उद्योजकता विजडमलेखमालिका

उद्योगात स्थिर होण्यासाठी लागतात १ हजार दिवस

सर्वसाधारण नोकरी करण्याचीच ज्या कुटुंबात प्रथा आहे, त्या कुटुंबातील कोणीही व्यवसायात आला तर लोकांना वाटते की, आता लगेच पैसा मिळायला हवा. पण नोकरी म्हणजे, बे एके बे. पगाराचा कालावधी एक महिन्याचा असतो. महिना झाल्यावरच ठराविक रक्कम हातात येते. तर उद्योग म्हणजे; बे दुणे चार, चार दुणे आठ… पण व्यवसायाचा कालावधी हा किमान १ हजार दिवसांचा असतो. अर्थात व्यक्तिपरत्वे, व्यवसायपरत्वे हा कालावधी कमी अधिक होऊ शकतो.

जसे स्त्री एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने घेते, पण नऊ स्त्रिया मिळून एका महिन्यात एका मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तसेच एखाद्या माणसाला, नवउद्योजकाला उद्योग समजण्यासाठी, मार्केटमधील सर्व प्रक्रिया, तेजी मंदी, खरेदी, विक्री, जाहिरात, मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाच्या सर्व खाचाखोचा समजून त्याला व्यवसायात तरबेज होण्यासाठी किमान ३ वर्षे लागतात, मग तुमच्याकडे कितीही भांडवल असू द्या.

तुमच्याकडे जरी २० लाखांचे भांडवल असले तर ते टप्याटप्प्याने गुंतवत जा. सर्व भांडवल एकदम गुंतवले, तर अनुभवाविना नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. प्रथम ५ लाख गुंतवा. पहिले सहा महिने व्यवसाय करा व शिका. नंतर पुढचे पाच लाख गुंतवा. असे हळूहळू भांडवल वाढवत जा व व्यवसायात तीन वर्षात चांगल्या प्रकारे जम बसवा. नाहीतर एकदम गुंतवाल अन उत्पन्न नाही आल्यावर स्वतःचा खर्च, बँकेचे हप्ते याचे टेन्शन यायला लागेल व व्यवसाय सोडून पैशाच्या जुळवाजुळवीत वेळ जाऊन फ्लॉप शो होईल. परंतु तुम्ही टप्पाटप्प्याने २० लाख गुंतवले तर तुम्हाला अनुभव येईल, मार्केटचा अंदाज येईल, बऱ्याच नवीन गोष्टी शिकता येईल. त्यामुळे रिस्क कमी होईल. तीन वर्षात तुमची चांगली बॅलन्सशीट तयार होऊन कोणतीही बँक २५ ते ३० लाख नवीन भांडवलही देईल. तेव्हा व्यावसायिक बंधूनी १००० दिवस हा कालावधी लक्षात ठेवावा व त्यानुसार मार्गक्रमण करावे. नाहीतर आरंभशूर खूप असतात व ते दोन तीन महिन्यात यशाची अपेक्षा करतात आणि अपयशी झाल्यावर स्वतःच्या अपयशाचे खापर व्यवसायावर आणि इंडस्ट्रीवर फोडतात. त्यामुळे समाजात व्यवसायाविषयी नकारात्मक वातावरण तयार होते व नवीन व्यावसायिक तयार होत नाहीत. तुम्ही असे करू नका.

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button