शेतीशेतीजगत

उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

जसे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गोष्टींची गरज लागते, तसेच मातीला देखील अन्न पाणी हवा या गोष्टींची गरज लागते आणि यामध्ये मातीचे अन्न काय; तर तिला दिली जाणारी पोषक द्रव्य. आपण जरी आपल्या बाल्कनीमध्ये एखादं छोटं रोपटं लावलं, तरी त्यात काहीतरी खत हे टाकतोच. मग शेताचा विचार केला तर चांगलं पीक येण्यासाठी आणि जमीन चांगली राहण्यासाठी खत तर द्यावच लागणार ना. खतांसोबत जमिनीची योग्य मशागत, जमिनीला पोषक द्रव्य अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.

शेती करीत असताना शेतीचे व्यवस्थापन ही महत्त्वपूर्ण बाब आहे. केवळ फक्त राबराब राबणे म्हणजे शेती नव्हे, तर तुमच्या कष्टाचे चीज होणे म्हणजे खरी शेती. कोणतेही पीक घेत असताना काही गोष्टींचा प्रकर्षाने अभ्यास केला पहिजे.  कमी खर्चात पाण्याचा वापर, कमी खर्चात कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन व पीक विक्रीचाही शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. चला तर पाहूया उत्तम शेती करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

पाणी व्यवस्थापन –

पाणी हा शेतीसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आवश्यक तेथे मुळांच्या कक्षेला दिले जावे. रेताड जमिनीची जलधारण क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांची पाण्याची गरज अधिक असते. तर खोल काळ्या जमिनीची जलधारण क्षमता जास्त असते. अशा जमिनीत तुलनेने पिकांना पाण्याची गरज कमी असते. अतिरिक्त पाणी दिल्याने उत्पादन वाढत नाही तर जमिनीचे आरोग्य बिघडते. त्यामुळे पिकांना गरजेप्रमाणेच पाणी द्यावे.

जमिनीची निवड –

फुलशेती, फळशेती किंवा कोणतेही अन्नधान्य पिकविताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची निवड. जर डोंगराळ भागात तुमची जमीन असेल, तर चांगले पीक येण्यास खूप वर्ष लागू शकता. जमिनी ह्या पिकांनुसार विविध अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या व पिकांनुसार आवश्यक ओल टिकवून ठेवणाऱ्या असाव्यात. लागवड पूर्व जमिनीची निवड हा पीक व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी विविध कृषी विद्यापीठं अथवा खासगी संस्थांकडून मातीपरीक्षण करून त्यातील बारकावे शास्त्रज्ञांकडून समजून घ्यावेत.

जमिनीची मशागत –

जमिनीच्या मशागतीमुळे आपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. मशागतीमुळे जमिनीची घनता, रंग, पोकळी, भौतिक गुणधर्म ह्यावर परिणाम होत असतो.

पिकांची निवड –

पिकांची निवड करताना घेणारे पीक हे किडीस कमी बळी पडणारे गुणवत्तापूर्वक पीक असावे. यामध्ये फळे आणि फुले देणारे वाण हे अधिक उपयुक्त ठरते. यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच चौकस बुद्धीने, बियाण्यांची निवड करावी, बियाणे, रोपे खात्रीशीर ठिकाणांहून घ्यावीत. तसेच फळबागा किंवा इतर रोपे खरेदी वेळी रोपांच्या मातृवृक्षाची माहिती घ्यावी, रोपांचा दर्जा, वय इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्यात.

अशा पद्धतीने जर जमिनीची योग्य काळजी घेऊन शेती केली, तर नक्कीच तुम्ही शेतीत चांगले उत्पन्न घेऊ शकता.


आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button