सायकलच्या दुकानात काम करता करता Panasonic सारखी कंपनी उभी केली
तुमचा जर तुमच्या नशिबावर विश्वास असेल, तर तेच घडेल जे तुमच्या नशिबात असेल; पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर नशीब तसं घडेल जसं तुम्हाला हवं असेल. आजचा लेख अशाच एका महारथीबद्दल आहे ज्याने आपल्या अतूट विश्वासाच्या जोरावर गरीब परिस्थितीतून अरबो रुपयांचे साम्राज्य उभे केले. मी बोलतेय जपानमधील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पॅनासॉनिकची स्थापना करणाऱ्या कोनोसुके मात्सुशिता यांच्याबद्दल…
128 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हें. 1894 मध्ये जपानच्या Wakayama प्रांतातील वासा गावात एका सधन शेतकऱ्याच्या पोटी कोनोसुकेचा जन्म झाला. मात्र कोनोसुकेचा जन्म झाला आणि घरची परिस्थितीच पालटली. आर्थिक अडचणींमुळे कोनोसुकेच्या वडिलांकडे जी काही धनदौलत होती ती विकावी लागली. ज्या घराला ऐशो-आरामाची सवय होती त्या घरातील सगळेचजण पोटाची खळगी भागवण्यासाठी काम करू लागले. लहानगा कोनोसुके देखील शाळा सोडून वयाच्या 9 व्या वर्षापासूनच काम करू लागला. ज्या वयात इतर मुले खेळायची, अभ्यास करायची, आपल्या आई-वडिलांकडे खाऊचा हट्ट करायची, त्या वयात हा लहानगा कोनोसुके एका दुकानात काम करून घरच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावू लागला.
सकाळी लवकर उठून दुकानाच्या साफसफाई करून मालकाच्या मुलांना देखील तो सांभाळायचा. इतकं करूनही तो तापट दुकानदार त्याच्याकडून जनावरासारखं काम करून घ्यायचा. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला ते काम करणं भाग होतं. पण काही दिवसांनी त्या दुकानावर कर्ज झालं आणि त्या मालकाने दुकान बंद केलं. कोनोसुकेचं काम गेलं. जे काही थोडेफार पैसे यायचे तेही आता बंद झाले. काही दिवसांनी त्याला एका सायकल कंपनीत काम मिळालं. त्याकाळात सायकल म्हणजे एक लक्झरी वाहन मानलं जायचं. त्या सायकल इंग्लंडमधून इम्पोर्ट व्हायच्या. कंपनीत सायकल विकण्यासोबत काही मेटल वर्कचं कामही होतं. कोनोसुके तिथे पाच वर्ष काम करून जितक्या टेक्निकल गोष्टी शिकता येतील तितक्या तो शिकला.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्याला osaka electric light company ची जाहिरात दिसली. तिथे काही कर्मचाऱ्यांची गरज होती. कोनोसुकेने नोकरीसाठी अर्ज केला. आपल्याला नोकरी मिळेल की नाही या विचारात असतानाच त्याला joining letter आलं, तो आनंदाने भारावून गेला. दुसऱ्याच दिवशी तो कंपनीत दाखल झाला.
osaka electric light companyत विजेसंबंधित गोष्टींचं शिक्षण त्याला मिळत होतं. तो केवळ काम करुन शांत बसत नव्हता. फावल्या वेळेत electricity ची पुस्तकं देखील वाचू लागला. जितक्या गोष्टी शिकता येत होत्या, त्या सगळ्या तो शिकला. कंपनीत अनेक नवीन नवीन experiment त्याने केले. आपल्या कर्तबगारीच्या जोरावर एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालेला कोनोसुके काही वर्षातच टेक्नीकल इंस्पेक्टर पदापर्यंत पोहोचला. त्याच काळात कोनोसुकेने एक improved electric socket बनवलं.ते बॉसला दाखवलं, मात्र ते काही त्याच्या बॉसला पसंद पडलं नाही. हे socket मार्केटमध्ये चालणार नाही असं म्हणून बॉसने ते socket रिजेक्ट केलं. मात्र कोनोसुकेला त्या socket वर पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाच्या जोरावर त्याने osaka कंपनीतील नोकरी सोडली, आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. मात्र 22 वर्षीय कोनोसुकेचा तो निर्णय कोणालाच मान्य नव्हता. नोकरी करून जितके पैसे हातात येतात, तितके तरी स्वतःच्या व्यवसायातून येणार आहेत का? त्यात तुझं पुरेसं शिक्षणही झालेलं नाही, व्यवसायाचा अनुभवही नाही असे म्हणून सगळ्यांनीच त्याला व्यवसाय न करण्याचा सल्ला दिला.
