थेंबे थेंबे तळे साचे
सध्याचा काळ हा अगदीच बेभरवशाचा आहे. कोव्हिडनंतर आपण हे नक्कीच शिकलो आहोत की सध्याच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात कधी काहीही होऊ शकतं. जगभरात अनेक स्थित्यंतरे आणि दळणवळणाची साधनं बदलली आहेत. कम्युनिकेशनचा वेग वाढला आहे आणि जग खूप जवळ आले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर आपण जगभरातील माहिती मिळवू शकतो. अशी ही बदललेली जीवनपद्धत जगत असताना रोज थोडा थोडा भविष्याचा विचार करणे जास्त महत्वाचे झाले आहे.
एक काळ होता जेव्हा भविष्याची तरतूद म्हणून लोक संपत्तीचा संचय करायचे एखाद्या जुन्या पेटीमध्ये धन साठवून ठेवायचे. या सगळ्या धन साठवण्याच्या पद्धतीमध्ये मात्र भलतीच रिस्क असायची, हे धन कधी चोरीला जायचे तर कधी नैसर्गिक कारणामुळे गहाळ व्हायचे. लोकांना या गोष्टी लक्षात आल्यानंतर हळू हळू लोक धन हे वस्तू रूपात साठवू लागले त्यामध्ये जमीन किंवा सोने याचा समावेश असायचा. लोकांना जेव्हा कळायला लागलं की या साठवण म्हणून घेतलेल्या वस्तूंची अथवा संपत्तीची किंमत वेळेनुसार वाढते तेव्हा गुंतवूणक ही पद्धत खऱ्या अर्थाने सुरु झाली. गुंतवणूक आणि बचत या दोन्हींकडे त्या काळात एकच नजरेतून पहिले जायचे. जस जसा काळ बदलत गेला तस तसे लोकांना समजले की बचतीपेक्षा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जास्त आहे. ज्यामुळे गुंतवणूककडे लोकांचा ओढा जास्त वाढला. जेव्हा तुमच्या उत्पन्नाच्या नफ्यातील काही भाग तुम्ही भविष्यातील काही गोष्टींसाठी बाजूला काढून जपून ठेवता तेव्हा ती बचत होते आणि जेव्हा तुम्ही नफ्याचा काही भाग हा एखाद्या कंपनीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही गुंतवणूक करता. तसे पाहायला गेल्यानंतर दोन्हीमधून फायदाच होतो पण गुंवणूकीतून जास्त फायदा होतो, ज्यामुळे आजकाल गुंतवणुकीचा विचार जास्त करतात बचतीपेक्षा. आता दोन्ही गोष्टींमध्ये नेमका फरक कसा पडतो हे आपण पाहूया.
बचतीच्या फायद्यांमध्ये एक फायदा असा आहे जेव्हा आपण बचत करत असतो तेव्हा आपल्याला ५% पर्यंत व्याजदर मिळतो. तसेच बँकेत पैसे ठेवले तर ते पैसे बुडण्याचा धोका कमी असतो. आपल्याला जर अल्पकालावधीसाठी पैसे साठवायचे असतील तर बचतीचा पर्याय एकदम उत्तम आहे. जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा त्याच्या फायद्यांमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेनुसार त्यातून मिळणारा परतावा हा बचतीच्या तुलनेत खूप जास्त असतो, आपण असे म्हणू शकतो की दामदुप्पट असतो. गुंतवणुकीतून मिळणारा व्याजदर ७ ते १०% पर्यंत एवढा असतो.
ज्याप्रमाणे गुंतवणुकीमध्ये फायदा जास्त असतो त्याप्रमाणे त्यात जोखीमसुद्धा जास्त असते. गुंतवणुकीचा हा फायदा जेव्हा गुंतवणूक जास्त कालावधीसाठी असते तेव्हा अधिक जास्त होतो. गुंतवणुकीचा विचार करताना आपण म्युचुअल फ़ंड, ट्रेडिंग, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट इ. पर्यायांचा विचार नक्की करू शकतो. हे सर्व करत असताना गुंतवणुकीमध्ये जोखीम जास्त असली तरी वेळेसोबत त्यातून मिळणार नफा फार मोठा आहे. ज्यामुळे भविष्यातील अनेक प्लॅन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला अधिक बळ मिळू शकते. भविष्यातील एखादी मोठी कल्पना किंवा तुमचे एखादे मोठे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी फक्त बचत हा पर्याय खूपच तोकडा पडू शकतो. त्यामुळे गुंतवणूक या पर्यायाचा विचार करून आपण आपली ही मोठी स्वप्नं नक्कीच पूर्ण करू शकतो. आता जोखीमबद्दल बोलायचे झाल्यास गुंतवणुकीमध्ये जसा फायदा जास्त तशी जोखीम जास्त आहे तरीसुद्धा सर्वांचा बारकाईने अभ्यास केला आणि गुंतवणूक नेमकी कुठे, कधी आणि केव्हा करावी हे समजायला लागले तर ही जोखीम आपण नक्कीच कमी करू शकतो.
वेळेनुसार तुमच्या पैशांना योग्य किंमत मिळण्यासाठी गुंतवणूक हा अतिशय योग्य पर्याय आहे. भविष्यात येणारी अनेक संकटे ज्यामुळे खूप मोठ्या खर्चाला आपल्याला सामोरे जावे लागते अशावेळी या गुंवणूकीचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. आयुष्याच्या आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या व्यवसायात आणि नोकरीमध्ये अनेक मोठे बदल किंवा चांगले वाईट बदल घडू शकतात तेव्हा भविष्य संरक्षित करण्यासाठी वर्तमानात आपण गुंतवणुक नक्कीच केली पाहिजे.