना प्रत्येक समस्येला त्याचा उपाय असतोच, तसा त्या टाकाऊ भंगाराच्या समस्येवर उपाय काढला तो अहमदनगरमधील पढेगावच्या प्रमोद सुसरे या 29 वर्षीय तरुणाने.
वडील वीटभट्टीवर कामाला. घरी एकरभर शेती आणि त्यावर चालणारे कुटुंब. प्रमोद दहावीपर्यंत शिकला, अभ्यासात जेमतेमच हुशार होता. समोर ध्येय काही नव्हते, पण दहावीला चांगले मार्क मिळाले आणि सायन्सला प्रवेश मिळाला. बारावीला मार्क कमी मिळाले, पण नशिबाने सीईटीच्या मार्कांच्या जोरावर प्रमोदने इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. पण त्यासाठी फी भरायला पैसे नव्हते. प्रमोदला डिप्लोमाला टाकले गेले.
कुटुंबाला मदत होईल म्हणून तो शिकता शिकता पार्ट टाईम जॉब करू लागला. महिना 8000 रुपये पगार त्याला मिळत होता. त्यात फी आणि इतर खर्च भागवून तो घरी देखील पैसे पाठवत होता. तिथे त्याच्या क्रिएटिव्ह आयडियाचा फायदा त्याच्या मॅनेजरला होत होता आणि प्रमोदला मिळत होता, तो तुटपुंजा पगार. मनात खूप वेळा विचार आला, की नोकरी सोडून व्यवसाय चालू करावा, पण घर प्रमोदच्या पगारावर चालायचं. यामुळे तो हे धाडस करू शकत नव्हता. माणूस कशाचेही सोंग आणू शकतो, पण पैशाचे सोंग कधीही आणता येत नाही. शेवटी त्याने निर्णय घेतला, नोकरी करत करत व्यवसाय करायचा.
एके दिवशी कंपनीकडून त्याला चीनला जायची संधी मिळाली. चीनमध्ये त्याने पहिले की, तिथे लोक ड्रम आणि टायर वापरून अतिशय सुंदर फर्निचर देखील फर्निचर बनवत आहेत. त्याने विचार केला, ते बनवू शकतात, तर आपण का नाही? तो ज्या कारखान्यात काम करायचा तिथे अनेकदा ड्रम वगैरे तिथल्या रद्दीत जाताना बघायचा. किलोने घेतल्यास स्वस्तात मिळत असल्याने टायरपासून खुर्ची, टेबल तयार करायचं ठरलं.
मग काय, प्रमोदने स्वस्त किंमतीत काही टायर आणि ड्रम विकत घेतले आणि ड्रिल मशीनसह उर्वरित वस्तू सेकंड हँडच्या दुकानातून मिळवून काम सुरू केले. ऑफिसमधून आल्यावर दररोज चार ते पाच तास फर्निचर बनवू लागला.
१८ ऑक्टोबर २०१८ रोजी त्याने एक दुकान भाड्याने घेतलं आणि तेथे तो काम करू लागला. दिवसभर नोकरी आणि रात्रभर व्यवसाय असा त्याचा दिनक्रम चालू होता. पहिल्या ३ महिन्यांत फक्त २ ऑर्डर मिळाल्या. त्यानंतर त्याला पुण्यातल्या एका कॅफेमध्ये म्युझिकल थिमवर फर्निचर करायची ऑर्डर मिळाली. नोकरी करत-करत इतक्या कौशल्यानं त्याने ती ऑर्डर पूर्ण केली कि, त्या फर्निचरची चर्चा सर्वत्र होऊ लागली. यानंतर त्याच्या ऑर्डर हळूहळू वाढत गेल्या. मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळू लागला. टायरसोबतच गाड्यांचे भंगारातील पार्ट तो फर्निचर बनवण्यासाठी वापरू लागला. टाकाऊपासून टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वस्तू बनवू लागला. मुंबईतील एक मोठी ऑर्डर पूर्ण केल्यावर आपण एका ऑर्डरमधून आपल्याला जॉबमधून वर्षभरात मिळणाऱ्या पैशाइतके पैसे कमावतो हे त्याच्या डोक्यात बसले आणि त्याने ऑक्टोबर 2019 मध्ये जॉब सोडला आणि पूर्ण वेळ व्यवसायासाठी दिला. दोन मुलं कामावर ठेवली.
कोरोना काळात जेव्हा ऑर्डर मिळत नव्हते, तेव्हा त्याने सॅनिटायझर डिस्पेंसर मशीन, कोविड हॉस्पिटलसाठी बेड बनवण्याचे काम केले. 200-300 हॉस्पिटल बेड त्याने बनवले आणि विकलेसुद्धा.
आज प्रमोद ड्रम, टायर, जुन्या गाड्यांचं भंगार यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार, गार्डन यांच्यासाठी फर्निचर तयार करतो. त्याच्याकडे १४ कामगार कामाला आहेत. नोकरी सोडली तर, घर कसं चालणार या विवंचनेपासून सुरू झालेला प्रमोदचा प्रवास आज महिन्याला दहा ते पंधरा ऑर्डरपर्यंत गेला आहे.
एक ऑर्डर ५० हजार ते एक लाखपर्यंत उत्पन्न देते. आतापर्यंत त्याने २० हुन अधिक हॉटेल्स आणि कॅफेसाठी फर्निचर बनवले आहे. पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सांगली इतकंच नव्हे, तर चेन्नई, हैदराबाद, गुजरात, दिल्ली इथपर्यंत प्रमोदच्या ऑर्डर पोचल्या आहेत. मार्च २०२१ मध्ये त्याने पहिली इंटरनॅशनल ऑर्डर मिळवली, साऊथ आफ्रिकेहून. तीही तितक्याच सचोटीने पूर्ण केली. आज तो अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील आपला व्यवसाय पसरवण्याची स्वप्न बघत आहे. त्यासाठी प्रयत्न करत आहे.
पुढच्या वर्षी टर्नओव्हर दोन कोटी होईल हे विश्वासाने सांगणारा प्रमोद आपल्याला हेच शिकवतो की, तुमच्याकडे जर कल्पना असेल आणि ती कल्पना सत्यात उतरवण्याचे कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची क्षमता असेल, तर यश मिळणारच.