कंपनीच्या अपयशामुळे त्या 2 कर्मचाऱ्यांनी देखील तिथली नोकरी सोडली. आता कोनोसुके, त्याची पत्नी आणि मेहुणा असे तिघं मिळून नवनवीन experiment करू लागले. मात्र यात त्याचे खूप पैसे खर्च झाले. इकडे डोक्यावर कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढतच होता, तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणाहून आलेल्या रिजेजेक्शनमुळे तो हतबल झाला होता. पण त्याने हार मानली नाही आणि एक दिवस अचानक त्याला 1000 light socketची पहिली ऑर्डर मिळाली आणि हाच ठरला कोनोसुकेच्या कंपनीचा turning पॉइंट. त्या ऑर्डरनंतर कोनोसुकेचा व्यवसाय वाढत गेला. त्यानंतर त्याने attachment plug आणि two way socket चे invention केलं. यामुळे तर ही कंपनी खूपच फेमस झाली. त्याने कंपनीचं नाव मात्सूशिता इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग वर्क्स ठेवलं. तर कंपनीचे प्रोडक्टस ‘नॅशनल’ या ब्रँड नेमखाली विकले जाऊ लागले. पुढे यात पॅनासॉनिक, कासार, टेक्निक्स ही नावं सुद्धा ऍड झाली.
कोनोसुकेला नवीन शोध लावून लोकांचे प्रॉब्लेम दूर करण्यात खूप मजा यायची. एकदा त्याच्या लक्षात आले की, सायकलला समोर लावले जाणारे बल्ब 3 तासापेक्षा जास्त काळ चालत नाहीत, कारण त्यात मेणबत्ती किंवा तेल वापरलं जायचं. आणि लोकांचा हाच प्रॉब्लेम दूर करण्यासाठी त्याने ठरवलं की जास्त वेळ चालणारा बल्ब बनवायचा. बराच अभ्यास करून त्याने बल्ब बनवायला सुरुवात केली. बऱ्याच अडचणींनंतर अखेर नवीन बल्ब तयार झाला, जो तब्बल 40 तासांपेक्षा देखील जास्त वेळ चालू लागला. कोनोसुकेच्या प्रयत्नांना यश आले, मात्र आता पुढचं आव्हान होतं हे बल्ब मार्केटमध्ये विकण्याचं. कोनोसुकेने ते बल्ब अगदी कमी दरात बाजारात विकायला सुरुवात केली. किंमत खूपच कमी आहे म्हणून बहुदा हे प्रॉडक्ट दर्जेदार नाही या विचाराने बऱ्याच दुकानदारांनी त्याचा बल्ब घेण्यास नकार दिला. आता काय करणार? शेवटी त्याने तो बल्ब लोकांना फुकट वाटायला सुरुवात केली. वापर केल्यानंतर लोकांना तो बल्ब खूप आवडला. मात्सूशिता कंपनी पुन्हा प्रकाशझोतात आली. त्या बल्बला नंतर इतकी मागणी वाढली, की नंतर तो बल्ब दुप्पट किंमतीला विकला जाऊ लागला.
