काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा
जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘काऊंटरवर नेहमी हसतमुखाने बसा…’ करायची सुरवात?
रामलाल मिठाईवाले ४० वर्षांपूर्वी अंगावरच्या कपड्यावर मुंबईत आले. दुसर्याच्या दुकानात हलवाईचे काम करत करत स्वतःचा धंदा सुरू केला. आज मुंबईत ५ दुकाने, ४ फ्लॅट, गाड्या सर्व काही आहे. दोन मुलं त्यांना व्यवसायात हातभार लावतात. काही दिवसांपूर्वी रामलाल याचं दुःखद निधन झालं. सांत्वन सभा पुढील रविवारी होती, त्यांच्या मोठ्या मुलाने व्हॉटसअपवर तसा निरोप सर्वांना दिला. त्यांचा लहान मुलगा काऊंटर सांभाळत होता, ग्राहकांची गर्दी होती. ख्रिसमसमुळे केक, मिठाईला चांगली मागणी होती. थोडी गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ दुकानात गेले आणि म्हणाले, “बिपीनभाई पिताजी गुजर गये समजके बहुत दुःख हुआ.” तो म्हणाला; मेहमान मिलने के लिए घर मे आते रहते है, इसलिए बडा भाई घर पे है। ख्रिसमस का सीझन है, तो मै धंदा संभाल रहा हू। क्या करे शो मस्ट गो ऑन! सर जी, वो कंडोलन्स मीटिंग का मेसेज मिला क्या, हमारे समाजभवन मे है।” ते गृहस्थ म्हणाले, “हा मिल गया, चलता हूँ।”. तीन दिवसापूर्वी वडिलांचं निधन झालं, त्याचा परिणाम काऊंटरला अजिबात न जाणवू देता तो व्यवसाय चालवत होता.
असे म्हणतात ज्या दिवशी तुम्हाला हसता येत नाही त्या दिवशी दुकान उघडू नका. ज्या दुकानदाराच्या चेहऱ्यावर हसू नसते, त्याच्या दुकानात आले की ग्राहकांना जाऊच नये असे वाटते. काऊंटर सेल्सचीसुद्धा एक विशिष्ट सायकॉलॉजी आहे. माल त्याच किंमतीचा, पण चांगल्या सेल्स मॅनेजमेंटमुळे काही दुकाने जोरदार चालतात.
यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत. मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघडणारे व सगळ्यात शेवटी बंद होणारे दुकान तुमचेच हवे. देवाला सुगंधी अगरबत्ती, दिवा लावूनच काऊंटरची सुरवात करा. मद्यपान, मांसाहार केले असेल तर आंघोळ केल्याशिवाय काऊंटरला येऊ नका. गृहकलह, बायकोबरोबर भांडण, टेन्शन, आजार, तब्येत, कुणाचा मृत्यू किंवा काहीही असेल, तरी कोणत्याही परिस्थितीत त्याचा काऊंटरवर दिखावा व वाच्यता करू नका. खरंच काही अडचण असेल व तुम्हाला त्या दिवशी हसता येत नसेल, तर एकतर दुकान उघडू नका, नाहीतर तुम्ही काऊंटरला बसू नका.
दुकानाचे सर्व शेल्फ गच्च भरलेले दाखवा व ठेवा. अर्धवट शेल्फ ग्राहकांवर अत्यंत बॅड इंम्प्रेशन टाकतात. नेहमी स्वच्छ कपडे घाला, शक्यतो पांढरे शुभ्र किंवा लाईट कलरचे शर्ट वापरा. काऊंटरवर नेहमी स्वच्छता ठेवा. दुकानातील कामगारसुध्दा नीटनेटके असावेत. गल्ल्यात सुट्टे पैसे नेहमी ठेवा. सुट्टे नसले की उगीच प्रत्येक वेळी इकडे तिकडे पळू नका. ‘छुट्टा लेके आओ’ असे ग्राहकांना म्हणू नका. नाहीतर सुट्टे आणायला जातो आणि मालही तिकडेच खरेदी करतो, तुम्ही वाट पाहत बसणार कधी येतोय म्हणून. अशा लहान लहान गोष्टीचे बारीक लक्ष व नियोजन म्हणजे ‘काऊंटर सेल्स मॅनेजमेंट’ हे लक्षात ठेवा.
तुमचे काउंटर सांभाळताना तुम्ही या गोष्टी पाळता का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्टीचा विषय आवडल्यास लाईक आणि शेअर करा.