जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
अश्मयुगात मानवाने चाकाचा शोध लावला. जसजसा मानवाचा विकास होत गेला तसतसा तो नवीन गोष्टींचा अविष्कार करत गेला. कबुतरापासून ते निरोपाचा खलिता घेऊन निघालेल्या दूतापर्यंत संपर्क-संवादाची अनेक रूपे आपण पाहिली. आता आपला एखादा छोटासा msg सुद्धा काही क्षणात दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा घोड्यावरून पत्र पोहोचवली जायची. मग हळूहळू घोडागाडी आली, बैलगाडी आली. त्यातून लोकांनी प्रवास करायला सुरुवात केली. प्रवास चालू होता पण सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नव्हती.
आपला प्रवास अजून सोपा आणि सुखकर कसा करता येईल याचे अनेक पर्याय मानव शोधत राहिला. वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या कारकिर्दीत प्रवास सुखकर करण्याचे अनेक अविष्कार करून दाखविले. यातल्याच एका आविष्काराची सुरुवात केली ती १८४४ मध्ये जन्मलेल्या जर्मन इंजिनिअर, कार्ल बेंझ यांनी. चला तर मग जाणून घेऊया कार विश्वात ज्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं, अशा जगप्रसिद्ध कार्ल बेंझ यांच्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल!
“बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म” हे वाक्य कार्ल बेंझ यांच्याविषयी गमतीशीरपणे वापरलं जातं. कार्ल बेंझ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८४४ मध्ये जर्मनीतील कार्लसुरहे या शहरात एका लोहार कुटुंबात झाला. वडील Johann George Benz लोहारकाम करायचे, आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि अश्यातच काही वर्षांत न्यूमोनियामुळे वडिलांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. काबाडकष्ट करून आईने त्यांना शिकवले. आपल्या मुलाला शिक्षणात काहीच कमी पडता कामा नये, इतकंच तिला वाटायचं. लहानपणापासून कार्ल यांना नवीन गोष्टींचं प्रचंड कुतूहल. त्यात काहीतरी नवीन गोष्टींचा शोध घेणे, संशोधन करणे हे आवडीचे काम. शालेय शिक्षणानंतर त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी 1864 ला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी कार्लजरुह या यूनिवर्सिटीतून प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका स्केल फॅक्टरीत draftsman आणि designer म्हणून काम केले. सुरुवातीपासूनच आपल्याला ज्या गोष्टी येत नाहीत त्याच करण्यात त्यांना जास्त रस होता. 1868 ला त्यांनी स्केल फॅक्टरीतलं काम सोडलं आणि ते फॉरझाईमला गेले. तेथे एका ब्रिज बिल्डिंग कंपनीसाठी काही काळ काम केलं. काही वर्षांनी त्यालाही रामराम ठोकून ते vienna च्या लोखंडी बांधकाम कंपनीत काम करू लागले. जवळ जवळ ७-८ वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करून त्यांनी आपल्या अभ्यासात आणि अनुभवात भर टाकली. मात्र तरीही त्यांचे दुसरीकडे काम करण्यात मन काही लागेना.
१८७१ मध्ये त्यांनी ऑगस्ट रीटर यांची मेकॅनिकल कंपनी जॉइन केली. मात्र ती कंपनी पहिल्याच वर्षात डबघाईला आली. अशावेळी बेंझ यांनी त्यांची प्रेयसी बर्था रिंगरच्या मदतीने कंपनीला या अडचणीतून बाहेर काढले. बर्थाने लग्नात मिळालेल्या हुंड्यातून कंपनीचे शेअर्स विकत घेतले. २० जुलै १८७२ रोजी कार्ल बेंझने बर्था रिंगरशी लग्न केलं आणि बर्था रिंगरची बर्था बेंझ झाली.
या कंपनीमध्ये त्यांनी नवीन इंजिनाच्या उत्पादनासाठी काम सुरू केले. अधिक दर मिळविण्यासाठी त्यांनी 1878 मध्ये नवीन पेटंटवर काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी टू स्ट्रोक पेट्रोल इंजिन बनविण्यावर फोकस केला, खूप अभ्यासानंतर, परिश्रमानंतर त्यांनी ते इंजिन बनवलं, हे इंजिन बनवताना त्यांना अनेकदा अपयश आलं, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ते इंजिन बनवून पूर्ण केलं आणि त्यांना त्याचं पेटंट मिळाले ते २८ जून १८८० मध्ये.
