उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना, पालकांना वेध लागतात फिरण्याचे! यातले काहीजण मोठमोठे पॅकेज घेऊन मग परदेशात सुट्टी एन्जॉय करतात, तर काहीजण आपल्या देशातच केरळ, कर्नाटक, गोवा यांसारख्या वेगवेगळ्या राज्यांना भेट देतात. आता या दोन्ही गोष्टी करण्यात काही चुकीचं नाहीये, पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्यातल्या महा सौंदर्याचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर फिरणं आम्हाला तरी पटत नाही बुवा! महाराष्ट्र म्हटलं की कोकण हे नेहमीच प्रत्येकासाठी सुट्टीचं परफेक्ट डेस्टिनेशन असतं. तिथले वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणं आहेत. कोल्हापूरपासून जवळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे “तळकोकण”. या तळकोकणात अनेक छोटी-छोटी गावं आहेत आणि यातलंच एक रमणीय गाव म्हणजे “जांभरूण”. चारही बाजूंनी डोंगरानं घेरलेल्या या गावात बारा महिने खळखळणारी नदी वाहत असते. इथल्या डोंगर उतारावर भाताची खाचरं, माळ, फणस, आंबा, सुपारीच्या झाडांची गर्दी पाहायला मिळते. याच झाडांच्या गर्दीतून पाझरणारी रसाळ कोकणी, लक्ष वेधून घेणारी टुमदार घरं आणि जिव्हाळा जपणारी इथली माणसं असं एकूणच ओसंडून वाहणारं निसर्गसौंदर्य या गावाला लाभलंय.
जांभरूणमध्ये आजही २४ तास डोंगरांचं पाणी पाटाने झऱ्यातून वाहतं. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात ४०० ते ५०० वर्ष जुनी खासगी मालकीची मंदिरं आहेत, जी अजूनही शाबूत असलेली पाहायला मिळतात. ही मंदिरं, घरं यांना दगडी पायवाटेने जोडलेलं आहे. यांना इथं “पाखाड्या” म्हटलं जातं. या पाखाड्यांना दोन्ही बाजूंनी रानफुलांनी सजवलेलं आहे. अशा कितीतरी पाखाड्या, मोठी झाडं, मंदिरं असा नैसर्गिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे गाव आहे.
पुणे ते जांभरूण हे अंतर ३१४ किमी आहे. पुणे, कोकरूड, मल्कापूर, अंबाघाट, निवळी गणपतीपुळे रोडने कोतवडे फाट्यावरून डावीकडे वळून जांभरूणला जातं येतं. रत्नागिरीहून हे अंतर साधारण २४ किमी इतकं आहे. गावाजवळ येताच निसर्गाचं वैभव बघून तुमची गावाबद्दलची उत्सुकता आणखी वाढेल. सतत खळखणाऱ्या नदीचा, पाटबंधाऱ्यांचा आवाज या ठिकाणी अनुभवायला मिळेल.
तुम्हालाही जर रोजच्या गर्दीतून बाहेर पडून चार क्षण नैसर्गिक शांततेत घालवायचे असतील, तर “जांभरूण” शिवाय दुसरा चांगला पर्याय कोणता असू शकतो?
आणखी वाचा
- दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना
- तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?
- स्वित्झर्लंडची मजा भारतात घ्यायचीये? मग या ठिकाणी जायलाच पाहिजे!