उद्योजकता विजडमलेखमालिका

आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या…

जो चुकतो तो माणूस आणि दुसऱ्याच्या चुकांतून शिकतो तो शहाणा माणूस. अशाच शहाण्या माणसांच्या गोष्टी ‘उद्योजकता विजडम’ या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्यासाठी घेऊन आली आहे, तर आजच्या गोष्टीचा विषय आहे ‘आपल्या ध्येयाची स्वत:ला सतत आठवण करून द्या’ करायची सुरवात?

गावाकडून शहरात व्यवसायासाठी आलेल्या जयसिंगने आपला व्यवसाय अजून वाढावा यासाठी बिझिनेस एक्सपर्ट असणाऱ्या कदमांना फोन करून आपल्या कारखान्यावर बोलावलं.

मुंबईतील झोपडपट्टी एरियात, दोन खोल्यात त्याचा कारखाना. एक मोडका टेबल आणि खुर्ची म्हणजे त्याचं ऑफिस. चार पाच महिला, बॉक्स चिकटवणे, पॅकेजिंग करणे यांसारख्या गोष्टी करत होत्या. जयसिंग मूळचा राजस्थानचा. तिकडे तो अशा पद्धतीच्या कारखान्यात काम करायचा. तीन चार वर्षापूर्वी मुंबईत आला आणि ड्रायफ्रूटसाठी लागणाऱ्या डेकोरेटीव्ह पॅकेजिंग बॉक्स निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. जशी गावाकडे दिवाळीला एकमेकांना फराळ देण्याची जशी पद्धत आहे, तशी उच्चवर्गीय लोकांत सण, समारंभ इत्यादीसाठी ड्रायफ्रूट बॉक्स देण्याची पध्दत आहे. तळलेले पदार्थ, गोड बेकरीचे पदार्थ वगैरे देण्याचे आता प्रमाण कमी झालं. आता ड्रायफ्रूट्सना खूप मोठी मागणी आहे. अनेक उच्चभ्रू लोक विवाह समारंभांत किंवा लग्नाच्या पत्रिकेबरोबर ड्रायफ्रुटचा बॉक्स देतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येसुद्धा हीच पध्दत वापरली जाते. हे सारं जयसिंग अगदी अचूक हेरत होता. हीच संधी ओळखून, आपलं शिकलेलं कौशल्य वापरून त्यानं हा व्यवसाय करायचं ठरवलं. पुठ्ठे, थर्माकोल, पेपर, चमकी कागद इत्यादी आकर्षक बाबी वापरून तो आपलं कौशल्य दाखवत होता. या पेपर-क्राफ्ट कलेत निपुण होऊन तो उत्पादन बनवत होता आणि आता त्याला ते बॉक्सेस विदेशात एक्स्पोर्ट करायचे होते म्हणून त्याला मार्गदर्शन हवं होतं.

कारखान्यात आलेल्या कदमांना जयसिंगने आपला तो दोन खोल्यांचा कारखाना दाखवला आणि खुर्चीत बसायला सांगितले. खुर्चीत बसवून ते टेकतात, तोच त्यांच्या पाठीला एक खिळा टोचला. कदम म्हणाले, “अरे जयसिंग, इस कुर्सी में कील है, इसे ठीक करना पड़ेगा किसी से।” त्यावर त्याने जे उत्तर दिले ते थक्क करणारे होते. तो म्हणाला, “हाँ साहब, कील मैंने ही लगवाया है। मैं गांव से कुछ कमाने के लिए मुंबई आया था, वो मुझे हर वक्त याद रहना चाहिए। जब मैं इस कुर्सी पे बैठू, तो वो कील मुझे चुभती है और बताती है, जब तक तू कमायेगा नहीं, तब तक बैठ नहीं सकता। मैं यहाँ आया ही इसी सपने के साथ हूँ की, पाच सालों में कमसे कम एक करोड का धंदा करूंगा, तब तक चैन से नहीं बैठूंगा। ये कील इसीलिए लगायी है कि मुझे आराम से बैठने की आदत न लगे।”

पुढे त्याचे बॉक्सेस एक्सपोर्ट करण्यासंबधीच्या चर्चा सुरू झाल्या. प्रत्येकाने आपल्याला ध्येय गाठायचे आहे याची आठवण प्रत्येक दिवशी व्हावी अशी काहीतरी गोष्ट करावी, जेणेकरून तुमच्या ध्येयाचा तुम्हाला कधीही विसर पडणार नाही. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहाल.

तुमचं ध्येय नेहमी लक्षात राहावं यासाठी तुम्ही अशी काही आयडिया वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करा.

हा लेख विडीयो मध्ये पहा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button