उद्योजकताबिझनेस महारथी

५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.

प्रत्येक यशोगाथेमध्ये एक संघर्षाची कथा असते. अनेक वेळा मोठं यश मिळवण्यासाठी आयुष्यात चढ-उतार आणि अडचणी येतात. पण काही लोक असतात, जे या सर्व अडचणींवर मात करून आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की यश हे फक्त मेहनत, चिकाटी आणि नवकल्पना यावरच आधारित असतं . “उजाला सुप्रीम” या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक एम.पी. रामचंद्रन यांची कथा अशीच एक प्रेरणादायक आणि संघर्षपूर्ण गाथा आहे.

या लेखात आपण त्यांच्या जीवनातील संघर्ष, कठोर परिश्रम, आणि एक मोठं व्यवसाय साम्राज्य उभारण्याचा प्रेरणादायक प्रवास जाणून घेणार आहोत.

प्रारंभिक जीवन आणि संघर्ष 

एम.पी. रामचंद्रन यांचा जन्म १९५० साली केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आर्थिक संघर्षात गेलं , त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं . परंतु, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे आयुष्य आपले  कष्ट आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं .

शाळेचं शिक्षण पूर्ण केल्यावर रामचंद्रन यांनी एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरी केली. मात्र, त्यांना स्वतःचं काहीतरी मोठं साध्य करायचं होतं. हा प्रवास सोपा नव्हता,  त्यांना यश मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. लेखापाल म्हणून काम करत असताना, त्यांच्या मनात एक व्हाईटनर मिश्रण तयार करण्याची कल्पना आली. व्हाईटनर म्हणजे कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातच या मिश्रणावर प्रयोग सुरू केले, मात्र त्यात अपेक्षित गुणवत्ता साधता येत नव्हती.

एके दिवशी, त्यांनी एका रासायनिक उद्योगावरील मासिकात एक लेख वाचला ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपडे अधिक स्वच्छ धुतले जाऊ शकतात, असं म्हटलं होतं. हा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनात नवीन कल्पना आली. त्यांनी या विचारावर प्रयोग सुरू केले, आणि त्यांना हवे तसे परिणाम मिळाले. स्वयंपाकघरात सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात बदलू लागला होता. 

व्यवसायाची स्थापना 

१९८३ मध्ये रामचंद्रन यांनी आपल्या पहिल्या मुलीच्या नावावरून “ज्योती लॅबोरेटरीज” हा व्हाईटनर उत्पादन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असं वाटलं की एक संस्कृतीप्रधान नाव त्यांच्या व्यवसायाला एक वेगळा आणि भावनिक स्पर्श देईल . त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या कंपनीचं नाव “ज्योती लॅबोरेटरीज” ठेवलं. आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी आपल्या भावाकडून फक्त ५००० रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याच तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी कारखाना सुरू केला.

ज्योती लॅबोरेटरीजचं पहिलं उत्पादन “उजाला सुप्रीम” हे लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर होतं. हे एक साधं पण प्रभावी उत्पादन होतं, जे कपड्यांना अधिक पांढरे, स्वच्छ आणि तेजस्वी बनवण्यासाठी वापरलं जातं. रामचंद्रन यांना समजलं होतं की गृहिणी हा त्यांच्या मुख्य ग्राहकवर्ग असेल. त्यामुळे त्यांनी उत्पादन विक्रीसाठी सहा महिलांना कामावर ठेवलं, ज्या घरोघरी जाऊन “उजाला” विकू लागल्या. त्यांच्या विक्रीसाठीचा संदेश सोपा आणि प्रभावी होता- तो म्हणजे “उजल्याचे फक्त चार थेंब वापरून तुमच्या  कपड्यांना चमकदार बनवा”.

