१० वी आणि १२ वी नंतर काय?
बाळ मोठं झाल्यानंतर तू काय होणार? हा अगदीच गोड आणि महाभयंकर प्रश्न आपल्याला लहानपणी कितीतरी वेळा आपल्या अनेक नातेवाईकांनी विचारला असेल ना? जणू काही आपल्याला दिलेल्या खाऊच्या बदल्यात त्यांना याचं उत्तर हवंच असायचं. ध्येयासक्ती म्हणजे नक्की काय? हा साधा शब्दसुद्धा न ऐकलेल्या आपल्या कोवळ्या मनातून उत्तराचे किंबहुना भविष्यासाठीचे अनेक हुंकार बाहेर पडतात. पटकन म्हणतो आपण, ‘अहो, मी पोलीस होणार किंवा मी कलेक्टर होणार.’
करिअर म्हणजे नेमकं काय याच्याशी त्या वयात आपल्यला तसे देणेघेणे नसतेच, पण देणेघेणे असते ते आपल्या पालकांना. हो आपण तर मातीचा गोळा असतो, वाढत्या वयानुसार हा मातीचा गोळा घडत असतो, आपला इंटरेस्ट ठरवत असतो आणि या गोळ्याचे म्हणजेच आपले बारकाईने निरीक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते, जेणेकरून ते आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आकार द्यायला किंवा करिअरसाठी जास्त उपयोगी ठरेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर करिअर निवडीची वेळ येते, पूर्णवेळ कोणत्या क्षेत्रात राहायचं हे समजण्यासाठी याची खूप मदत होते. याचे आणखी कारण असे आहे की, लहान वयात ग्रास्पिंग क्षमता उत्तम असते. अशा वेळी जे बिंबवले जातं, मुलं त्यानुसार घडत असतात.
अनेकवेळा अनेक कारणांनी अशा पद्धतीची जडघडण करणं प्रत्येक पालकांना शक्य होत नाही. प्रसंग आणि परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे सगळं जुळून येईलच असे नाही, पण अशात हे काम आपल्या शाळेतील आपले शिक्षक नक्की करू शकतात. किंबहुना त्यांना कोणत्या मुलामध्ये काय क्षमता आहे याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहित असते. पालकांना शाळेनंतर करिअरच्या दृष्टीने त्यांची खूप मदत होऊ शकते.
पालक आणि शिक्षक यांची मते काही असली तरी मुलं ठामपणे त्यानुसार योग्य करिअर निवड करू शकत नाहीत. १०वी आणि १२वी नंतर नेमका भेडसावणारा प्रश्न म्हणजे करिअरचं पुढे काय? अशावेळी पहिल्या टप्प्यातील पालकांचा कलचाचणी म्हणजे IQ Test घेण्याकडे कल जास्त असतो. ज्यातून आपल्या पाल्याचा कल नेमका कुठे आहे? त्याची रुची कशात आहे? हे ठरवले जाते. दुसऱ्या टप्प्यातील पालकांनी आधीच आपल्या परंपरागत वर्षानुवर्षे चालत आलेल्या खानदानी व्यवसायासाठी आपल्या मुलाची तयारी करून घ्यायला सुरु केलेले असते. तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे जास्तीत जास्त पालक तर लाटेवर स्वार होत असतात, म्हणजेच सध्या ट्रेंडिंग करिअर पर्याय काय आहेत, त्यातील एक आपल्या मुलाच्या गळ्यात घालतात आणि आपली जबाबदारी पूर्ण करतात.
पहिल्या टप्प्यातील पालक ठीक आहेत, दुसऱ्या टप्प्यातील पालक तरी बरे म्हणता येतील, पण तिसऱ्या टप्पातील पालकांचा निर्णय म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क किंबहुना आयुष्याची जोखीम असू शकते. मुलांचं भविष्य एकतर उज्ज्वल होऊ शकतं, नाहीतर आयुष्यभर त्यांचा कोंडमारा होऊ शकतो. म्हणून करिअरची निवड करताना १०वी आणि १२वी च्या टप्प्यावर फार विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
मग निर्णय घ्यावा कसा? २१ व्या शतकात संपूर्ण जग एका क्लिकवर तुमच्या हातात आलेले असताना करिअरची अनेक दालनं तुमच्यासमोर आज खुली आहेत. काही वर्षांपूर्वी यासाठी खूप मर्यादा होत्या, पण तो काळ आता नाही राहिला. १०वी आणि १२वी नंतर आपल्या देशातील अलिखित नियमानुसार सर्वजण एकतर पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेतात किंवा डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्ससाठी ॲडमिशन घेतात, पण ही मळलेली वाट सोडून काही वेगळं करू पाहणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त गरज आहे त्यांना विश्वासात घेण्याची आणि बळ देण्याची.
आधीच सांगितल्याप्रमाणे कलचाचणी हा एक करिअर निवडीसाठी मदत करणारा पर्याय आहे. मग तुम्ही म्हणाल अहो सगळं समजलं, पण ही रिस्क घेण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टी आपण विचार घेतल्या पाहिजेत नक्कीच. त्या गोष्टीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते, ती त्या मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता आणि इंटरेस्ट काय आहे. दुसरी मूलभूत गोष्ट म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड म्हणजे त्याच्या परिवाराची स्थिती उदा. भविष्यात त्याच्यावर घराची जबाबदारी किती काळात येऊ शकते. तिसरी आणि सगळयात मूलभूत गोष्ट म्हणजे त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती.
या तीन मुलभूत गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचा सारासार विचार करून आपण कोणत्याही क्षेत्रातील करिअरसाठी जोखीम उचलू शकतो. शेवटी आपण कितीही विचार केला तरी काही चमत्कार काळाच्या पटलावर कोणत्याही परिस्थितीत घडत असतातच. समोर कोणताच पर्याय नसताना प्रवाहासोबत जाऊन पुढे आपली वेगळी वाट तयार करून ध्रुवताऱ्यासारखे आपले स्थान निश्चित करतात हे मात्र तितकेच शाश्वत सत्य आहे.
आणखी वाचा
- Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी
- करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling