फुटबॉल या खेळाचं नाव घेतलं की, जी नावं सर्वात आधी ओठांवर येतात, त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो या असामान्य फुटबॉलपटूचाही समावेश होतो. ७ नंबरची जर्सी घालणाऱ्या रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम आणि श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये होते. अनेक लहान मुलं तर रोनाल्डोला पाहूनच फुटबॉलच्या प्रेमात पडताना दिसतात. काहीजण तर चक्क रोनाल्डो खेळतो, तेव्हाच फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी टीव्हीपुढे आपली जागा पकडून बसतात.
गल्ली ते दिल्ली, लंडन ते पॅरिस, जगाच्या पाठीवर कुठेही जा, सर्वोत्तम फुटबॉलपटूंचं नाव विचाराल, तर तुम्हाला ख्रिस्तियानो रोनाल्डो (किंवा लिओनेल मेस्सी) हेच उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असणारा हा स्टार खेळाडू ५ फेब्रुवारी रोजी आपला ३९वा वाढदिवस साजरा करतोय.
सध्याच्या घडीला जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचा अव्वल क्रमांक लागतो. एवढंच काय, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्याच नावावर आहे. रोनाल्डोविषयी आणखी एक भुवया उंचावणारी बाब अशी की, जगभरात इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डो अव्वलस्थानी आहे. इतके सारे कारनामे करण्याचे अनेकजण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीत आणि साध्य करणं तर काहींनाच जमतं, त्यापैकीच एक म्हणजे रोनाल्डो.
यशाचं अत्त्युच्च शिखर गाठणाऱ्या रोनाल्डोचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फार सोपा नव्हता. त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. खरं तर, रोनाल्डो त्याच्या पालकांना नको असणारा मुलगा होता, त्याचे बालपण चार भावंडांसोबत एका खोलीत गेले. वडील व्यसनी होते. त्यामुळे हे कारनामे आणखीच मोठे वाटू लागतात. चला तर, त्याच्या वाढदिवशी रोनाल्डोचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊयात…
गरीब आई-वडिलांचा चौथा मुलगा
डोलोरेस आणि जोस डिनिस या दाम्पत्याला 3 अपत्यं होती. त्यात ह्यूगो, केटिया आणि एल्मा यांचा समावेश आहे. यानंतर रोनाल्डोने त्यांचे चौथे अपत्य म्हणून ५ फेब्रुवारी १९८५ रोजी जन्म घेतला. आई डोलोरेस रोनाल्डोला जन्म देऊ इच्छित नव्हती. आपली आत्मकथा ‘मदर करेज’मध्ये डोलोरेस लिहिते की, ती डॉक्टरांशी गर्भपात करण्याविषयी बोलली होती, पण नकार दिला. डोलोरेस आता परमेश्वराला धन्यवाद देते की, तिने ते पाऊल उचलले नाही. रोनाल्डो आता मजेतही म्हणताना दिसतो की, ‘पाहा गं आई! तू माझ्यावेळी गर्भपात करू इच्छित होती आणि आज मीच आहे, जो घरात पैसे आणत आहे.’
दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायची आई
पोर्तुगालचा फुटबॉलपटू रोनाल्डोच्या आई-वडिलांविषयी बोलायचं झालं, तर त्याचे वडील माळी होते, तर आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण बनवत होती. चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या रोनाल्डोचे कुटुंब पत्र्याच्या घरात राहायचे. रोनाल्डो म्हणतो की, ‘मी खूपच गरिबीत वाढलो. आम्ही प्रचंड गरीब होतो. माझ्याकडे खेळण्यासाठी वस्तू नव्हत्या आणि कोणतेही ख्रिसमस गिफ्टही नव्हते. मात्र, मी कधीही याचा विचार केला नाही.’ आज रोनाल्डो प्रचंड श्रीमंत का असेना, पण तो आपल्या मुलांना तेच संस्कार देऊ इच्छितो, जे त्याच्या आईने त्याला दिले आहेत.
सतत रडल्यामुळे नाव पडले होते ‘रडका’
शिक्षण ही काळाची गरज असते. त्यामुळे रोनाल्डोलाही शाळेत धाडले गेले. जेव्हा तो शाळेत गेला, तेव्हा तो घरची आठवण काढून रडू लागायचा. सोबत शिकणारी मुलं त्याला रडका म्हणू लागली होती. रोनाल्डो प्रचंड वेगाने धावायचा, त्यामुळे त्याने फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. त्याने फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. रोनाल्डोला अभ्यासापेक्षा फुटबॉलमध्ये जास्त रस होता. त्याने अवघ्या ८ वर्षांच्या वयात स्थानिक संघासाठी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्याच्या शानदार प्रदर्शनामुळे त्याची निवड १७ वर्षांखालील संघात झाली होती.
वयाच्या १८ वर्षांपर्यंत आई सांभाळायची सर्व कमाई
सन २००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रोनाल्डोच्या आईने स्वीकार केले की, १८ वर्षांच्या वयापर्यंत त्यांचे दोघांचे जॉईंट खाते होते. यामध्येच रोनाल्डोचे पैसे यायचे. या सर्व पैशांची देखभाल त्याची आई करत होती. इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने २००३ साली त्याला १७ मिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये साईन केले होते. त्याचे वय त्यावेळी फक्त १८ वर्षे होते. यानंतर रोनाल्डोने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो २००९ ते २०१८ दरम्यान स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिद संघाचा भाग राहिला. त्यानंतर तो २०१८ ते २०२१ दरम्यान जुवेंटस संघाकडून खेळला. पुढे पुन्हा त्याने २०२१ ते २०२२ वर्षात मँचेस्टर युनायटेडचा हात पकडला. मात्र, ही साथ जास्त काळ टिकली नाही. २०२३मध्ये त्याने अल नासेर या क्लबमध्ये एन्ट्री केली.
संपत्ती आणि कमाईचे स्त्रोत
जगाच्या पाठीवर नाव कमावणारा रोनाल्डो संपत्तीच्या बाबतीतही तितकाच शक्तिशाली आहे. ज्या रोनाल्डोची संपत्ती २०२०मध्ये फोर्ब्सनुसार ४६० मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३३ अब्ज ५४ कोटी रुपये होती. तीच संपत्ती २०२४ मध्ये रिपोर्ट्सनुसार ४१ अब्ज रुपये आहे. याव्यतिरिक्त रोनाल्डो सोशल मीडियावरूनही बक्कळ कमाई करतो.
रोनाल्डोचे फेसबुक (१६८ मिलियन), इंस्टाग्राम (६१९ मिलियन) आणि ट्विटरवर (११०.४ मिलियन) मिळून ८९७.४ मिलियन (८९.७४ कोटी) फॉलोअर्स आहेत. रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करून तब्बल 26 कोटींहून अधिक रुपयांची कमाई करतो. याव्यतिरिक्त त्याच्याकडे आलिशान गाड्यांचाही ताफा आहे. त्यात लॅम्बोर्गिनी एवेंटाडोर, बुगाटी कायरन, मर्सिडीज एएमजी आणि पोर्श करेरा यांसारख्या सुपरकार्सचा समावेश आहे.
वैयक्तिक आयुष्य
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक १२८ गोल करणाऱ्या रोनाल्डोच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ५ अपत्यं आहेत. त्यातील ३ अपत्य ही दोन सरोगेट मातांकडून झालेली आहेत. मात्र, त्याने अद्याप कुणाशीही लग्न केले नाहीये. त्याची सध्याची गर्लफ्रेंड स्पॅनिश मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्ज आहे.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? आवडला असेल, तर मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडतील? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.