रामचंद्रन यांची ही युक्ती ग्राहकांच्या मनात घर करू लागली, आणि “उजाला”ला पहिल्या वर्षातच चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षाच्या अखेरीस, ज्योती लॅबोरेटरीजने १४४० रुपयांचा नफा मिळवला आणि विक्रीचा आकडा ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचला. रामचंद्रन यांच्या दृढनिश्चयाने आणि कल्पकतेने ज्योती लॅबोरेटरीजला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या साध्या पण परिणामकारक मार्केटिंग पद्धतीमुळे, कंपनीला अल्पावधीतच मोठं यश मिळालं. “उजाला”च्या यशामुळे रामचंद्रन यांनी आपल्या व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा घेतली, आणि पुढील काळात ज्योती लॅबोरेटरीज अनेक यशस्वी उत्पादनांसह एक यशस्वी ब्रँड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

व्यवसायातील स्पर्धेवर मात 

व्यवसाय करताना रामचंद्रन यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागले. रेकिट बेंकीझर कंपनीच्या ‘रॉबिन ब्लू’ या उत्पादनाने भारतीय बाजारात आपली पायाभरणी केली होती. यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. त्यांनी पारंपरिक ‘पावडर ब्लू’ ऐवजी ‘लिक्विड ब्लू’ तयार केलं आणि हे उत्पादन फक्त १ रुपयांपासून ४५ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध करून दिलं.

त्यानंतर, त्यांनी “चार बूंदों वाला, आया नया उजाला” ही जाहिरात तयार केली, जी खूपच लोकप्रिय झाली. ही जाहिरात घराघरात पोहोचली आणि प्रत्येक गृहिणीची पसंद बनली. अल्पावधीतच ‘उजाला’ हा एक मोठा ब्रँड बनला, आणि १९९७ मध्ये ‘उजाला’ने १०० कोटी रुपयांच्या विक्रीची यशस्वी कामगिरी केली.

यानंतर १९९६ मध्ये डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे रामचंद्रन यांना मच्छरांपासून संरक्षण देणाऱ्या उत्पादनाची आवश्यकता भासली. त्यामुळे त्यांनी ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ‘मॅक्सो’ हे उत्पादन बाजारात आणले. हे उत्पादन देखील खूप लोकप्रिय ठरलं आणि पुढे ‘मॅक्सो’ हा ३०० कोटी रुपयांचा ब्रँड बनला.

विस्तार आणि नवा टर्निंग पॉइंट: Henkel AG & Co.ची भागीदारी

2011 मध्ये ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने एक मोठं पाऊल उचलत जर्मन FMCG (Fast-moving consumer goods) कंपनी ‘Henkel AG’च्या भारतातील व्यवसायातील ५०.९७% हिस्सेदारी ६१७ कोटी रुपयांना खरेदी केली. ही खरेदी ज्योती लॅबोरेटरीजसाठी एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरली, ज्यामुळे कंपनीला भारतीय FMCG उद्योगात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भक्कम आधार मिळाला.

‘ज्योती लॅबोरेटरीज’ने या संधीचा लाभ घेत आपल्या उत्पादनांना वाढवलं, विक्रीत चांगली वाढ साधली आणि वितरण नेटवर्क अधिक विस्तारित केलं.  या विकासामुळे कंपनीने २०१३ मध्ये १०१७.३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि ८३.१४ कोटी रुपयांचा नफा कमवला आणि  त्यांची उत्पादने भारतातील 29 लाख दुकांनांमध्ये उपलब्ध झाली.

आज, ‘ज्योती लॅबोरेटरीज’चा वार्षिक महसूल २७५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे आणि कंपनी ३६९ कोटी रुपयांचा नफा कमावते आहे. त्यांच्याकडे २३ कारखाने असून २५ हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उजला सुप्रीम, मॅक्सो, एक्सो डिश वॉश, प्रिल डिश वॉश, मिस्टर व्हाईट, आणि मार्गो बॉडी सोप ही त्यांची प्रमुख उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत.

‘ज्योती लॅबोरेटरीज’ने आता राष्ट्रीय स्तरावर आपला व्यवसाय स्थिर केला असून . ‘उजला’ आणि ‘मॅक्सो’ यांसारखी उत्पादने संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहेत. मोठ्या FMCG कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘ज्योती लॅबोरेटरीज’ने भारतातील FMCG क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि आता P&G व HUL सारख्या दिग्गज कंपन्यांना थेट स्पर्धा देत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button