टू स्ट्रोक इंजिनच्या यशानंतर स्पार्क प्लग, क्लच गियर, वॉटर रेडियटर speed regulation system, spark ignition चा शोध लावून त्यांनी त्याचे पेटंट मिळविले. मात्र समाजात एखादा जर चांगलं काम करत असेल, तर त्याचे पाय ओढणारे अनेक लोक असतात. प्रॉडक्टवरील High product cost मुळे मॅनहाइममधील बँकांनी कार्ल यांना joint stock company बनविण्यास भाग पाडले. या घटनेमुळे कार्ल नाखुश होते कारण इतकं जीव ओतून काम करूनही त्याच्याकडे फक्त पाच टक्के शेअर्स आणि संचालक म्हणून माफक पद शिल्लक होते. आणि सर्वात वाईट म्हणजे, नवीन उत्पादने तयार करताना त्याच्या कल्पनांचा विचार केला जात नव्हता, म्हणूनच कार्ल यांनी एका वर्षानंतर, 1883 मध्ये त्या कॉर्पोरेशनमधून माघार घेतली.
कार्ल यांची लहानपणापासूनची आणखी एक आवड म्हणजे सायकल repairing. ते मॅनहाइममधील मॅक्स रोझ आणि फ्रेडरिक एस्लिंगर यांच्या मालकीच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात काम करू लागले. तिघांनी industrial machines चे उत्पादन करणारी एक नवीन कंपनी स्थापन केली जिचं नाव होतं Benz & Cie.
कंपनीचे यश पाहता कार्ल आणखी जोमाने काम करू लागले. त्यावेळी सगळीकडेच carriages म्हणजेच बग्गीचा वापर केला जायचा पण कार्ल यांच्या तल्लख मेंदूत घोडाविरहित गाडी बनविण्याची कल्पना आली. सायकल रिपेअरिंगच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ऑटोमोबाइल तयार करण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी फोर स्ट्रोक इंजिन, advanced coil ignition अशा अनेक गोष्टी वापरल्या आणि 1885 साली पहिल्या ऑटोमोबाईलची निर्मिती केली ज्याचं नाव होतं “बेंझ पेटंट-मोटरवॅगन”. २९ जानेवारी १८८६ रोजी जर्मनीमध्ये जगातील पहिल्या गाडीचा जन्म झाला. मात्र प्रदर्शनादरम्यान “बेंझ पेटंट-मोटरवॅगन” ची भिंतीशी टक्कर झाली आणि त्याचे हे मॉडेल अयशस्वी ठरले. या मॉडेलमध्ये काही त्रुटी आढळल्या म्हणून कार्लने मोटरवॅगन मॉडेल २ तयार केले, त्यात पहिल्या मॉडेलपेक्षा अनेक चांगले बदल केले. १८८९ मध्ये, त्याने मॉडेल क्रमांक ३ सादर केले, ज्याचे प्रदर्शन पॅरिसमध्ये भरवण्यात आले.
जरी हे मॉडेल चांगले असले तरीही गाडीतून येणाऱ्या आवाजामुळे सरकारी अधिकारी बेंझ यांच्या गाडीकडे शंकेने पाहू लागले. इतका मोठा शोध लावूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढलीच नाही. गाडी सुरक्षित असू शकेल का? इतक्या लांब पल्ल्याचा रस्ता गाडी पार करू शकेल का? अशी भीती त्यांच्या मनात होती. गाडी तयार तर केली, मात्र ती अजून उजेडात आली नव्हती.
आपल्याकडे एक म्हण आह, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक ‘स्त्री’ असतेच”, या प्रयोगातदेखील बर्था बेंझ यांनी स्वतःकडचा सगळा पैसा खर्च केला केला होता. गाडीचं पेटंट मिळूनही कार्ल यांनी गाडी बाहेर काढली नव्हती म्हणून बर्था यांची खुप चिडचिड व्हायची. कार्ल यांच्या प्रवासात बर्था बेंज यांचा सहभाग खूप महत्वाचा होता, बर्था यांनी मनाशी पक्के केले की, आता ही गाडी आपणच बाहेर काढायची.
