आर्थिक निरक्षरता खूप महागात पडते…
आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. हे सर्व होते, योग्य आर्थिक नियोजन नसल्यामुळे.
आपण बऱ्याचदा पाहतो, म्हसोबाला बोकड कापतो, पाच हजार खर्च, ताईबाईला सवासण्या घालतो, दोन हजार खर्च, सत्यनारायण पुजा घालणे, चार हजार खर्च. असे एका कुटुंबाचे वर्षाला ३० ते ४० हजार रुपये वायफळ खर्च होतात; पण पर्सनल फायनान्स, गुंतवणूक, उद्योग, करिअर प्लॅनिंग, आरोग्य इत्यादी विषयी पुस्तके खरेदी करण्यात एक हजार रुपये तरी आपण खर्च करतो का? जर आपण अर्थसाक्षर होणारच नाही, तर मग आपण श्रीमंत होणार कसे.
आजारपण, अपघात सांगून येत नाही हे आपणास माहीत आहे, मग आपण आरोग्य विमा काय असतो याचा अभ्यास केला आहे का? मुलीच्या लग्नासाठी खर्च येतो माहित आहे, मग तिच्या जन्मापासूनच आपण काही गुंतवणूक का करीत नाही? मुलाच्या शिक्षणाचा मोठा खर्च १२वी नंतर सुरू होतो, मग त्यासाठी आपण काय प्लॅनिंग करतो. आपला महिन्याला येणारा पगार, उत्पन्न सर्व जगण्यावरच खर्च होतो. बचत व गुंतवणूकीच्या नावाने बोंबाबोब चालू असते. महिन्याच्या पगारात घरखर्च चालत नाही, तर बचत काय व कशी करणार. त्यामुळे आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे, नाहीतर महाभयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल.
आत्महत्या, कर्जाचा बोजा सहन न होणे, खाजगी सावकाराला संपत्ती जाणे, जप्ती, पैशाअभावी उपचार न मिळाल्याने मरण, आर्थिक नियोजन नसल्याने उतारवयात वृध्दाश्रमाची वाट धरायला लागणे अशा अनेक घटना आपण समाजात नेहमी पाहतो. तसेच पैशांअभावी मुलांची करिअर थांबणे, मुलींचं लग्न न होता कुठल्यातरी मुलाबरोबर पळून जाणे अशा नामुष्कीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या, त्या आर्थिक नियोजन नसल्यामुळेच. आज प्रत्येक महिन्याला १ हजाराची बचत व गुंतवणूक भविष्यात खूप मोठ्या कामाला हातभार लावू शकते. देव, उपासतापास, नवस, राजकारण, साड्या, आहेर, रुसवेफुगवे, मोर्चे, आंदोलने, पक्ष ह्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने आर्थिक साक्षरतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आर्थिक निरक्षरता ही समाजाला किती महागात पडली आहे, गेल्या ५-६ दशकात समाज कसा गरीब होत चालला आहे हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे ‘पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा.’
तुम्हीही आर्थिक साक्षर व्हा आणि त्यासाठी काय करणार हे आम्हाला नक्की सांगा आणि विषय आवडल्यास लेख लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी नवी अर्थक्रांतीला फॉलो करा.