उद्योजकता विजडमलेखमालिका

हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘हिशोब लागण्यासाठी तो ठेवावा लागतो !’ करायची सुरवात?

एका व्यापाऱ्याने बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना एक प्रश्न विचारला. मी संगमनेरवरून आहे. मी डाळिंब ट्रेडिंग व्यवसाय चालू केला. १५ ते १८% मार्जिन आहे. आता वर्ष झाले. धंदा होतोय पण पैसा कुठून आला व कुठे गेला कळतच नाही. बँकेचं कर्जही लाखांचे आहे. काहीच ताळमेळ लागेना, काय करावे?

यावर कदम त्याला म्हणाले, “खर्च झाल्याचं दु:ख नाही, पण हिशोब लागत नाही याचं वाईट वाटतं.” नवीन व्यवसाय सुरू केल्यावर अनेकांचं असंच होतं. हातात अचानक पैसा खेळायला लागतो. पूर्वी कटिंग चहा पिणारा पण, हॉटेलात बसून सहज ५०० रुपये खर्च करतो. मुलांना १०० ऐवजी ५००चे खेळणे घेतो. इकडे तिकडे वायफळ पैसे खर्च होत राहतात. शेवटी इकडची तिकडची उधारी, बंकेचं कर्ज असं सगळं वाढत जात. बिझनेसमध्ये कॅश फ्लो आहे तोपर्यंत काही वाटत नाही, राहणीमान आपोआप उच्च होत राहतं, खर्च होत राहतो.

बिझनेसमधले पैसे व वैयक्तिक वापराचे पैसे यातील फरक तोटा झाल्यावर कळतो. दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजारांपैकी आपले ५००च आहेत हे समजायला नवख्या व्यावसायिकाला वेळ लागतो, तोपर्यंत ५-१० लाख तोटा झालेला असतो. हिशोब म्हणजेच अकाऊंटिंग हा कोणत्याही व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे, ज्याकडे बरेच व्यावसायिक दुर्लक्ष करतात. व्यवसायाची सुरुवात सकाळी अकाऊंटची वही उघडून व सायंकाळी दुकान बंद करताना दिवसभरचा ताळेबंद मांडूनच व्हायला हवी, नाहीतर वर्षाच्या शेवटी डोळे उघडून काही उपयोग नाही. ह्याचे एवढे येणे बाकी व त्याचे तेवढे देणे बाकी. गल्ल्यात ठणठण गोपाळ आणि वहीत लाखोंचा फायदा अशी गत. हिशोबाची वही काय फक्त पुजण्यासाठी घेतली का? पैशाचा हिशोब रोजच्या रोज हवा व त्याचं रोजचं नियंत्रण हवे, अन्यथा नुकसान होऊन पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही.

Behind every good Business, there is a great accountant. यशस्वी व कर्त्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जिला आपण संसाराची ‘अर्थमंत्री’ म्हणतो. म्हणजेच ती चांगली accountant असते. महिना तीन किलो तेल, पाच किलो साखर लागते, तर त्यातच बरोबर घर चालविते आणि असेच घर पुढे जाते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हिशोब ठेवलात तर लागेल, नाहीतर फक्त पश्चाताप करावा लागेल.

तुम्ही रोजचा हिशोब ठेवताय ना? हिशोब न ठेवण्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आहेत? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button