जेव्हा कार्ल बेंझ घरी नव्हते तेव्हा बर्था यांनी एक बेत आखला की, आपल्या मुलांसह गाडीतून प्रवास करायचा आणि ती आपल्या माहेरी निघाली. मॅनहाईम जिथे हे दाम्पत्य राहायचं तिथून फॉरझाईम म्हणजेच बर्था यांचं माहेर जवळपास ९७ किलोमीटर दूर होतं. आत्ता जरी आपल्याला हे अंतर जवळच वाटत असलं, तरी त्याकाळच्या ओबडधोबड रस्त्यावरुन एवढा प्रवास करणे सुद्धा कमी जिकरीचे काम नव्हते. मात्र त्यानी आपला प्रवास चालू ठेवला. बिना घोड्यांची ही गाडी बघून रस्त्यावरचे लोक घाबरू लागले. या आधी कधीच न पाहिलेलं काहीतरी ते पाहत होते. कोणी “चेटकीण आली, चेटकीण” म्हणून हिणवत होतं तर कोणी त्यांच्या अंगावर, त्यांच्या गाडीवर थुंकत होतं. इतकंच नाही तर काही अंतर कापल्यावर गाडीतील इंधन संपलं त्यावेळी मात्र पंचाईत निर्माण झाली. एका गावात जाऊन त्यांनी पेट्रोकेमिकल घेतलं ते वापरून त्यांनी आपला प्रवास सुरु केला, पण पुन्हा काही अंतर गेल्यावर त्या गाडीचा ब्रेक पूर्ण झिजून गेला. त्यावेळी जुगाड करून बर्था यांनी पहिले ब्रेक लायनर तयार केले; असं करत करत त्यांनी अखेर आपलं माहेर गाठलं. काही वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा आपल्या घरी परतल्या. तेव्हा कार्ल यांना बायकोने केलेल्या या धाडसाची माहिती मिळाली आणि त्यांना आपण केलेल्या कामावर विश्वास बसला. बायकोच्या धाडसामुळे बेंझ यांची गाडी प्रकाशात आली. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे बायको गेली माहेरी आणि झाला गाडीचा जन्म या वाक्याचा जन्म हा असा झाला.
Benz & Cie आता 50 कर्मचाऱ्यांवरून थेट 430 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोहचली आणि अश्या पद्धतीने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत, बेंझ ही जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी बनली होती. Benz & cie च्या व्यापकतेमुळे 1899 मध्ये फ्रेडरिक फॉन फिशर आणि ज्युलियस गॅन हे कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य बनले आणि बेंज यांची कंपनी joint stock कंपनी बनली. नवीन संचालकांनी शिफारस केली की बेन्झने मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी योग्य असलेली कमी खर्चाची ऑटोमोबाईल तयार करावी. 1894 ते 1902 पर्यंत, बेंझने 1,200 पेक्षा जास्त गाड्यांचे उत्पादन केले, ज्यात वेलोसिपेडचा देखील समावेश होता. नंतरच्या काळात कार्ल बेंझ यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक नवनवीन शोध,संशोधनाचे कार्य ते अविरत करत होते. बेंझने इतिहासातील Internal combustion इंजिनसह पहिला ट्रक डिझाइन केला. इतकंच नाही, तर नेटफेनर बस कंपनीसाठी त्यांनी जगातील पहिली मोटार बसही तयार केली. या अभूतपूर्व कामाची पोचपावती म्हणजे 25 नोव्हेंबर 1914 रोजी त्यांच्या जन्मगावी कार्लजरुह येथे त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान, कार्ल बेंझ यांना कार्लजरुह विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली.
1923 मध्ये जर्मनीवर आर्थिक संकट ओढवलं. अनेक business डबघाईला आले. इतरांवर आलेली वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून 28 जून 1926 रोजी Benz & Cie. त्यावेळेस जर्मनीच्या automobile क्षेत्रात नाव कमावलेल्या डेमलर मोटरेन गेसेलशाफ्ट या कंपनीत merge झाली. पुढे या कंपनीने आपले product ‘मर्सिडीज-बेंझ’ या नावाने बाजारात आणले आणि पुढे ते किती प्रसिद्ध झाले हे वेगळं सांगायलाच नको.
Automobile क्षेत्रातल्या या सम्राटाचा प्रवास ४ एप्रिल १९२९ रोजी वयाच्या ७० व्या वर्षी थांबला, पण आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना आजही the father of the car किंवा “father of the automobile industry” म्हणून ओळखले जाते.
तर ही होती कार्ल बेंझ यांची जीवन कहाणी. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसल्यास लगेच सबस्क्राईबसुद्धा करा.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?