1929 पर्यंत मात्सुशिता विविध उत्पादने घेऊ लागली होती. कंपनीत 300 कामगार काम करु लागले होते. कंपनीत आता light socket शिवाय कॅमेरा, phone, फॅक्स, इलेक्ट्रिक white board, टीव्ही, टेप रेकॉर्डर अशा अनेक प्रगत इलेक्ट्रिक वस्तू बनवल्या जात होत्या. कंपनीचा कारभार सुरळीत सांभाळता यावा म्हणून कंपनीचे चार विभाग केले. आता कोनोसुके केवळ एक सर्वसामान्य व्यक्ती राहिला नव्हता, तर ते जपानमधील सर्वात यशस्वी उद्योजक बनले होते.
1933 पर्यंत कंपनीत 200 पेक्षाही अधिक उत्पादने तयार होऊ लागली. नाविन्यपूर्ण उत्पादनं, कंपनीतील वाढते कर्मचारी, बाजारातील मागणी यामुळे सगळं काही सुरळीत चालू होतं आणि अशातच १९३९साली दुसरं महायुद्ध सुरु झालं. बाजारात मंदी आली आणि त्यामुळे कंपनीची उत्पादनं घेण्यास कोणी तयार होईना. कंपनीचं आर्थिक गणित कोलमडलं. कोनोसुके यांनी लगेच युद्धासाठी लागणारी सामग्री बनविण्याचा निर्णय घेतला. 56 लाकडी जहाजं आणि तीन लाकडी विमाने कोनासुकेंच्या मार्गदर्शनातून बनवण्यात आली. युद्धाच्या कठीण काळातही कंपनीच्या उत्पादनाची गुणवत्ता ढासळली नाही. मात्र या काळात कंपनीचा प्रचंड तोटा झाला. एकेकाळी २६००० कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत १९४५ मध्ये केवळ १५००० कर्मचारीच शिल्लक राहिले. युद्धानंतर हळूहळू जपानसह कंपनीची देखील आर्थिक घडी स्थिरावू लागली.
याच काळात पॅनासॉनिकच्या ट्रान्झिस्टर रेडिओने जगभरात कमाल केली. श्रीमंतापासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांच्या घरातून पॅनासॉनिकच्या रेडिओवरची गाणी वाजू लागली. हा रेडिओ जगप्रसिद्ध झाला. कंपनी जगाच्या उद्योगपटलावर स्थिरस्थावर झाली होती. १९५० ते १९७३च्या काळात जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक उत्पादनं बनवणारी कंपनी बनली. जानेवारी १९६१ मध्ये कोनोसुके मात्सुशिता यांनी पॅनासॉनिकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि अध्यक्षपद जावई मासाहारू मात्सुशिता यांच्या हाती सोपवून सल्लागार म्हणून ते कामकाज पाहू लागले. मासाहारू यांनी देखील अगदी मनापासून पॅनासॉनिकला मोठं करण्यासाठी प्रयत्न केले. २००८ साली कंपनीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवण्यासाठी मात्सूशिताचे नाव बदलून “पॅनासॉनिक कॉर्पोरेशन” करण्यात आले. सध्या कंपनीत २ लाख ८० हजारांपेक्षा देखील अधिक कर्मचारी काम करतात, तर कंपनीची उलाढाल ९ ट्रिलियन येन पेक्षाही जास्त आहे.
मात्सुशीतांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर ४४ पुस्तकं लिहिली. भविष्यातील राजकारणी आणि उद्योजक घडवण्यासाठी त्यांनी १९७९ साली मात्सुशिता स्कुलची सुद्धा स्थापना केली. त्यांच्या उदात्त कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून जपानच्या सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात order of the sacred treasure, Order of the Rising Sun, medal with blue ribbon अशा अनेक पुरस्कारांसोबत बेल्जियम, मलेशिया आणि चीनच्या पुरस्कारांचा देखील समावेश आहे.
GOD OF MANAGEMENT म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोनोसुके मत्सुशिता यांनी वयाच्या 94 व्या वर्षी २७ एप्रिल 1989 रोजी जगाला अलविदा केले आणि जगाच्या रंगमंच्यावरील एक प्रकाशमान पात्र इतरांना प्रकाशित करून कायमचे अलिप्त झाले.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?