उद्योजकताबिझनेस स्टोरीझ

5 लाखांचं लोन घेऊन सुरु केला कपड्यांचा व्यवसाय… आज आहे १५० कोटींची उलाढाल…

असं म्हणतात की; प्रयत्नांना मेहनतीची जोड असली की, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मध्य प्रदेशातील दमोह या छोट्या शहरात राहणाऱ्या एका सामान्य व्यक्तीने जगभरातील फॅशन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून हे वाक्य सिद्ध केलं आहे. ही कहाणी आहे राज नवानी यांच्या संघर्षाची, जी प्रत्येक नवउद्योजकासाठी प्रेरणादायी ठरेल. राज नवानी यांनी 1995 साली एका छोट्या कपड्यांच्या दुकानातून आपल्या व्यवसायाचा प्रवास सुरू केला आणि आज त्यांचा ब्रँड ‘नोस्ट्रम’ हा 150 कोटींची उलाढाल असलेला प्रतिष्ठित ब्रँड बनला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रेरणादायी प्रवास.

एका छोट्या दुकानातून प्रवास सुरू

राज नवानी यांचा प्रवास मध्यप्रदेशातील एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झाला. 1995 साली, त्यांनी केवळ 5 लाख रुपयांचं कर्ज घेऊन दमोह येथे ‘सॉरी मॅडम’ नावाचं  कपड्यांचं दुकान उघडलं. हे दुकान त्याच्या आगळ्यावेगळ्या नावामुळं त्या काळात स्थानिक लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं, परंतु ते एवढ्यावर समाधानी नव्हते. फॅशन क्षेत्रात काहीतरी मोठं आणि वेगळं करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. 

राज नवानी यांचं कुटुंब आधीपासूनच व्यवसायात असल्यामुळे व्यवसायात त्यांना लहानपणापासूनच  प्रेरणा मिळत होती. त्यांनी बायोलॉजीमध्ये पदवी घेतली, परंतु त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात लागून होतं. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या वडिलांच्या कपड्यांच्या दुकानात काम करताना त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकले आणि  वयाच्या अवघ्या  23व्या वर्षी, नवानी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं  धाडस केलं. त्यांनी फॅशन उद्योगात नवीन कल्पना आणि नवतंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात केली, ज्यामुळे लवकरच त्यांची ख्याती दमोहच्या बाहेर पसरू लागली .

‘सॉरी मॅडम’ ते ‘नोस्ट्रम’

1995 मध्ये “सॉरी मॅडम” या नावाने सुरू झालेला त्यांचा प्रवास 2000 च्या दशकात एका प्रतिष्ठित ब्रँडकडे वळला. ‘नोस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने त्यांनी आपल्या ब्रँडचं एकप्रकारे पुनरुत्थान केलं  आणि त्याच्या भविष्यासाठी एक स्पष्ट दिशा ठरवली.

राज नवानी यांच्या दूरदृष्टीमुळे ‘नोस्ट्रम’ ब्रँड फक्त स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरात आपली छाप सोडू लागला. उत्कृष्ट डिझाईन, ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादनं तयार करणं आणि त्यांच्या गरजांचा सखोल अभ्यास यामुळे ‘नोस्ट्रम’ लवकरच राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला. आज ‘नोस्ट्रम’ ब्रँड देशभरातील 1500 पेक्षा जास्त मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि 100 शॉप-इन-शॉप (SiS) ठिकाणी उपलब्ध आहे.

कोट्यवधींची उलाढाल

राज नवानी यांच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मेहनत, चिकाटी आणि व्यावसायिक कौशल्य. 2023-24 या आर्थिक वर्षात ‘नोस्ट्रम’ कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यांचा ब्रँड आता विविध नामांकित फॅशन शोमध्ये सहभागी होतं आहे आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहरावात तो दिसून येतो.

राज नवानी यांना त्यांच्या कंपनीची उलाढाल पुढच्या दोन वर्षांमध्ये 500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायची आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी ते व्यवसायात सतत नवतंत्रज्ञानाचा वापर करत असतात आणि  एवढंच नाही, तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाद्वारे 250 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देण्याचंही महान कार्य केलं  आहे.

नवउद्योजकांसाठी प्रेरणा

राज नवानी यांचा प्रवास हा प्रत्येक नवउद्योजकासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी घेतलेलं कष्ट, केलेली मेहनत आणि त्यांची चिकाटी ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. आपल्या स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकानं राज नवानी यांच्या प्रवासातून शिकायला हवं. 

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button