निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस, अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजकता विस्डम या मालिके अंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे. तर आजच्या गोष्टीचा विषय आहे निर्णयक्षमता नसल्यास खूप मोठे नुकसान होते… करायची सुरवात?
सुनील या ग्रामीण भागातील एक तरुण. शाळेत हुशार होता, ७५ ते ८०% गुण मिळवायचा, १२ वी नंतर बीसीए केले. नोकरी करावी का व्यवसाय, का स्पर्धा परीक्षा द्यावी यात गोंधळलेला होता. दरम्यान बीसीए झाल्यानंतर १-२ वर्ष स्पर्धा परीक्षा देऊन पाहिल्या, परत नोकरीसाठी पुण्याला जाऊन आला. नंतर म्हणाला आता काहीतरी उद्योग व्यवसाय करू. कोणता करावा हे शोधण्यात २-३ वर्षे अजून घालवली. कशात काय ठरत नाही.
घरची स्थिती मध्यमवर्गीय. वडील छोटेसे किराणा दुकान चालवतात. थोडी शेती, त्यात वय वाढत चाललेले, घरच्यांना काळजी वाटू लागली व नातेवाईकांमधीलच एका दहावी नापास झालेल्या मुलीशी फारसा विचार न करता त्याचे लग्न लावून दिले व किराणा दुकान इथून पुढे तूच चालव म्हणून वडिलांनी सांगितले.
अशाचप्रकारे निर्णयक्षमता नसल्यामुळे सुनीलसारख्या लाखो हुशार मुलांचं आयुष्य बरबाद होतं. तुम्हाला आयुष्यात काय करायचंय याचा निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ व हे जग तुमचा निर्णय घेईल. वेळ व जग ठरवेल तेच आयुष्यभर करण्याची वेळ तुमच्यावर येईल. सुमार बुध्दीचा, पण निर्णयक्षमता असणारा माणूस आयुष्यात धाडसाने पुढे जातो; पण निर्णयक्षमता नसणारा अत्यंत हुशार माणूससुध्दा आयुष्यात खूप मागे पडतो. शेवटी मिळेल ते काम, नोकरी करून जीवन जगायला लागतं. आपलेच शाळेचे मार्कलिस्ट स्वतःच बघत बसतो. तो आपल्या मुलांनाही सांगत नाही, की मला इतके मार्क पडायचे, कारण मुलं म्हणतील की तुम्ही एवढे हुशार होता, तर मग अजून इथेच कसे. हल्लीची मुलं इंटरनेटमुळे इतकी हुशार झालीत, की पहिल्यासारखं लेमन गोळ्या, चॉकलेट देऊन लहान मुलांना भूलथापा द्यायचे दिवस गेले. शेवटी अशा निर्णयक्षमता नसणार्या पण हुशार माणसाचे आयुष्य असेच छोटेमोठे काम, रोजगार, नोकरी करण्यात निघून जाते.
आपण शाळेत इतके हुशार होतो, पण आयुष्यात खूप मागे राहिलो याची खंत त्याच्या मनाला आयुष्यभर लागत असते. त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याला खूप मोठे महत्व आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही व वेळेनुसार अनेक संधी निघून जातात व शेवटी हताश होण्याशिवाय पर्याय नसतो. लोकांना भेटा, वाचा, निर्णय घेण्यास वेग द्या व आपल्याला सुनील होण्यापासून वाचवा.
तुमच्या आयुष्यात अशी काही घटना घडली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल ला आताच सब्स्क्राइब करा