करिअरची झेप अंतराळापर्यंत
12वी झाली आता पुढे काय करू हा सगळ्या विद्यार्थ्यांचा ठरलेला प्रश्न. पण तुम्हाला जर विज्ञानात रस असेल, तर आजच्या लेखातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल.
आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे माणूस भूगर्भापासून ते अंतराळातील कृष्ण-विवरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत नावीन्य आणि नवीन काहीतरी शोध लावण्यात, संशोधन करण्यात तरबेज झाला आहे. या तंत्रज्ञानामुळेच करिअरचे नव-नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे Career In Space Science. तुम्हाला जर अंतराळ विश्वात रमायला आवडत असेल, तर तुम्ही स्पेस सायन्समध्ये उत्तम करिअर करू शकता.
पूर्वीसारख्या अंतराळ विज्ञानात आता केवळ खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर बनणं फक्त एवढ्याच संधी उपलब्ध नाहीत, तर स्पेस इंजिनीअरिंग, स्पेस रिसर्च, स्पेस लॉ, स्पेस टुरिझम, स्पेस टेक्नोलॉजी असे अनेक पर्याय आहेत.
खगोलशास्त्रज्ञ: विज्ञानाच्या दृष्टीने अवकाश अजूनही कधीही न सुटणारे कोडे आहे. अनेक देशांचे शास्त्रज्ञ अवकाशाचा शोध घेण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. खगोलशास्त्रामध्ये सूर्यमाला, तारे, आकाशगंगा, ग्रह इत्यादींचा समावेश होतो. हे शास्त्रज्ञ जमिनीवरून संशोधन करून तिथे घडणाऱ्या विविध घटना जाणून घेत असतात, त्यावर अभ्यास करत असतात.
अंतराळवीर : अंतराळवीरांबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते, हे असे लोक असतात जे अंतराळात फिरून आपली स्वप्ने पूर्ण करतात. स्पेस स्टेशनवर राहून संशोधन करणे हे त्यांचे काम असते. कल्पना चावला, सुनीता विल्यम असे अंतराळवीर आणि त्याची अभिमानास्पद कार्य आपल्याला माहितीच आहेत. तुम्ही देखील स्पेस सायन्समध्ये करिअर करून अंतराळवीर बनू शकता.
स्पेस इंजिनीअरिंग : आता इंजिनीअर म्हणून तुम्ही केवळ आयटी कंपन्यांमध्येच काम करू शकता असे नाही, तर तुम्ही अंतराळाचा देखील वेध घेऊ शकता. अंतराळ मोहिमेशी संबंधित सर्व उपकरणं डिझाइन करणे हे स्पेस इंजिनिअरचे मुख्य काम असते. एरोस्पेस, रोबोटिक्स, मटेरियल सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग तसेच मेकॅनिकल आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग अशा अनेक क्षेत्रातील इंजिनीअर्स स्पेसमध्ये काम करु शकतात.
स्पेस टेक्नॉलॉजी: यामध्ये मुख्यतः सॅटेलाइट, स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्ट, स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, अंतराळ युद्धात गुंतलेली विविध उपकरणे, इक्विपमेंट डिझाईन करण्याचे काम केले जाते.
स्पेस रिसर्च: विज्ञान म्हटलं की शोध, संशोधन हे आलेच आणि अंतराळ हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये संशोधकाला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येतात. अवकाश संशोधनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. जसे – खगोलभौतिकशास्त्रज्ञ, खगोलजीवशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ, जैवभौतिकशास्त्रज्ञ. आणि हे सर्वजण आपापल्या पद्धतीनुसार अंतराळातील गोष्टींवर काम करत असतात.
स्पेस लॉ: स्पेस लॉ हा अंतराळ अंतर्गत क्षेत्राशी संबंधित कायदा आहे. यामध्ये देश आणि कंपन्यांमधील करार, संधी, अधिवेशनं आणि संघटना यांच्या नियमांची माहिती मिळते. आजच्या काळात अवकाशात माणसाने ज्याप्रकारे विस्तार केला आहे, ते पाहता स्पेस लॉ करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.
स्पेस टुरिझम: कोणाला अवकाशात फिरायला आवडणार नाही. 2030 पर्यंत अंतराळवीरच नाही, तर तुम्ही आम्ही देखील अंतराळ सफर करू शकतो अशी घोषणा ईस्त्रोने केली आहे. त्यामुळे भारत स्पेस टुरिझम मॉडेलवर जोरदार काम करत आहे. यामध्ये व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन, ओरियन, स्पेसएक्स, ओरियन स्पॅन आणि बोईंग यांसारख्या खासगी विदेशी कंपन्या या क्षेत्रात खूप पुढे गेल्या आहेत. त्यामुळे स्पेस टुरिझम क्षेत्र तुमच्या करिअरसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं.
मग कशी वाटली आजची माहिती? कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा…