उद्योजकतासोप्या भाषेत... बिझनेस

व्यवसायाच्या शुभारंभापासून तो मोठे होईपर्यंत जी प्रोसेस आपण राबवतो ती आपल्या व्यवसायचे भविष्य ठरवते.

आता व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्प्या भाषेत सांगायचं, तर आपण एखादी वस्तू किंवा सेवा तिच्या खरेदीच्या किंवा निर्मिती मूल्यापेक्षा जास्त किंमतीने बाजारात विकतो आणि त्यातून नफा मिळवतो तेव्हा या व्यवहाराला बिझनेस म्हणजे व्यवसाय असं म्हणतात. पूर्वीच्या काळी चलन म्हणून वस्तूंचा वापर व्हायचा. अजूनही काही गावांमध्ये अशी पद्धत आहे कि वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते. मग प्रश्न हा पडतो आपल्या आजूबाजूला इतके लोक व्यवसाय करताना दिसत असतात, त्यातले काही यशस्वी असतात आणि तर काहींचा व्यवसाय ठराविक काळापुरताच सुरु राहून नंतर बंद पडतो. असं का होत असेल? तर एक म्हणीमध्ये याचं सार लपलेले आहे, ते म्हणजे, ‘शेतात काय पिकतं, यापेक्षा बाजारात काय विकलं जातं’ हे महत्वाचं  आहे. व्यवसाय म्हणून आपण ज्या गोष्टीचा किंवा प्रॉडक्टचा विचार करतो त्याचा आणि सध्याच्या बाजारात त्याची किती गरज आहे हा विचार फार महत्वाचा आहे.

या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्यासोबतच किंबहुना त्याआधीपासूनच विचार करावी अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी किंवा भांडवल. यामध्ये विचार करताना आपल्या व्यवसायाला किती पैसे आवश्यक आहेत हे तर महत्वाचे आहेच; पण त्यासोबतच व्यवसायातून नफा मिळेपर्यंत व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात ते म्हणजे, आपण गुंतवणूकदारांकडून भांडवल घेऊ शकतो किंवा सरळ आपण बँकमधून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. नवीन उद्योजकांसाठी सरकारने उद्योजकता वाढीस लागावी यासाठी अनेक योजना देखील आणल्या आहेत आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो.

या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर तुम्ही तुमचा लहान-मोठा बिझनेस नक्कीच सुरु करु शकता, पण तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तम सवयी असणे गरजेचे आहे. आता या नेमक्या सवयी कोणत्या? अगदी थोडक्यात सांगायचं तर धाडस, आत्मविश्वास, रिस्क घेण्याची तयारी, दूरदृष्टी, संयम, कष्ट, जिद्, मेहनत, सातत्य आणि चिकाटी. हो हे शब्द बोलायला जितके सोपे वाटतात तितकीच हे सर्व अमलात आणण्यासाठी खूप मोठी मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. ही मानसिक तयारी तेव्हाच असू शकते, जेव्हा तुम्ही खूप जास्त महत्त्वाकांक्षी असता आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व प्रकारे तयार असता.

आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की यश मिळवणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा यश टिकवणे जास्त अवघड असते. हे समीकरण व्यवसायाला सुद्धा लागू होते. व्यवसाय सुरु करणे जितके अवघड आहे, त्यापेक्षा सातत्याने तो चालवणे आणि त्याचा सर्वदूर प्रसार करणे अवघड आहे. अवघड असले, तरी अशक्य आजिबात नाही आणि हो शेवटी एवढं नक्की सांगता येईल की अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जसा प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा त्याची पद्धत वेगळी अगदी तसेच प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यातून आलेले शहाणपण हे त्याहून वेगळे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन पूर्व तयारी आणि पूर्ण तयारी करून नक्कीच आपण आपल्या स्वप्नातील व्यवसायच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार करू शकू.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button