करिअरबद्दल निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? I Career counselling
Career counselling – दहावी – बारावीची परीक्षा झाली. निकाल सुद्धा जाहीर झाले. आता विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास रिकामे झाले, पण या वयातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे पुढे करायचं काय? कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचं? अनेकांचे सल्ले घेऊन आपण त्यांच्या सांगण्याप्रमाणे एखाद्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतो, पण 3- 4 वर्ष त्या फील्डमध्ये काम केल्यानंतर मग लक्षात येतं की अरे आपण चुकीच्या क्षेत्रात काम करतोय. मग पुन्हा काही जण फील्ड चेंज करण्याचा विचार करतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. भविष्यात अशी वेळ तुमच्यावर येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर करिअर निवडताना सुरुवातीलाच प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
करिअरचा निर्णय घेताना सामान्यत: दहावी-बारावीचे गुण, आवड, करिअरमधील वाढीच्या संधी, व्यक्तिमत्त्व, वेळ आणि शिक्षणासाठीचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. बऱ्याचदा आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्याप्रमाणे ते ज्या क्षेत्रात काम करतायेत त्याच क्षेत्रात स्वतः देखील काम करण्याचा निर्णय घेतो, पण असा निर्णय तुम्हाला पुढील आयुष्यात महागात पडू शकतो. कोणीतरी यशस्वी झालं म्हणून तुम्ही देखील त्या क्षेत्रात व्हाल हा विचार डोक्यातून बाहेर काढा आणि तुम्हाला कोणते काम करण्यात आनंद मिळतो, त्यातच करिअर घडवा.
क्षमता ओळखा: एखाद्या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे स्किल्स असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला एखादे क्षेत्र आवडते, पण त्यामध्ये करिअर करण्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे नसतात. जसे की काही क्षेत्रात तुम्हाला सतत प्रवास करावा लागत असेल. तर काही क्षेत्रात नऊ ते पाच जॉब असेल. तुम्हाला आधीच तुम्ही काय करु शकता याचा अंदाज असणे गरजेचे आहे. तुम्हाला आवडणाऱ्या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी तुमच्याकडे आहेत का? याचा विचार करुन मगच योग्य निर्णय घ्या.
Career counselling ची मदत: सध्याच्या काळात दररोज नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे करू की ते करू असा गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या मतावर ठाम नसता अशा वेळी प्रोफेशनल मदत घेणे योग्य राहते. एक चांगला करिअर काऊन्सिलर तुमच्या आवडी-निवडी, गरजा आणि तुमचे मार्क्स या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून तुमच्यासाठी बेस्ट काय असेल याबद्दल सल्ला देतो.
स्वतःला कामात चॅलेंज करत राहा: जर तुम्हाला तुमचे काम कायमस्वरुपी आवडत राहावे असे वाटत असेल, तर तुम्ही सतत स्वतःला चॅलेंज करत राहणे गरजेचे आहे, तुम्ही दररोज एकसारखेच काम करत राहाल, तर नक्कीच एक दिवस तुम्हाला कंटाळा येईल आणि ते काम तुम्हाला नकोसे वाटेल. म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. जर दररोज काही नवे करणे शक्य नसेल, तर स्वतःसाठी काही गोल्स सेट करा, ज्यामुळे कामात तुमचा उत्साह टिकून राहील आणि तुम्ही यशस्वी होण्याकरिता अतिरिक्त मेहनत करत राहाल.
मित्रांनो दहावी, बारावी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर निवडलेली वाटच पुढे आपलं करिअर घडवण्यात मोलाची ठरते. बऱ्याचदा आपण ऐकीव माहितीवरून फील्ड निवडतो. हा निर्णय कधी योग्य ठरतो, तर कधी अयोग्य. त्यामुळे केवळ ऐकीव माहितीवरुन फील्ड निवडण्याऐवजी वरील मुद्यांचा विचार करून योग्य पद्धतीने निर्णय घेणं जास्त महत्त्वाचे ठरते.
आणखी वाचा
Career in Fine Arts I फाइन आर्ट्समध्ये घ्या डिग्री, करिअरच्या आहेत विपुल संधी